Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भंडारा शहरात हस्ताक्षर सुधार प्रकल्प
भंडारा, २७ मार्च / वार्ताहर

बालपणीच सुंदर हस्ताक्षर काढण्याचे तंत्र विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास भविष्यात त्यांचे जीवन

 

आनंदमय होते. सुंदर हस्ताक्षर एक सुवर्णालंकार असून, त्यासाठी सर्वानी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य हंबर्डे यांनी केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा व येरली केंद्राच्या वतीने हस्ताक्षर सुधार प्रकल्प राबवण्यात येत असून, केंद्रांतर्गत येणाऱ्या शिक्षकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच जिजामाता प्राथमिक शाळा, भंडारा येथे घेण्यात आली. यावेळी प्राचार्य हंबर्डे बोलत होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बा.शा. हंबर्डे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रदीप नाकतोडे उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शक म्हणून येरलीचे केंद्रप्रमुख वसंत साठवणे, आंबागडचे सहशिक्षक जे.एन. बुंदेले हे होते.
यावेळी येरली केंद्रातील १५ शाळांमधील १७ शिक्षक उपस्थित होते. ज्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर असते, असे विद्यार्थी व शिक्षक सर्वाना आवडतात. बालपणापासून हाताला योग्य वळण देण्याचे कार्य शिक्षक करीत असतात, असे हंबर्डे म्हणाले.
डॉ. नाकतोडे यांनी हस्ताक्षराचे वळण, आकार, त्यांचे प्रमाण दोनरेघी वहीत लिहिताना घ्यावयाची दक्षता व त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करावे, याविषयी माहिती दिली.
याप्रसंगी ‘हस्ताक्षर सुधार’ या पुस्तकाचे विमोचन प्राचार्य हंबर्डे डॉ. नाकतोडे वसंत साठवणे, जे.एम. उपाध्ये कल्पना बनकर यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रकल्पात ४०० विद्यार्थी सहभागी झाले असून शाळास्तरावर ३१ मार्चपर्यंत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.