Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

डीएनए चाचणीच्या अहवालासाठी अकोल्याचे पोलीस पथक नागपूरला
मूल बदलल्याचे प्रकरण
अकोला, २७ मार्च/ प्रतिनिधी

मृत बालकाचे अवशेष डीएनए चाचणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले असून अहवालासाठी

 

विलंब होत असल्यामुळे छुटलानी दांपत्यासह पोलीस पथक नागपूरला रवाना झाले आहे. जिवंत असलेले बालक डाबेराव दांपत्याचे असल्याचा पहिला अहवाल प्राप्त झाला, मात्र मृत बालकाविषयीच्या अहवालासाठी विलंब होत असल्यामुळे छुटलानी दांपत्याने रोष व्यक्त केला आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ पार्थसारथी शुक्ल यांच्या रुग्णालयात मूल बदलल्याप्रकरणी तक्रारकर्त्यां छुटलानी दांपत्याचा पोलीस यंत्रणेविरुध्दचा रोष वाढत चालला आहे. मृत बालकाचे अवशेष तसेच छुटलानी दांपत्याच्या रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले. त्याचवेळी ज्यांचे मूल बदलण्यात आले होते, त्या डाबेराव दांपत्याच्या रक्ताचे नमुनेही डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. डाबेराव दांपत्याविषयीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार जिवंत असलेले मूल डाबेराव दांपत्याचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु छुटलानी दांपत्याचा डीएनए अहवाल अनेक महिने उलटूनही मिळाला नाही. यावर छुटलानी दांपत्याने आक्षेप घेतला आहे.
त्यामुळे या अहवालासाठी हरीश व लक्ष्मी या छुटलानी दांपत्यासह पोलीस नागपूरला रवाना झाले. या अहवालासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम जाधव यांनी नागपूर प्रयोगशाळेचे उपसंचालक गजबे यांच्याशीही संपर्क साधला आणि अहवाल महत्त्वाचा असल्याने तातडीने पाठवण्याची विनंती केली. छुटलानी दांपत्याच्या अहवालानंतर या प्रकरणातील गुंतागुंत काही प्रमाणात कमी होऊ न चित्र अधिक स्पष्ट होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मूल बदलल्याप्रकरणी डॉ पार्थसारथी शुक्ल यांच्यासह रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.