Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रसंतांच्या विचारांचा सर्वानाच विसर
यवतमाळ, २७ मार्च / वार्ताहर

लोकशाही आणि निवडणूक यासंबंधाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या ‘ग्रामगीता’ मध्ये

 

जे ‘निवडणुकीचे स्वयंवर’ सांगितले आहे त्याप्रमाणे राजकारण्यांनी व मतदारांनी वागावे, या अपेक्षेने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हा मजकूर ‘लोकसभा निवडणूक २००९- पूर्वपीठिका’ या पुस्तिकेत (ओवी ९१ ते ९९- अध्याय १० वा- संघटन शक्ती) ठळकपणे सुरुवातीलाच छापला आहे. मात्र, आज साऱ्यांनीच तुकडोजींच्या अपेक्षांचा भंग केला असल्याचे चित्र आहे.
‘धन वेचतो म्हणुनी गावाधिकारी करू नये कोणासी,
नाती, गोती, पक्ष पंथ, जात-पात, देवघेव यासाठी
मत देऊचि नये, दुर्जन होतील शिरजोर,
अपुल्या मताचा मिळता आधार, सर्व गावास
करतील जर्जर, न देता सत्पात्री मतदान,
मतदान नव्हे करमणूक, निवडणूक जणू स्वयंवर
ज्या हाती देणे जीवनाची बागडोर, त्यास लावावी
कसोटी सुंदर, सावधपणे!’
असे तुकडोजींनी ‘ग्रामगीते’त म्हटले असल्याची आठवण माहिती व जनसंपर्क संचालनालयाने करून दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात आज निवडणुकांचा आधार राजकीय पक्ष, पैसा, जात-पात, नाती-गोती हाच झाला आहे.
कुणालाही राष्ट्रसंतांच्या विचारांची गरज आज वाटत नाही हे कटुसत्य नाही काय, असा सवाल गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी करीत आहे.