Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

खामगाव शहरात पाण्याची विक्री
खामगाव, २७ मार्च / वार्ताहर

आजपर्यंत दूध, पेट्रोल किंवा डिझेलची लिटरप्रमाणे विक्री झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र,

 

पाणी टंचाईचा अनुभव घेत असलेल्या खामगावकरांना आज पिण्याचे पाणी लिटरप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. ३० लिटर पाण्याला पाच ते दहा तर १ हजार लिटरसाठी ८० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत.
शहरात सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र, सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने मिळणारे पाणी आठ दिवस पुरेनासे झाल्याने पाणी विकत घेण्याची पाळी नागरिकांवर आली आहे.
गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार मोठय़ा प्रमाणात झाल्याने शहराच्या हद्दीबाहेर अनेक नवीन वस्त्या, नगरे, कॉलनी निर्माण झाल्या आहेत. शहराच्या हद्दीबाहेर असलेल्या या वस्त्यांमध्ये सध्या पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.
नगरपालिकेच्या हद्दीबाहेर असल्याने या भागात पाणीपुरवठा योजना नाही. अशा परिस्थितीत पाणीपुरवठय़ाकरिता या नवीन वस्त्या सर्वस्वी खाजगी विहिरी, हातपंप किंवा कूपनलिकांवर अवलंबून आहे. मात्र, सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत असल्याने खामगाव शहर व परिसरातील सर्व खाजगी विहिरी, हातपंप व कूपनलिका कोरडय़ा पडल्या आहेत किंवा याची पाणी पातळी कमी झाली आहे. परिणामी, पाण्याचे हे स्रोत पूर्णाशाने पाणीपुरवठा करण्यास सक्षम राहिले नसल्याने या भागातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
शहरात पाण्याची मागणी वाढल्याने अनेकांनी पाण्याच्या वाहतुकीसाठी ‘मिनीडोअर’ घेतले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून उन्हाळ्यात पाणी विक्री करणे हा काहींचा व्यवसायच झाला आहे. १ हजार लिटर पाण्यासाठी ८० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत दाम मोजावे लागत आहेत. पिण्याचे पाणी, वापराचे पाणी, अशी यामध्ये विभागणी आढळते.
मागणीनुसार नळाचे पाणीही ‘कॅन’प्रमाणे उपलब्ध आहे. शहरात पाण्याची मागणी वाढली असल्याने शहरालगत मळे असलेल्या लोकांना नवा व्यवसाय मिळाला असून यातून त्यांना चांगलाच फायदाच होत आहे.
पाणी प्रश्न पेटल्याने घाटपुरी भागात जलवाहिनीच्या ‘व्हाल्व्ह’वर रात्रंदिवस पाणी भरणाऱ्यांची गर्दी आढळते. ज्ञानगंगा नदीवरील जलवाहिनी पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना मुबलक पाणी मिळू शकेल. मात्र, हद्दीबाहेर असलेल्या भागातील पाणीप्रश्न चांगला पाऊस झाल्याशिवाय मिटू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे.
खामगाव शहराच्या हद्दीबाहेरील खूप मोठा भाग असाही आहे, ज्यांना ना शहराशी काही संबंध आहे ना परिसरातील ग्रामपंचायतीशी. अशा भागाचा ग्रामपंचायत वा नगरपालिका निवडणुकीसाठी फारसा उपयोग होत नसल्याने राजकीय पक्षांकडून या भागाकडे दुर्लक्षच केले जाते. परिणामी, परिसरात समस्या वर्षांनुवर्षे कायम राहतात.
पाणी टंचाईचे काळातही परिस्थिती बदललेली नसल्याने या भागातील नागरिकांचा प्रशासनाविरुद्ध रोष आहे. आगामी निवडणुकीच्या काळात नागरिकांच्या या रोषाचा फटका राजकीय पक्षांना बसू शकतो. खामगाव शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे बांधकाम व्यवसाय जवळपास ठप्प झाला आहे.
बांधकामासाठी पाणीच उपलब्ध नसल्याने नवीन बांधकाम सुरू करण्याची तयारी कोणीच दाखवत नाही. याचा फटका गवंडीकाम करणारे कारागीर, मजूर व अप्रत्यक्षपणे सिमेंट, लोखंडाचे व्यापारी यांच्यावर झाला आहे. पिण्यासाठीच जेथे विकत पाणी घ्यावे लागते तेथे बांधकामासाठी पाणी आणायचे कोठून असा हा तिढा आहे.