Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मेळघाटातील स्थलांतरित मतदारांमुळे उमेदवार चिंतेत
धमेंद्र पाटील, धारणी, २७ मार्च

येत्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मेळघाट विधानसभा

 

मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मात्र रोजगाराअभावी मेळघाटातून स्थलांतरित झालेल्या हजारो आदिवासी मतदारांचा मोठा फटका उमेदवारांना बसण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.
मेळघाटात रोजगाराची कसलीही साधने उपलब्ध नसल्यामुळे हजारो आदिवासी रोजगाराच्या शोधार्थ मेळघाटाबाहेर गेलेले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत जातीची समीकरणे प्रभावी ठरल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गुढे तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले. तिन्ही निवडणुकीत त्यांना मेळघाटवासीयांनी भरभरून मते दिली. लोकसभा निवडणुकीत निर्णायक असलेल्या मेळघाटातील आदिवासी मतदारांवरही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइंचे राजेंद्र गवई, प्रहार संघटनेचे डॉ. राजीव जामठे, समाज क्रांती आघाडीचे प्रा. मुकुंद खैरे, सेना-भाजपचे खासदार आनंदराव अडसूळ या प्रमुख उमेदवारांची मोठी भिस्त आहे.
अनेक आदिवासींनी रोजगारासाठी स्थलांतर केल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. मेळघाट विधानसभा मतदारसंघ डोंगरदऱ्यात विखुरलेला असल्यामुळे मतदारांशी संपर्क साधण्यात उमेदवारांची मोठी दमछाक होत आहे. अनेक खेडय़ात मतदारच दिसत नसल्यामुळे उमेदवारांची निराशाही होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यापूर्वीच तीन-चार प्रचार फेऱ्या पूर्ण केल्या असून, या नेत्यांचा अजूनही आदिवासी मतदारांशी संपर्क होत नसल्यामुळे उमेदवार हवालदिल होत आहेत. निर्णायक असलेले आदिवासी मतदार खेडय़ात नसल्यामुळे सर्वच उमेदवार चिंतित झालेले आहेत.