Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
क्रीडा

अरोनियलानिर्विवाद जेतेपद
आनंदला संयुक्तरीत्या दुसरे स्थान
नाइस (फ्रान्स), २७ मार्च / पीटीआय

विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने ब्लाइंडफोल्ड डावात चीनच्या वांग यूविरुद्ध विजयाची संधी गमावल्यामुळे अंबर ब्लाइंडफोल्ड आणि रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत त्याला अखेर संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आनंदने रॅपिड विभागात आपली सर्वोत्तमता सिद्ध करताना अर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियन आणि अमेरिकेच्या गाटा कामास्कीसोबत संयुक्तरीत्या अव्वल स्थान राखले.

वेटलिफ्टर मोनिकादेवीवर दोन वर्षांसाठी बंदीची शक्यता
नवी दिल्ली, २७ मार्च/पीटीआय

मणिपूरची वेटलिफ्टर मोनिकादेवी ही उत्तेजक औषध सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे तिच्यावर दोन वर्षांसाठी बंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे. बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या वेळी उत्तेजक औषध सेवनाचे कारण देत मोनिकास भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ऐनवेळी भारतीय संघातून वगळण्यात आले होते. या निर्णयाबाबत मोनिकाने आव्हान दिले होते. त्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या शिफारसीनुसार टी.एस.कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

अ‍ॅडव्हान्टेज न्यूझीलंड!
* आघाडीचे तीन फलंदाज गमावणाऱ्या भारताची मदार राहुल, सचिनवर
* न्यूझीलंडचे कसोटीवर पूर्ण वर्चस्व
* जेसी रायडरचे द्विशतक; मॅक्युलमचे शतक, फ्रँकलिन, व्हेटोरीची अर्धशतके
नॅपियर, २७ मार्च / पीटीआय

न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारू देणाऱ्या पाहुण्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर झटपट तीन फलंदाज गमावून स्वत:साठी
मोठा खड्डाच खणला आहे. जेसी रायडरचे (२०१) कारकिर्दीतले पहिले द्विशतक आणि ब्रेंडन मॅक् क्युलमच्या झंझावाती ११५ धावांच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने ९ बाद ६१९ अशी भली मोठी धावसंख्या उभारून पहिला डाव घोषित केला. मॅक्लीन पार्कच्या ‘पाटा’ खेळपट्टीवर उभारलेली ही धावसंख्या, न्यूझीलंडची भारताविरुद्ध मायदेशातील सर्वोच्च ठरली आहे.

वर्चस्वाची संधी -रायडर
प्रतिक्रिया

नेपियर, २७ मार्च/ वृत्तसंस्था

गोलंदाजांच्या कामगिरीमुळे दुसऱ्या कसोटीवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची मोठी संधी आम्हाला चालून आली आहे, असे मत न्यूझीलंडचा द्विशतकवीर जेसी रायडर याने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर व्यक्त केली. न्यूझीलंडने पहिल्या डावात ६१९ धावांचा डोंगर रचला आहे. या मोठय़ा धावसंख्येचा पाया रायडरने रॉस टेलरच्या साथीत रचला. रायडर म्हणाला की, दिवसअखेर आमच्या गोलंदाजांनी भारताचे तीन बळी मिळवूना मोठी कामगिरी केली आहे.

चांगली कामगिरी करून कसोटीवर वर्चस्व मिळवू! -झहीर
नेपियर, २७ मार्च/पीटीआय

मॅक्लीन पार्कची खेळपट्टी अद्यापि ठणठणीत आहे. गोलंदाजांना कठोर परिश्रम करायला लावणारी आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या प्रचंड धावसंख्येवर दबून जाण्याची गरज नाही. मात्र उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या दोन दिवसांच्या खेळावर न्यूझीलंडचे वर्चस्व होते. उद्याचा दिवस आमचा असेल अशी आशा करूद्या. उद्या चांगली कामगिरी करून या कसोटीवर आम्ही पुन्हा वर्चस्व मिळवू, असा आत्मविश्वास झहीर खानने पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मॅक्लीन पार्कच्या पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांना यश मिळविणे ही कठीण गोष्ट आहे. गोलंदाजीच्या आमच्या चमूने सर्वस्व पणास लावून गोलंदाजी केली. पण रायडरचे द्विशतक न्यूझीलंड संघासाठी जमेची बाजू ठरली. आमच्या गोलंदाजांनी फलंदाजांना बाद करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. काही वेळा तुमच्या बाजूने येतात. यावेळी मात्र त्या संधी निसटल्या. उर्वरित तिन्ही डाव भारताच्या बाजूचे असतील अशी अपेक्षाही झहीरने केली.

युसूफला आयसीएलशी काडीमोड घ्यायचाय!
कराची, २७ मार्च / पीटीआय

बंडखोर इंडियन क्रिकेट लीगचा करार मोडून राष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:चे पुन्हा अस्तित्व निर्माण करण्यासाठी मोहम्मद युसूफ प्रयत्नशील असल्याचा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने युसूफचे पत्र आपल्या विधी खात्याकडे पाठविले आहे. देशासाठी त्याने पुन्हा खेळावे, असे आवाहन या पत्रात केले आहे. आयसीएलमध्ये डेरेदाखल झाल्यामुळे गेल्या वर्षीपासून युसूफवर बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची किंवा कोणत्याही सदस्य बोर्डाची आयसीएलला मान्यता नसल्यामुळे आयसीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर ही कारवाई करण्यात आली होती. सिंध उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात घेतलेल्या एका निर्णयांतर्गत युसूफसह अन्य आयसीएलमधील खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास परवानगी दिली. परंतु राष्ट्रीय संघातर्फे खेळण्यावर असलेली बंदी मात्र उठविलेली नाही. बोर्डाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांगितले की, युसूफने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इजाझ बट यांना पाठविलेल्या पत्रात आपल्याला राष्ट्रीय संघातर्फे खेळण्याची पुन्हा संधी द्यावी, अशी विनंती केली आहे. पाकिस्तानतर्फे खेळण्याची निश्चित संधी मिळणार असेल, तर आपण आयसीएलशी असलेला करार मोडीत काढण्यास तयार आहोत, असे युसूफने कळविले आहे.

इंडियन ओपन बँडमिंटन : सायना पराभूत
हैदराबाद, २७ मार्च / पीटीआय

मलेशियाच्या ज्युलिया पेई झियान वाँगकडून पराभव पत्करल्यामुळे यॉनेक्स सनराइस इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत भारताच्या सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आले आहे.
द्वितीय मानांकित सायनाने पाचव्या मानांकित ज्युलियाकडून २१-१२, १३-२१, १८-२१ अशा फरकाने हार पत्करली. मागील चार लढतींपैकी तीन लढतीत सायनाने तिला पराभूत केले होते.
घरच्या मैदानावरील प्रेक्षकांसमोर जागतिक क्रमवारीतील नवव्या क्रमांकाच्या सायनाने केलेल्या काही चुका तिला भोवल्या. मिश्र दुहेरी गटात ज्वाला गट्टा आणि वालियावेटिल दिजू या भारतीय जोडीने चीनच्या ताओ जियामिंग आणि झायोली वांगचा २१-१३, २१-१३ असा पराभव करून उपान्त्य फेरीत धडक मारली आहे.उपान्त्य फेरीत आता गट्टा आणि दिजू यांची गाठ जिएन ग्युओ ओंग आणि सूक चिन चाँग या मलेशियन जोडीशी पडणार आहे. ओंग-चाँग या जोडीने मुहाम्मद रिजाल आणि डेब्बी सुसांतो जोडीचा उपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत २१-१९, २१-१९ असा पराभव केला.

बहिष्काराचा इशारा दिलेला नाही -गेल
ब्रिजटाऊन, २७ मार्च/ वृत्तसंस्था

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय लढतींवर बहिष्कार टाकण्याची कसलीही धमकी आम्ही दिलेली नाही, असा खुलासा वेस्ट इंडिजचा कर्णधार ख्रिस गेल याने केला आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाशी पैशाच्या तसेच अन्य मुद्दय़ांवरुन झालेल्या मतभेदांमुळे वेस्ट इंडिज खेळाडूंनी इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील उर्वरित सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्याचे वृत्त गुरुवारी प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त म्हणजे केवळ एक अफवा आहे, असे गेल याने सांगितले. वेस्ट इंडिज मंडळाशी आमची वेगवेगळ्या मुद्दय़ांवर चर्चा चालू आहे. त्यातून आमच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघेल, अशी आशा आहे, असेही गेल याने सांगितले.

श्रीलंकन क्रिकेटपटूंनी घेतला आर्ट ऑफ लिव्हिंगचा आश्रय
मुंबई, २७ मार्च/पी.टी.आय.

लाहोरमधील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर बसलेल्या जबरदस्त धक्क्यातून सावरण्यासाठी श्रीलंकन क्रिकेटपटूंनी स्वामी सद्योजाथा यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंगचा सहारा घेतला. या कोर्समुळे मुरलीधरनला जीवनातील शांतीची नव्याने प्रचिती आली तर संगकारानेही हा कोर्स गात्रं शिथिल करण्याच्या दृष्टीने डोळे उघडणारा ठरल्याचे म्हटले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे गेली १६ वर्ष आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक असणाऱ्या सद्योजाथा यांनी श्रीलंकन क्रिकेटपटूंसाठी चार दिवसांच्या शिबिराचे आयोजन केले होते. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपाक्सा यांनीच त्यांना तशी विनंती केली होती. या शिबिरादरम्यान खेळाडूंनी पाकिस्तानातील घटनांवर अजिबात चर्चा न करता केवळ मन:शांतीवरच लक्ष केंद्रित केले होते.
या शिबिरात त्यांनी शुक्ष्म योगा, प्राणायाम, श्वसन क्रियेची सुदर्शन क्रिया आदी गोष्टी केल्या. या शिबिरात कर्णधार कुमार संगकारा, मुथय्या मुरलीधरन, महेला जयवर्धने, चामिंडा वास, दिलहारा फर्नाडो, प्रसन्ना जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान, मलिंगा बंदारा, चामरा कपूगेदरा, पर्णावतना, संघव्यवस्थापक ब्रेन्डन कुरुप्पू व विंग कमांडर नलिन सहभागी झाले होते.

आयपीएल स्पध्रेची सलामीची लढत केपटाऊनला
मुंबई : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व दक्षिण आफ्रिकेत रंगणार असून १८ एप्रिलला स्पर्धेची सलामीची लढत केपटाऊनला होणार आहे, तर अंतिम लढत २४ मे रोजी जोहान्सबर्गला रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या लढती २२ व २३ मे रोजी अनुक्रमे प्रेटोरिया व जोहान्सबर्ग येथे खेळल्या जातील. या स्पर्धेतील एकूण ५९ लढती दक्षिण आफ्रिकेतील आठ शहरात खेळल्या जाणार आहे. त्यात केपटाऊन, जोहान्सबर्ग, डर्बन, प्रेटोरिया, इस्ट लंडन, किम्बेर्ली, ब्लोमफोन्टेन आणि पोर्ट एलिझाबेथ या शहरांचा समावेश आहे. डर्बनच्या किंग्जमेड मैदानावर सर्वाधिक १६ सामने होणार असून प्रेटोरियाच्या सेन्चुरियन पार्कवर १२ लढती होतील.

क्रिकेट प्रशिक्षणासाठी उजळणी वर्ग
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरांचे प्रशिक्षक आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील इनडोअर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या प्रशिक्षकांसाठी असोसिएशनच्या
वतीने उजळणी वर्ग आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ व २९ मार्च रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात हे उजळणी वर्ग व परिसंवाद होतील. योग्य प्रशिक्षण पद्धती आणि
प्रशिक्षणाच्या पद्धतीत समानता यावी यासाठी या उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे एम.सी.ए. क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे प्रशिक्षण विभागाचे संचालक चंद्रकांत पंडित यांनी सांगितले.