Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

तापमान वाढीला आळा घालण्यासाठी आज वीज बंद ठेवण्याचे आवाहन
गडचिरोली, २७ मार्च / वार्ताहर

वीज निर्मितीकरिता औष्णिक व अणूऊर्जा प्रकल्पामध्ये मोठय़ा प्रमाणात उष्णता निर्माण होऊन

 

वातावरणात पसरल्याने जागतिक तापमान वाढीला इतर घटकांसोबतच हा घटक सुद्धा जबाबदार असल्याने २८ मार्चला नागरिकांनी विजेची सर्व उपकरणे एक तास बंद ठेवून तापमान वाढ विरोधी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सन २००७ पासून जागतिक तापमान वाढीविरुद्ध संदेश पोहचविण्यासाठी ‘वर्ल्ड वाईड फंड फॉर वेचर’ या संस्थेमार्फत मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एक तास घरातील व उद्योगांमधील सर्व विजेची उपकरणे बंद ठेवून ‘अर्थ अवर’ पाळण्यात येते. त्या अनुषंगाने सन २००७ मध्ये सिडनी येथे सुमारे २२ लाख घरांमधील व उद्योगामधील वीज एक दिवस एक तास बंद ठेवण्यात आली होती व त्यानंतर सन २००८ मध्ये याची व्याप्ती वाढवून सुमारे ५०० लाख घरांमधील व उद्योगामधील वीज एक दिवस एक तास बंद ठेवण्यात आली होती.आता सन २००९ मध्ये याची व्याप्ती अजून वाढविण्याचे ठरविण्यात आले असून आतापर्यंत सुमारे ७४ देशांनी जागतिक तापमान वाढीविरुद्ध मत प्रदर्शित करण्यासाठी एक तास वीज बंद ठेवण्याची प्रतिज्ञा केली आहे. भारताने या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी २८ मार्च रोजी सायंकाळी ८.३० ते ९.३० या वेळात नागरिकांनी विजेची सर्व उपकरणे बंद ठेवून जागतिक तापमान वाढ विरोधी मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन सामाजिक वनिकरण विभाग व राष्ट्रीय हरित सेनेने केले आहे.