Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘एचआयव्ही’ बाधित शिक्षकाला कामावर घेण्याची मागणी प्रहारचा आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर, २७ मार्च / प्रतिनिधी

अंबुजा विद्या निकेतनच्या व्यवस्थापनाने ‘एचआयव्ही’ बाधित शिक्षकाला पूर्ववत रुजू करून

 

घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार युवा शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिला. दरम्यान, या शिक्षकाने न्यायालयात दाद मागितली आहे.
श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषदेत प्रहारचे प्रदीप देशमुख व ‘एचआयव्ही’ बाधित शिक्षकाने व्यथा मांडली. उपरवाही येथील अंबुजा विद्या निकेतन या कॉन्व्हेंटमध्ये चार वर्षांपासून काम करणाऱ्या शिक्षकाला ‘एचआयव्ही’चा आजार जडल्याने शाळा व्यवस्थापनाने त्याला बडतर्फ केले.
शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयात कार्यरत एखाद्या कर्मचाऱ्याला ‘एचआयव्ही’ हा असाध्य आजार झाला असेल तर कायद्यात दीर्घ रजेची तरतूद आहे.
सलग तीन वर्षांची सुटी देऊन त्याचा आजार बरा होतपर्यंत पगार देण्यात येतो. मात्र, अंबुजा विद्या निकेतनच्या व्यवस्थापनाने या शिक्षकाला सरळ सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. या शिक्षकाची पत्नी वर्षभरापूर्वी याच आजाराने मृत्यू पावली असून दोन मुले उपासमारीचा सामना करत आहेत. हातची नोकरी गेल्याने उपचार करण्यासाठी पैसे नाही तर मुलांना काय खाऊ घालणार, त्यांचे शिक्षण कसे करणार असे अनेक प्रश्न यावेळी शिक्षकाने उपस्थित केले. या शिक्षकाला असाध्य आजाराच्या वेदनेसोबतच आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. हा रोग प्रारंभिक अवस्थेत असल्याने या शिक्षकाने उपार घेण्यास सुरुवात केली; परंतु उपचार महागडे असल्याने व शाळा असलेल्या परिसरात हे उपचार नियमितपणे घेण्याची सोय नसल्याने हे शिक्षक ६ डिसेंबर २००७ पासून शाळेत गैरहजर होते. या काळात व्यवस्थापनाने शिक्षकास तात्काळ नोकरीवर रुजू होण्यासाठी पत्रावर पत्रे धाडली.
त्याच्या उत्तरात शिक्षकाने औषधोपचार घेत असल्याची कागदपत्रे जोडली होती; परंतु व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष करत प्राचार्य रामकृष्ण यांनी शिक्षकाला २१ ऑगस्ट २००८ रोजी एका आदेशान्वये बडतर्फ केले. शाळा व्यवस्थापनाने या शिक्षकाला पूर्ववत रुजू करून घ्यावे, अन्यथा या शिक्षकाला न्याय मिळवून देण्यासाठी अंबुजा विद्या निकेतन व्यवस्थापनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रदीप देशमुख यांनी यावेळी दिला.
व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरुद्ध मानवाधिकार आयोगासोबतच न्यायालयात सुद्धा दाद मागितली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. यासोबतच शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनाची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली.
या शाळेत काम करणाऱ्या मराठी लोकांची संख्या अधिक असताना प्रांतवादाच्या भावनेतून येथे परप्रांतीयांचा मोठय़ा प्रमाणात भरणा करण्यात येत असल्याचा आरोपही देशमुख यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला प्रहारचे कार्यकर्ते हजर होते.