Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

लोकशाहीत मतदान हे शस्त्र -प्रवीण तोगडिया
पांढरकवडा, २७ मार्च / वार्ताहर
शत्रूशी लढताना पूर्वी बंदुकी, तलवार याचा वापर करण्यात येत होता. आता आपले शत्रू

 

दहशतवादी आहेत. त्यांचा नायनाट करण्याची सरकारची इच्छा नसल्यामुळे दहशतवाद फोफावला आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पांढरकवडा येथे धर्मरक्षा मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत केले.
अमेरिका- इंग्लंडमध्ये दहशतवाद्यांनी केवळ एकदाच हल्ले केल्यानंतर तेथील सरकारने कडक कायदे केले. त्यामुळे तेथे पुनश्च हल्ले झाले नाहीत. परंतु, भारतात वारंवार दहशतवादी हल्ले होत आहेत. ते थांबवण्याकरिता मदरशांना कुलूप लावणे व पाकिस्तानवर दडपण आणणे, पोलिसांना सैन्यासारखे अधिकार देणे, याकरिता सध्याची सत्ता बदलवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मतदान करावे आणि त्यातही हिंदू विचारांचा विचार करणाऱ्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
व्यासपीठावर श्रीराम जोशी महाराज, लंकेजी महाराज, शिंदे महाराज, विनय मनाडे, भाऊसाहेब मारोडकर आदी होते. सतीश सिंघानिया, अनिल हळदकर यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली, तर संचालन विवेक अंगाईनकर यांनी केले. कार्यक्रमाला स्त्री, पुरुष व युवावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.