Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बसपचे डॉ. पोद्दार यांची उमेदवारी संकटात; नव्याचा शोध सुरू
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, २७ मार्च

बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल पोद्दार तांत्रिक दृष्टय़ा अजूनही शासकीय सेवेत

 

असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द होऊ शकतो, हे लक्षात आल्याने पक्षवर्तुळात खळबळ उडाली आहे. वेळेवर धोका होऊ नये म्हणून दुसऱ्या उमेदवाराचा शोध पक्षाने सुरू केला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बसप उमेदवाराने एक लाखापेक्षा जास्त मते घेतल्याने यावेळी पक्षाचा उमेदवार कोण याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या पाश्र्वभूमीवर बसपने चार दिवसापूर्वी येथून डॉ. अमोल पोद्दार यांची उमेदवारी जाहीर केली. गेल्या वर्षभरापासून पक्षात सक्रीय असलेले डॉ. पोद्दार आधी येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. पक्षाचे पूर्णवेळ काम करता यावे म्हणून त्यांनी एक वर्षांपूर्वी मानसिक स्वास्थ ठीक नाही असे कारण देत दीर्घ रजा घेतली. रजेवर गेल्यानंतर मात्र ते पक्षात सक्रीय झाले. चार दिवसांपूर्वी उमेदवारीची माळ गळय़ात पडल्यानंतर डॉ. पोद्दार यांनी तातडीने येथील जिल्हा सामान्य रूग्णालय गाठून आपला राजीनामा सादर केला. हा राजीनामा तातडीने मंजूर व्हावा यासाठी त्यांनी एक महिन्याचे वेतन रूग्णालय प्रशासनाकडे जमा केले. यानंतर त्यांनी आरोग्य विभागाकडून कोणतीही देणी घेणे शिल्लक नाही, असे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बांडेबुचे यांच्याकडून घेतले. आता त्यांनी आपण शासकीय सेवक नाही या भूमिकेतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली असली तरी निवडणूक लढण्यासंबंधीच्या प्रचलित कायद्यामुळे त्यांच्या समोर नवा पेच उभा राहण्याची दाट शक्यता आहे. कायद्यानुसार शासकीय कर्मचाऱ्याला निवडणूक लढता येत नाही. लढायची असेल तर राजीनामा द्यावा लागतो. हा राजीनामा जोवर मंजूर झाल्याचे पत्र संबंधित विभागाकडून प्राप्त होत नाही तोवर राजीनामा दिलेला कर्मचारी तांत्रिक दृष्टय़ा शासकीय सेवेत राहतो. डॉ. अमोल पोद्दार यांचे प्रकरण नेमके याच वळणावर येऊन थांबले आहे. त्यांनी दिलेला राजीनामा येथील आरोग्य प्रशासनाने उपसंचालकाकडे पाठवला आहे. तेथून तो खात्याच्या संचालकाकडे जाईल. आरोग्य महासंचालनालयाकडून सर्व बाबीची पडताळणी केल्यानंतर राजीनामा मंजूर झाल्याचे पत्र देण्यात येईल. ही प्रक्रिया येत्या चार पाच दिवसात पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळेच बसपसमोर पेच उभा ठाकला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राजीनामा मंजूर नसल्याचे कारण देत नांदेड जिल्हय़ात एक अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. गेल्या वेळी भद्रावती मतदार संघातून शिवसेनेकडून लढलेले किशोर डांगे यांना राजीनामा मंजुरीचे पत्र आणण्यासाठी शेवटपर्यंत धावाधाव करावी लागली होती. ही पाश्र्वभूमी ठाऊक असल्याने बसपचे वरिष्ठ वर्तुळ चिंतेत सापडले आहे.
यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बांडेबुचे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डॉ. पोद्दार यांचा राजीनामा मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवल्याचे सांगितले. सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता शासकीय कर्मचाऱ्याला निवडणूक लढवता येत नाही, असे ते म्हणाले. डॉ. पोद्दार यांच्याशी संपर्क साधला असता, आपण राजीनामा दिला आहे त्यामुळे आता शासनाशी आपला संबंध नाही तेव्हा निवडणूक लढवूच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
बसपचे जिल्हाध्यक्ष भगत यांच्याशी संपर्क साधला असता विरोधी पक्षाचे लोक जाणीवपूर्वक हे प्रकरण तापवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पक्षातील वरिष्ठ वर्तुळाने मात्र ऐनवेळी अडचण होऊ नये म्हणून दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे.
अ‍ॅड. दत्ता हजारे चर्चेत
डॉ. अमोल पोद्दार यांचे नामनिर्देशनपत्र रद्द होण्याची भिती व्यक्त केली जात असतांना बहुजन समाज पक्षाने आज सायंकाळी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी बसपचे अधिकृत उमेदवार म्हणून येथील प्रसिध्द विधिज्ञ दत्ता हजारे यांची उमेदवारी निश्चित केल्याचे समजते. बसपने अ‍ॅड. हजारे यांच्या नावाची घोषणा केलेली नसली तरी रात्री उशिरापर्यंत हे नाव जाहीर होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. बसपने यापूर्वी अशाच पद्धतीने गडचिरोली-चिमूर क्षेत्रात उमेदवार बदलला आहे. गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून प्रथम मंगला बोरकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. कालांतराने राजे सत्यवान आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली.
डॉ. पोद्दार यांचे नामांकन रद्द होण्याच्या भितीने पक्ष नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. विशेष म्हणजे बसपाचे महाराष्ट्राचे प्रभारी वीर सिंग यांच्या नागपूर येथील बैठकीला अ‍ॅड. हजारे उशिरा पोहोचल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. आता उमेदवारीची माळ पुन्हा एकदा त्यांच्याच गळय़ात पडली आहे. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शासकीय नोकरीवर पाणी सोडणारे डॉ. पोद्दार या फेरबदलामुळे बसपच्या स्थानिक व राज्यातील नेत्यांवर संतापले आहेत.