Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राज्यभरातील गावकारभारणींचे रविवारपासून अमरावतीत अधिवेशन
‘महिला राजसत्ता आंदोलन’ या स्वयंसेवी संघटनेच्यावतीने राज्यभरातील नेतृत्वक्षम महिलांचे राज्य अधिवेशन २९ व ३० मार्चला अमरावतीत होत आहे. त्यानिमित्त-
भीम रास्कर

‘चलो अमरावती सीखें नयी राजनीती’ या घोषणेसह महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या

 

पाश्र्वभूमीवर १० हजारांहून अधिक नेतृत्वक्षम महिला अमरावती अधिवेशनामध्ये २९ व ३० मार्चला एकत्र येत आहेत. महिलांचा स्थानिक राजसत्तेतला प्रवास सुरू होऊन आज जवळजवळ १५ वर्षे होत आली. या काळात अनेक आक्षेप, आरोप, टीका, आव्हानांना सामोरं जात त्यांनी यशाच्या दिशेनं त्यांची आगेकूच कायम ठेवली आहे. गावविकासात आज त्यांचे निश्चित असे योगदान आहे. महिला नेतृत्व स्थानिक पातळीवर त्यांचे पाय मजबूत करीत असतानाच वेळ आली आहे संसदेचा बालेकिल्ला सर करण्याची! आणि नेमक्या याच निर्णायक वेळी महिला राजसत्ता आंदोलन त्यांचे ‘पाचवे द्वैवार्षिक राज्य अधिवेशन’ आयोजित करून महिला नेतृत्वाचं समाजविकासातील योगदान साऱ्या महाराष्ट्रासमोर आणण्यास सज्ज झाले आहे!
या अधिवेशनात ज्येष्ठ नेत्या मृणाल गोरे, रजनीताई सातव (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला आयोग), पालकमंत्री सुनील देशमुख तसेच, ग्रामपंचायतींपासून राज्यस्तरावर नेतृत्व देणाऱ्या महिला व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. ‘बचत सत्तेपासून राजसत्तेपर्यंतचा प्रवास’ कुसुम बाळ सराफ मांडणार आहेत. महिला राजसत्ता आंदोलनाला दिशादर्शक ठरणारे राजसत्तेतल्या महिलांसदर्भातले विविध अभ्यासही या मंचावरून सादर केले जाणार आहेत. ‘स्त्री शक्ती उखाणे व चारोळी महोत्सव’ हे या अधिवेशनाचे एक प्रमुख आकर्षण असणार आहे. आदर्श महिला सरपंच, आदर्श जिल्हा संघटिका, ‘माझा गाव आमचा कारभार’ स्पर्धा पारितोषिक असे पुरस्कार कार्यकर्त्यांमधील प्रेरणेला नवे टोक देणारे असतील.
दहा हजार कोटी रुपये खर्चून घेतल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फक्त मतदानाची नाही, तर राजकारणात सक्रीय होण्याची इर्षां प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.
महिला राजसत्ता आंदोलनाच्या वाटचालीत अशी हजारो माणसं भेटली, ज्यांनी लोकांच्या प्रश्नांनाच त्यांचे प्रश्न करून टाकले! या राजसत्तेतल्या कारभारणींनी महिलांच्या प्रश्नांचा क्रमच त्यांच्या गरजेनुसार बदलवून घेतला. भ्रष्टाचार, मटन, दारू व नवसाशिवाय मतदान कसं होणार? या प्रश्नांना उत्तरं देत, त्या सरळ पण सहज नव्हे- निवडून आल्या. बचत सत्ता तर तयार झाली. त्याच बचत सत्तेला नेतृत्वशील महिला पंचायत सत्तेत घेऊन आल्या. घरातील हिंसाचाराबद्दल कारभारणींकडे येऊन काही गुपित व तक्रारी त्या सांगू लागल्या. बाईचं दु:खं, बाईला सांगणं सोप्प झालं! पती-पत्नीच्या संयुक्त घर मालकीला थोडासा का होईना पाठिंबा मिळू लागला. कारभारणींच्या हस्ते झेंडावंदन आता राजरोस होऊ लागलं. ग्रामपंचायतीचे टाळे उघडले. दारू, पाटर्य़ा व शिवीगाळ बंद झाली. नवं पंचायतीराज महिलांनीच पुन्हा चर्चेत आणलं!
आता या महिला अमरावतीला संसदेत ३३ टक्के व पंचायतीत ५० टक्के आरक्षण मागणार आहेत. त्या दारू व अत्याचारमुक्त महाराष्ट्राचं स्वप्नं रंगवणार आहेत. संपूर्ण राज्यभर संयुक्त घर-मालकी अभियानाचं रणशिंग फुंकणार आहेत! बी.पी.एल. रेशन व महिला धोरणांमधील पोकळ वासे बाहेर फेकीत आहेत. साऱ्याजणी गाव तिथं महिला भवन व तालुका तिथं सरपंच भवन मागणार आहेत. महिला सरपंचांना एस.टी. पासपासून, संरक्षण बिल पास करण्याचीही त्या मागणी करणार आहेत.
आता या सर्व राजकारणी सन्मानाने व अभिमानाने म्हणताहेत- ‘होय, आम्ही राजकारणी आहोत. होय, आम्ही सत्तेत भागीदारी करीत आहोत.’ येत्या २९ व ३० मार्चला आंदोलनाच्या राज्य अधिवेशनात या गावकारभारणींचं हे म्हणणं ऐकायला सायन्स कोर मैदानात नक्की यावं.
राजसत्ता आंदोलनाचं आवाहन आहे-
‘सम्मान से कहो, हम पॉलिटिकल है।’
‘चलें अमरावती, सीखें नयी राजनिती।’