Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

गुढीपाडव्याचे निमित्त साधून नेत्यांची साखर पेरणी!
चंद्रपूर, २७ मार्च/प्रतिनिधी

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी गुढीपाडव्याचे निमित्त साधून जिल्हय़ातील

 

बडे नेते व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत साखर पेरणी सुरू केली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत उतरतांना कुणीही नाराज राहू नये यासाठी या भेटीगाठी असल्या तरी त्याचा कितपत फायदा होतो हे नंतरच कळणार आहे.
विद्यमान खासदार हंसराज अहीर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपच्या आमदार शोभा फडणवीस नाराज झाल्या आहेत. तसेही अहीर व त्यांच्यात फारसे सख्य नाही. पक्षाने घेतलेल्या पहिल्या पत्रपरिषदेत शोभाताई अनुपस्थित होत्या. आता अहीर यांना कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची असल्याने त्यांनी ताईंशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आजच्या मंगल दिवसाचे निमित्त साधून हंसराज भयांची पावले बऱ्याच वर्षांनंतर ताईंच्या मूलमधील वाडय़ाकडे वळली. मूल शहरात फडणवीसांचा वाडा गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताकेंद्र ठरला आहे. यावेळी भया व ताईंची भेट झाली, पण फार बोलणे झाले नाही अशी माहिती मिळाली. आता अहीर पुन्हा एकदा शोभाताईंना भेटणार आहेत. झालेल्या चुका विसरून आता मदत करा, अशी विनवणी भयांकडून ताईंना केली जाण्याची शक्यता आहे.
शेतकरी संघटनेचे उमेदवार आमदार वामनराव चटप यांनी आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळा धानोरकर यांची भद्रावतीत भेट घेतली. या भेटीत नेमके काय बोलणे झाले त्याचा तपशील कळू शकला नाही. चटप अपक्ष म्हणून रिंगणात असल्याने विविध राजकीय पक्षातील कोणत्या ना कोणत्या कारणाने दु:खी असलेल्या नेत्यांना भेटण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. भाजप व सेनेचे जिल्हय़ातील संबंध फारसे मधुर नाहीत, हे ध्यानात घेऊनच चटप यांनी धानोरकरांची भेट घेतली असावी, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
साखर पेरणीचे हे काम आता कॉंग्रेसमध्येही सुरू झालेले दिसते. जिल्हय़ात कॉंग्रेसचे दोन गट आहेत. या दोन्ही गटांमधून विस्तव सुध्दा जात नाही. तरीही निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार नरेश पुगलिया यांनी पक्षांतर्गत विरोधकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुगलिया यांनी भद्रावतीचे आमदार संजय देवतळे यांना फोन करून ‘झाले गेले विसरून जा आता एकत्र काम करू, शेवटी आपण एकाच पक्षाचे आहोत आणि पक्षाला महत्व देणे गरजेचे आहे’ या शब्दात साखर पेरणी केली. पुगलिया यांच्या समर्थकांनी विरोधी गटातील इतर नेत्यांशी संपर्क साधणे सुरू केले आहे. स्वत: पुगलिया येत्या एक दोन दिवसात माजी केंद्रीय मंत्री शांतराम पोटदुखे यांची भेट घेणार असल्याची माहिती आज मिळाली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व पुगलिया यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. आता निवडणुकीत कॉंग्रेसला राष्ट्रवादी कॉंग्रेसची सुध्दा मदत लागणार आहे. त्यामुळे वैद्य यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांच्यावर टाकण्यात आली आहे. प्रमुख नेत्यांनी सुरू केलेल्या या साखरपेरणीचा फायदा नेमका कितपत होतो, हे येणारा काळच ठरवणार आहे.