Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

समीर देशमुख उभारणार बंडखोरीची गुढी!
प्रशांत देशमुख , वर्धा, २७ मार्च

वडिलांच्या चपला मुलाच्या पायात बसायला लागल्या की मुलगा कर्ता झाल्याचे बापाने समजावे,

 

अशी समाजधारणा आहे. पण मुलगा थेट त्याच चपला घालून घराबाहेर पडायला लागला की बापाने घरीच बसावे काय? याबाबत मतांतरे आहेत.
आज जिल्ह्य़ातील बलाढय़ समजल्या जाणाऱ्या सहकार गटाच्या नेतृत्वाची अशीच काहीशी अवस्था लोकसभा निवडणुकीमुळे झालेली आहे. सहकारगटात निवडणूक लढण्याबाबत कमालीची संभ्रमावस्था दिसून येत आहे. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले जिल्हा बँके चे अध्यक्ष समीर देशमुख यांनी वर्धा क्षेत्रातून निवडणूक लढण्याचा धारिष्टय़पूर्ण मनसुबा व्यक्त केला. आज बोलावलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी बंडखोरीची गुढी उभारण्याचा मनोदय व्यक्त क रून टाकला.
याच धुसफु शीतून व युवा गटाच्या दबावातून सहकारनेते प्रा. सुरेश देशमुख यांनी उद्या, २८ मार्चला वरिष्ठ सहकारी नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीतील मंथन आपल्यास अनुकुल ठरेल, अशी आशा व्यक्त करतांनाच, समीर देशमुख यांनी या बैठकीनंतरच निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय घेऊ, असेही सांगून टाकले.
समीर देशमुखांनी अडीच वर्षांपासून आपण ही निवडणूक लढण्याच्या तयारीने कामाला लागल्याचे सांगितले. पक्षाकडे तिकिट मागितले. पद्धतशीर पाठपुरावा केला. परंतु अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. कोणाला पाडायचे म्हणून उभे राहायचे असा हा ’पोरखेळ’ नाही. कार्यकर्त्यांची इच्छा दिसून आली. आतापर्यंत ५२७ गावात फि रलो. चर्चा केली. शंभरावर बैठकी झाल्या. राजकारणात राहायचे, काम करायचे, मग निवडणुकांपासूनच दूर कां, असा कार्यकर्त्यांचा प्रश्न असल्याचे समीर देशमुख सांगतात. वर्गात प्रवेश घेतल्यावर मग परीक्षा द्याव्याच लागतात. नापास झालो तर काय, अशी भीती ठेवून मग परीक्षाच द्यायच्या नाही कां, असे प्रश्न निवडणुकीसंदर्भात युवक सहकारी व्यक्त करीत असल्याचे ते म्हणाले. ही निवडणूक बसप किंवा अन्य कोणत्याही पक्षातर्फे न लढता अपक्षच लढविण्याचा विचार असल्याचे समीर देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच वडील सुरेश देशमुखांचा यास पाठिंबा अद्याप नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
राकाँला वर्धा मतदारसंघ व पर्यायाने उमेदवारी न मिळाल्याने प्रा. सुरेश देशमुख यांनी पक्षनेत्यांकडे स्पष्ट नाराजी नोंदवीत स्वतंत्र उभे राहण्याचा मनोदय व्यक्त केला. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील व अजित पवार यांनी त्यास नकार दिल्याचे ऐकायला मिळाले. मात्र पक्षश्रेष्ठी त्यांची समजूत घालत असतांनाच इकडे त्यांचे पुत्र समीर देशमुख निवडणुकीचा उमेदवारी अर्ज खरेदी करण्याच्या तयारीत होते.
यातून ज्येष्ठ विरूध्द युवा असा संघर्ष सहकार गटात सुरू झाला आहे. प्रा. देशमुख यांचे सहकारी याबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आर्वीचे दिलीप काळे, ’महानंद’चे संचालक श्रीधर ठाकरे (आष्टी), सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शफोत अहमद, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशांक घोडमारे, जि.प.उपाध्यक्ष हिंगणघाटचे सुनील राऊत व अन्य वरिष्ठ युवा गटाच्या आक्रमक पवित्र्याने स्तंभित झाले आहे. सहकारी संस्था सांभाळायच्या तर ‘पवारमर्जी’ प्राणवायू ठरतो. बंडखोरी म्हणजे त्यांच्याशी नाते तोडणे व पक्षातून हकालपट्टी किंवा त्यांच्याच मर्जीने बंडखोरी केल्याचा संदेश देणे होय. ‘इगो’चा भाग आहेच. समीर देशमुखांचे नेतृत्वच जणू या निवडणुकीपासून स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल, असा इगो. तळपातळीचा विचार म्हणजे मेघे-वाघमारे लढतीत अग्रेसर म्हणून कुणबी समाजाची मते वेळेवर मेघेंकडे वळतील. सहकार गटाची ही हक्काची मतेही पदरात पडणार नाही. शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केविलवाणा ठरू नये. अशा आशंका-कुशंका सहकार गटाच्या या वरिष्ठांच्या मनात आहेत. युवक नेत्यांच्या हट्टाला पेटून आपले राजकीय आयुष्य पणाला लावायचे कां, असा प्रश्नच एका नेत्याने याअनुषंगाने उपस्थित केला.
असे असले तरी वरिष्ठांची कचखावू वृत्तीही गटाला मागे पडण्यास कारणीभूत ठरल्याचे युवक गटाचे प्रतिपादन आहे. दुसऱ्याच्या प्रचारात राबून किती दिवस राजकोरण करणार, आम्हाला आता आमची राजकीय कारकीर्द घडवू द्या. मदत करा किंवा आशिर्वाद देवून स्वस्थ बसा, असे काहीसे निर्वाणीचे सूर युवक गटाच्या सभांमधून व्यक्त झाल्याने समीर देशमुखांवर उभा राहण्याचा मोठा दबाब असल्याचे चित्र आहे.