Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

नववर्षांच्या स्वागतयात्रेत बागडली डोंबिवली
डोंबिवली/प्रतिनिधी - नववर्षांच्या पूर्वसंध्येला लक्ष आवर्तन, दीपोत्सव, विविध स्पर्धा, रंगीबेरंगी आतषबाजी, रांगोळ्यांनी शहरातील वातावरण भारून गेलेले असतानाच, आज भल्या सकाळी विविध प्रकारचे रंगीबेरंगी पेहराव, पोशाखात शहरातील बालगोपाळ, महिला-पुरुष, तरुण-तरुणी, आजी-आजोबा मोठय़ा उत्साहाने नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी झाले आणि तब्बल तीन तास विविध रस्त्यांवर आज डोंबिवली शहर फुलले, बहरले आणि बागडले. नववर्षांच्या या स्वागत्सोवाला शुभाशीर्वाद देण्यासाठी कोल्हापूर पीठाचे शंकराचार्य प.पू.श्री नृसिंह भारती उपस्थित होते.

ठाण्यात नववर्ष स्वागताचा जल्लोष
ठाणे/प्रतिनिधी- चौकाचौकात उभारण्यात आलेल्या कमानी, रस्त्यांच्या बाजूला काढण्यात आलेल्या आकर्षक रांगोळ्या, राष्ट्रीय सुरक्षेपासून पर्यावरण संरक्षणाबाबतचे संदेश देणारे चित्ररथ आणि पारंपरिक वेशात स्वागतयात्रेत सहभागी झालेल्या हजारो आबालवृद्ध ठाणेकरांनी आज भारतीय नववर्षांचे जल्लोषात स्वागत केले. नववर्षांच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर दीपोत्सव तर आज घरोघरी गुढय़ा उभारून पाडव्याचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

भिवंडीत नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात
भिवंडी/वार्ताहर: पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय, रोटरी क्लब व शेठ जुगीलाल पोदार हायस्कूलच्या वतीने निघालेल्या नववर्ष स्वागतयात्रेमध्ये शाळेतील हजारो विद्यार्थी, शिक्षक-पालक व विविध क्षेत्रांतील मान्यवर पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. स्वागत यात्रेचे चौथे वर्ष असून, यात राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण, ऊर्जाबचत, मतदान हक्कांबाबत जागरुकता आदी संदेश दिले गेले. घोडय़ावर स्वार झालेले छत्रपती शिवराय, राणी लक्ष्मीबाई, चित्ररथात विराजमान राष्ट्रीय पुरुष, लेझिम पथके, ग्रंथदिंडी, भजनी मंडळ, आदिवासी नृत्य व भारतीय संस्कृती प्रदर्शित करणाऱ्या विविध देखाव्यांमुळे शोभायात्रेत मोठा उत्साह संचारला होता.

शिक्षणसेवकांच्या मानधन वाढीची मागणी
भिवंडी/वार्ताहर

राज्यात सन २०००-०१ पासून शिक्षण सेवक योजना लागू करण्यात आल्यानंतर नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना तीन वर्षे मानधनावर काम करावे लागते. गेल्या आठ वर्षांंत त्यांच्या मानधनात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही, तसेच सहाव्या वेतन आयोगातही याबाबत विचार झालेला नसल्याने आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीची मागणी पत्राद्वारे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

राजकीय गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’
जयेश सामंत

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवी मुंबईतील असल्याने शहर पोलिसांची डोकेदुखी मोठय़ा प्रमाणावर वाढली असून, निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईत ऐरोली व बेलापूर हे विधानसभेचे दोन मतदारसंघ मोडतात. यापैकी ऐरोली मतदारसंघ संवेदनशील मानला जात असल्याने या भागात गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे.

‘डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवार’ मासिकाचे प्रकाशन
डोंबिवली/प्रतिनिधी - विविध अंगाने बहरत असलेल्या डोंबिवलीच्या सांस्कृतिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यासाठी कल्याण-डोंबिवली पालिका स्थायी समितीचे माजी सभापती रवींद्र चव्हाण यांनी आजपासून ‘डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवार’ हे मासिक चालू केले. कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, संगीत, साहित्यिक, सांस्कृतिक आदी क्षेत्राने व्यापलेले हे मासिक म्हणजे नवोदितांना एक व्यासपीठ आहे.

सरकारी विभागांना टेन्शन ‘टार्गेट’चे!
राजीव कुळकर्णी

सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीबरोबरच सरकारी-निमसरकारी कार्यालयांमध्ये ‘मार्च एंडिंग’ची धावपळ सुरू असून जागतिक मंदीच्या तडाख्यामुळे अनेक विभागांमध्ये महसूल वसुलीची उद्दिष्टपूर्ती होईल की नाही, याबद्दल अधिकारी धास्तावले आहेत. डिसेंबरनंतर मंदीच्या लाटेमुळे सर्वच आर्थिक गणिते कोलमडली. नोकऱ्यांवर गंडांतर आले, उद्योगांची उलाढाल मंदावली, शेअर बाजारातील व्यवहार थंडावले. परिणामी, सरकारी महसुलावरही याचा परिणाम झाला असून प्राप्तिकर, विक्रीकर, अबकारी शुल्क, आयात शुल्क, आरटीओ यांसारख्या खात्यांमध्येही ‘टार्गेट’ पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

अंबरनाथ-बदलापुरातही नववर्षांचे जंगी स्वागत
बदलापूर/वार्ताहर - दरवर्षीप्रमाणे अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात आणि जल्लोषात निघाली होती. अंबरनाथ येथील हेरंब मंदिरापासून सकाळी साडेआठ वाजता मुख्य यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत सुमारे ८० विविध सामाजिक संस्था आणि २० विविध आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. पारंपरिक वेषातील महिला आणि पुरुषांमुळे यात्रेत रंगत आली होती.

कल्याणात नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात
कल्याण/वार्ताहर: शहरातील पूर्व भागात समाजसेवक गणपतशेठ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत महिला मंगल कलश घेऊन, काही महिला भगव्या साडय़ा व फेटा बांधून तर नागरिक आपल्या पारंपरिक वेषात मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. अतिशय शिस्तीने ही स्वागतयात्रा नियोजित वेळेत पार पडली. या स्वागतयात्रेचा प्रारंभ कोळसेवाडीतील गणेश मंदिराच्या पटांगणात सार्वजनिक गुढी उभारून विधिवत पूजा संयोजन समितीचे अध्यक्ष गणपतशेठ गायकवाड यांनी सपत्नीक करून ही शोभायात्रा काटेमानवली शिवाजी कॉलनी मार्गे शहरात फिरून चक्कीनाका येथील गुणगोपाळ मंदिराच्या पटांगणात स्वागतयात्रेचा समारोप करण्यात आला. या स्वागतयात्रेच्या अग्रभागी भारतमातेच्या मूर्ती रथ, निरनिराळे चित्ररथ, हत्ती, घोडे, आदिवासी नृत्य, तारका नृत्य, मल्लखांब प्रात्यक्षिके यांचा सहभाग करण्यात आला होता. रूपेश गायकवाड या युवकाच्या संकल्पनेतून साकार झालेली नवयुवकांची परिवर्तन गुढी या यात्रेत विशेष आकर्षण ठरली.

लाखो थकबाकीदारांना महावितरणचा शॉक
ठाणे/प्रतिनिधी: वीज बिले थकविणाऱ्या लाखो ग्राहकांना वीजपुरवठा खंडित आणि दंड वसुली असा डबल शॉक महावितरणने दिला आहे. सप्टेंबर ०८ पासून महावितरणच्या कल्याण परिमंडळाने वीज बिल थकबाकीदारांविरोधात मोहीम उघडली असून या मोहिमेत आतापर्यंत एक लाख २३ हजार ८९८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईतून परिमंडळाने तब्बल ७७.४३ कोटींची थकबाकी वसूल केली आहे. कल्याण परिमंडळातील वसई मंडळाने या मोहिमेत सर्वाधिक ५८ हजार ८८८ ग्राहकांची वीज तोडून २७ कोटी ९१ लाखांची वसुली केली, तर कल्याण मंडल २ ने २७ हजार २८५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करीत २४.२० कोटी रुपये वसूल केले. पेण मंडलने १८ हजार ३७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करीत १५ कोटी, तर कल्याण मंडल १ ने १९ हजार थकबाकीदारांवर कारवाई करीत नऊ कोटींची थकबाकी वसूल केली.

ठाण्यात दोन किलो चरस जप्त
ठाणे/प्रतिनिधी
नेपाळ सीमेवरील गोरखपूर जिल्ह्णाातून विक्रीसाठी आणलेले पावणे दोन किलो चरस खंडणीविरोधी पथकाने काल तलावपाळी येथे जप्त केले. या प्रकरणी दोन आरोपींना ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त प्रशांत बुरुडे यांनी दिली.
ठाणे खंडणीविरोधी पथकातील सहाय्यक पोलीस आयुक्त बल्लाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार साईकृपा हॉटेलजवळ रचलेल्या सापळ्यात सोनू कुरेशी (२३), जलालुद्दीन अहमद खलील अहमद शहा (२५) रा. धारावी हे अडकले. त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या १ किलो ७६५ चरसची आंतरराष्ट्रीय किंमत १७ लाख ६५ हजार रुपये आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भापकर, उपनिरीक्षक शिवतरे, अविनाश कदम, कैलास पाटील यांनी ही कामगिरी बजावली.

जवाहिऱ्याला लुटले
कल्याण/प्रतिनिधी:कोळसेवाडीतील दीपक ज्वेलर्समध्ये घुसून साठ ग्रॅम सोने लुटून फरार झालेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. काल रात्री नऊ वाजता मालक दीपक मंडल दुकान बंद करत असताना दोन व्यक्ती दुकानात घुसल्या. एकाने रिव्हॉल्व्हरच्या धाकाने साठ ग्रॅम सोने ताब्यात घेतले. याचवेळी एकाने चोर म्हणून आरडाओरड करताच, दोघेही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. ते एमएच-०१-८२४५ गाडीतून पळून गेल्याची माहिती तेथील एका तरुणाने पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. डी. गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सातपुते या प्रकरणाचा तपास करत आहेत.