Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शोधग्रामच्या आरोग्य संसदेत ३९ गावांचा सहभाग
गडचिरोली, २७ मार्च / वार्ताहर

तालुक्यातील ३९ गावांची ‘चौथी आरोग्य संसद’ सर्चच्यावतीने नुकतीच पार पडली. शोधग्राम येथे

 

झालेल्या या संसदेत आरोग्य विषयावर चर्चा व संवाद साधण्यात आला.
गेल्या १५ वर्षांपासून सर्चचे काम या गावात सुरू असून सध्या बदलत्या जीवनशैलीनुसार गावांमध्ये आरोग्याच्या काही नवीन समस्या आहेत का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.
या आरोग्य संसदेत गडचिरोली तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे सदस्य, महिला असे ११७ प्रतिनिधी सहभागी झाले होते. याप्रसंगी अभय बंग म्हणाले की, या ३९ ही गावात गेल्या १५ वर्षांत लोकांनी सांगितलेल्या व अन्य काही आरोग्य समस्येवर सर्चने काम केले. ग्रामीण भागातील जीवन झपाटय़ाने बदलत असून नवनवीन आरोग्याच्या समस्या गावामध्ये निर्माण झालेल्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य स्वराज्य निर्माण करता आले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाचे आरोग्य चांगले व त्याच्या स्वत:च्याच हातात असले पाहिजे, आपले आरोग्य कुठल्याही शासकीय किंवा खाजगी डॉक्टरांच्या हाती असणे हे चुकीचे असून त्याला आरोग्य स्वराज्य म्हणता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुषार खोरगडे यांनी गेल्या १५ वर्षांत सर्चने केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी ११७ जणांमध्ये वेगवेगळे गट पाडून गावांमध्ये सध्या त्रासदायक वाटणारे मुख्य रोग कोणते, यावर गटचर्चा करण्यात आली. या गटचर्चेतून मुख्यत: ‘क्रॉनिक’ म्हणजे ज्यामुळे माणूस लवकर मरत नाही पण, शारीरिक त्रास भोगावा लागतो व दवाखान्याच्या वाऱ्या वारंवार कराव्या लागतात, असे रोग गावामध्ये असल्याचे दिसून आले.
मधुमेह, मूळव्याध, हृदयरोग, रक्तदाब, कॅन्सर, दमा, पोटदुखी, खर्रा, गुटखामुळे होणारा रोग, तोंड न उघडण,े डोळ्यांचे आजार, फिट येणे, दातांचे रोग, पदर जाणे, पाठदुखी इत्यादी समस्या पुढे आल्या. शेवटी गटचर्चेतून निघालेल्या २० आजारातून काही मुख्य आजारावर सर्च काम करेल, असे या वेळी ठरले.
मोहफुलापासून दारू निर्मितीचा कारखाना गडचिरोली जिल्ह्य़ात होऊ नये, याकरिता ठराव मंजूर करण्यात आला. याप्रसंगी महेश देशमुख, डॉ. संजय बैतुले आदी उपस्थित होते.