Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बाबासाहेब धाबेकर, संजय धोत्रे, प्रकाश आंबेडकरांमध्ये काटय़ाची लढत
अकोला लोकसभा मतदारसंघ
अकोला, २७ मार्च/प्रतिनिधी
अकोला लोकसभा मतदारसंघावर असलेली भाजपची मजबूत पकड, काँग्रेसने निवडणुकीच्या

 

रिंगणात उतरवलेला बाबासाहेब धाबेकरांसारखा मुरब्बी नेता आणि भारिपबमसंचे नेते प्रकाश आंबेडकरांकडे असलेली दलितांची वोट बॅंक या पाश्र्वभूमीवर अकोल्यात काटय़ाची लढत होणार असल्याचे चित्र आहे.
१९५२ ते १९८४ पर्यंत कॉंग्रेसच्या ताब्यात या जिल्ह्य़ाची सत्ता होती. १९८९ च्या निवडणुकीत पांडुरंग फुंडकर निवडून आले आणि भाजपच्या ताब्यात हा मतदारसंघ गेला. मात्र १९९८ च्या निवडणुकीपासून वारे बदलले. भारिपबमसंचे प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले, आणि या जिल्हयाचे राजकारण भारिपबमसंभोवती फिरायला लागले. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र भारिपबमसंला हादरे बसले. कॉंग्रेसचे लक्ष्मणराव तायडे आणि प्रकाश आंबेडकर यांना मागे टाकून एक लाखाहून अधिक मतांची आघाडी घेत भाजपचे संजय धोत्रे या मतदारसंघातून निवडून आले. कॉंग्रेसपासून फारकत घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना सातत्याने या मतदारसंघात पराभवाचे तोंड पाहावे लागले. यावेळी स्वतंत्रपणे लढून कॉंग्रेसचे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय आंबेडकरांनी घेतला आहे. अ‍ॅड. आंबेडकर आणि कॉंग्रेसमधील हे वितुष्ट भाजपच्या मात्र पथ्यावर पडले आहे. त्यामुळेच ही निवडणूक अकोल्यासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे.
कॉंग्रेसने बाबासाहेब धाबेकरांसारखा प्रशासनावर पकड असणारा मुरब्बी नेता निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपला आव्हान दिले आहे. संजय धोत्रे आणि बाबासाहेब धाबेकर या दोन मराठा नेत्यांच्या संघर्षांत मतदार मात्र संभ्रमात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात बिगर मराठा मतदारांचे प्रमाणही मोठे आहे. या मतदारांचा लाभ अर्थातच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना सर्वाधिक होणार आहे. दलितांच्या मतांसह काही प्रमाणात मुस्लिम आणि माळ्यांची मिळणारी मते आंबेडकरांसाठी जमेची बाजू आहे. तसेच मराठा नेत्यांमधील गटबाजीचा लाभही काही प्रमाणात आंबेडकरांना होणार आहे. या गटबाजीचा फटका धाबेकर आणि धोत्रे या दोन्ही नेत्यांना बसणार आहे.
अंतर्गत गटबाजी, मतांचे विभाजन आणि रिंगणात उतरलेले तीन प्रबळ नेते यामुळे अकोल्यात काटय़ाची लढत होणार आहे. मतदारांची स्थिती मात्र गोंेधळलेली राहणार असल्यामुळे वीस ते पंचवीस हजार मतांच्या फरकाने या निवडणुकीतील विजय आणि पराजयाची गणिते मांडली जात आहेत. यावेळी मतदानामध्ये तरुणांचे प्रमाण सुमारे पस्तीस टक्के आहे. तरुणांचा कलही परिणामकारक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरुणांचे झुकते माप भाजप-सेना युतीकडे असल्याचे आजवर लक्षात आले आहे. त्यामुळे झालाच तर भाजप-सेना युतीला तरुणांच्या या वाढलेल्या मतांचा लाभ होऊ शकतो.