Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जिगाव धरणाचे काम बंद पाडले
मलकापूर, २७ मार्च / वार्ताहर

जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरही पुनर्वसनाच्या कामात कोणतीच प्रगती झाली नाही,

 

तसेच पूर्णाकठी असलेल्या आडोळ भागातील बंद काम प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता अचानक सुरू करण्यात आल्याने आज शिवसैनिकांसह प्रकल्पग्रस्तांनी जिगाव धरणाचे काम पुन्हा बंद पाडले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. हरीश रावळ, दत्ता पाटील, तालुकाप्रमुख वसंतराव भोजने, संतोष दांडगे, विजय काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. २२ फेब्रुवारीला आधी पुनर्वसन नंतर धरण अशी मागणी रेटून धरत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. हरीश रावळ, तालुकाप्रमुख वसंतराव भोजने यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. दुसऱ्या दिवशी २३ मार्चला हे काम अभियंता हतगावकर यांनी सुरू केले. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी हतगावकर यांचे कपडे फाडले. त्यानंतरही प्रशासनावर काहीच परिणाम झाला नाही, त्यामुळे ३ मार्चला पाच हजार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन रावळ, भोजने यांनी प्रकल्पस्थळी उपोषण सुरू केले. या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. नदीकाठच्या एका भागाचे काम सुरू ठेवावे व दुसऱ्या काठावरचे काम पुनर्वसन चांगल्या प्रगतीवर आल्यावर करण्याचे ठरले होते. या आश्वासनाला महिना होत आला, तरीही पुनर्वसनाचे काम दप्तर दिरंगाईत पडले. आजपर्यंत पुनर्वसनाची पाहिजे तशी प्रगती नसल्यावरही नदीकाठच्या दुसऱ्या बाजूच्या आडोळ भागात अचानक काम सुरू झाले. याची माहिती समजताच शिवसैनिकांनी प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन हे काम बंद पाडले.