Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

एका आवाजात सारे माघारी फिरले! आठवणी निवडणुकीच्या
भंडारा, २७ मार्च / वार्ताहर
९ फेब्रुवारी १९७१ ला गोंदिया येथे इंदिरा गांधी यांची प्रचार सभा होती. या सार्वत्रिक निवडणुकीत

 

संगठन काँग्रेसमध्ये गेलेले खासदार अशोक मेहता यांना हरवा, असा संदेश त्यांना द्यायचा होता. काँग्रेसचे उमेदवार ज्वालाप्रसाद दुबे होते. १६ मिनिटांच्या भाषणात इंदिराजींनी, अशोक मेहता म्हणजे राजेरजवाडे यांचे प्रतिनिधी अशी तोफ डागली. ‘जनता मालीक है’ असेही त्या म्हणाल्या. महिलांना उद्देशून मुलांना चारित्र्यवान, हिंमतवान बनवा, असेही त्यांनी सांगितले.
व्यासपीठ खूप उंच होते. सभेला अफाट गर्दी होती. टाळ्यांचा कडकडाट होत होता. या ‘माहोल’ मध्ये काँग्रेसचे ज्वालाप्रसाद दुबे यांना निवडून द्या, हे सांगायला इंदिराजी विसरल्या. व्यासपीठावरून खाली उतरल्यावर नाशिकराव तिरपुडे यांनी त्यांना आठवण करून दिली. या दरम्यान श्रोते जायला निघाले होते.
इंदिराजी त्वरित वर चढल्या आणि माईकवर आल्या. त्यांचे ‘भाईयों’ हे शब्द कानावर पडताच श्रोत्यांनी पुन्हा ‘अबाऊट टर्न’ केले. व्यासपीठावर इंदिराजींना पुन्हा पाहताच, जोराच्या टाळ्या पडल्या. ‘इंदिराजींचा आवेश आणि लगबग’ हाच पुढे अनेक दिवसपर्यंत चर्चेचा विषय राहिला. ज्वालाप्रसाद प्रचंड बहुमताने निवडून आले.