Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

प्रचारासाठी शाळांची मैदाने वापरण्याकरिता सशर्त परवानगी
अकोला, २७ मार्च/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांदरम्यान प्रचारासाठी शाळांची मैदाने वापरण्याकरिता राजकीय पक्षांना बंधने

 

घालण्यात आली आहेत. शैक्षणिक वेळापत्रकात बदल न करता व शाळा व्यवस्थापनाची पूर्वपरवानगी घेऊन प्रचारासाठी ही मैदाने वापरता येतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने अकोल्याचे जिल्हाधिकारी मुथ्थुकृष्णन शंकरनारायणन यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांची बठक बोलवली होती. या बैठकीत प्रचार, खर्चाची मर्यादा, पोस्टर आदींविषयी सूचना देण्यात आल्या. आचारसंहितेबाबत विविध मुद्दय़ांवर यावेळी चर्चा करण्यात आली. प्रचार सभांसाठी शाळांची मैदाने वापरण्याची परवानगी विशिष्ट अटींवर देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. शाळा व्यवस्थापनाची परवानगी घेऊन, शैक्षणिक वेळापत्रकात बदल न करता ही मैदाने प्रचारासाठी वापरता येतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
स्टार प्रचारक मतदारसंघात येणार असल्यास त्याविषयीची माहिती निवडणूक आयोगाकडे देणे आवश्यक आहे. स्थानिक वाहिन्यांवर जाहिराती देण्यापूर्वीही उमदेवारांनी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच प्रचाराचे बॅनर्स, पोस्टर्स लावण्याआधीही परवानगी घ्यावी ,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या पक्षाच्या प्रतिनिधीचे नाव मतदार यादीत असणे तसेच त्याच्याजवळ निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रांवर इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे मतदार यादी उपलब्ध राहणार आहे. एकाच ठिकाणी तीनपेक्षा जास्त मतदान केंद्रे असल्यास मतदारांना नाव यादीत पाहण्यासाठी मदतनीसही उपलब्ध राहणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.