Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची उपेक्षा?
यवतमाळ, २७ मार्च / वार्ताहर

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची युती असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे काँग्रेसचे नेते दुर्लक्ष

 

करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. तर ‘वेळ मिळताच ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेऊ नंतरच प्रचाराला लागू’ असे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून समजावणीच्या सुरात सांगण्यात येत आहे.
यवतमाळ-वाशीम मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला आला असून भाजपमधून निष्कासित होऊन काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश घेतलेल्या हरिभाऊ राठोड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पिढय़ान्पिढय़ा काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या माजी खासदार उत्तमराव पाटील यांचा गट उमेदवारी मिळाली नसल्याने कमालीचा नाराज आहे. तशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दुर्लक्षित करण्याचा आरोप काँग्रेसवर होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एक स्वतंत्र मेळावा घेऊन हरिभाऊंची उमेदवारी आणि काँग्रेसची भूमिका याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता यवतमाळची जागा काँग्रेससाठी सोडली पाहिजे, कारण डॉ. मनमोहनसिंग सरकार वाचवण्यासाठी हरिभाऊ राठोड ‘शहीद’ झाले, असे पंधरा दिवसांपूर्वी स्वत: शरद पवार यांनी म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोहर नाईकांना शरद पवारांनी यवतमाळ-वाशीममध्ये उमेदवारी दिली असती तर राठोड यांना उमेदवारीच मिळाली नसती. असे असताना काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम स्वरूपाची वागणूक मिळत असल्याने दोन्ही काँग्रेसची ‘मते’ जुळली असली तरी ‘मने’ मात्र जुळली नाहीत हे स्पष्ट आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांच्या समर्थकांनी सांगितले की, चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार नरेश पुगलिया आणि अमरावतीचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यवतमाळात येऊन ठाकरेकाकांना प्रचारासाठी बोलवतात. मात्र, यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्षांना सदाशिवराव काकांना भेटण्याची गरज वाटत नाही आणि उमेदवार हरिभाऊ राठोड यांना ‘वेळ’ नाही अशी स्थिती आहे. सदाशिव ठाकरे खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष होते व ज्येष्ठ सवरेदयी नेते, सर्वाचे ‘काका’ असा त्यांचा लौकिक आहे.
काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, निवडणुकीत रुसवे-फुगवे सात-आठ दिवस चालतच असतात. पण मतदानाची वेळ जसजशी जवळ येते तशी कटुता संपून आम्ही सारे एकदिलाने लढत असतो, त्यामुळे कोणाच्याही नाराजीचा प्रश्न ‘क्षणिक’ आहे, त्याचा आमच्या विजयावर परिणाम होणार नाही.