Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला भंडाऱ्यातील तयारीचा आढावा
लाखांदूर, लाखनी व साकोली या नक्षलवादग्रस्त क्षेत्राकडे विशेष लक्ष
भंडारा, २७ मार्च / वार्ताहर

१६ एप्रिलला होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा

 

घेण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देवाशीष चक्रवर्ती यांनी नुकताच भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
मुख्य निवडणूक अधिकारी चक्रवर्ती यांनी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात येत असलेली तयारी, कामकाजाची माहिती व अडचणी जाणून घेतल्या. जिल्ह्य़ात ११३५ मतदान केंद्रे राहणार असून निवडणुकीदरम्यान लाखांदूर, लाखनी व साकोली या नक्षलवादग्रस्त क्षेत्राकडे विशेष लक्ष राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
वाहतुकीसाठी शासकीय वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून अतिरिक्त लागणारी वाहने निवडणूक आयोगाच्या परवानगीने अधिग्रहित करण्यात येणार आहेत.
जिल्हा उपनिवडणूक अधिकारी अपघातात जखमी झाल्याने या पदावर कामकाज पाहण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती लवकर करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी करताच नागपूर विभागीय आयुक्तांना त्यांनी या पदावर त्वरित नेमणूक करण्याचे निर्देश दिले.
तीन विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक आयोग निवडणूक निरीक्षक पाठवणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय माहिती केंद्राचे जिल्हा सूचना व माहिती अधिकारी संदीप लोखंडे यांनी विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली व येणाऱ्या अडचणी सांगितल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी विनोद हरकंडे उपस्थित होते.