Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वीस फूट खोल खड्डय़ातून कामगाराला सुखरूप बाहेर काढले
चंद्रपूर, २७ मार्च / प्रतिनिधी

नारंडा येथील मुरली सिमेंट उद्योगात बुधवारी रात्री झालेल्या अपघातात जमिनीत वीस फूट खोल

 

खड्डय़ात ‘सायलोन’मध्ये पडलेल्या संभा दरेकर या जखमी कामगाराला तब्बल आठ सातानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दरेकर यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मुरली उद्योगाच्या व्यवस्थापनाने अपघातातील मृत साईनाथ उपरे याच्या कुटुंबीयाला पंधरा तर जखमी दरेकर याला पाच लाखाची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे जाहीर केल्यानंतर तणाव निवळला.
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे उभारण्यात येत असलेले मुरली सिमेंट निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या या उद्योगात बुधवारी रात्री ‘सायलोन’वर काम सुरू होते.
सायंकाळी पाचच्या सुमारास कामगार लोखंडी ‘बकेट एलिव्हेटर’ची दुरुस्ती करत असताना अचानक ‘बकेट’ तुटली व सायलोनमध्ये वीस फूट खोल जाऊन पडली.
त्यावेळी या बकेटवर असलेले साईनाथ उपरे व संभा दरेकर हे दोन कामगार खाली कोसळले. यापैकी साईनाथ उपरे (२६) हे जागीच ठार झाले तर संभा दरेकर जबर जखमी अवस्थेत तिथेच अडकून पडले. हा अपघात होताच उद्योगात काम करणारे सर्व तांत्रिक सहायक व अधिकारी पळून गेले.
यामुळे तिथे तणाव निर्माण झाला. कामगारांचा गोंधळ सुरू असताना काहींना संभा जिवंत असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती उद्योगातील अधिकाऱ्यांना दिली. मात्र, संभाला २० फूट जमिनीच्या खालून काढण्यासाठी तांत्रिक सहायक नव्हते. अशा वेळी लागूनच असलेल्या ‘अल्ट्राटेक’ व अंबुजा सिमेंट उद्योगातील तांत्रिक सहायकांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले. तब्बल आठ तासाच्या परिश्रमानंतर मध्यरात्री १२.३० वाजता दरेकर यांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले.
त्यांच्यावर गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, आज मुरली उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.
अधिकाऱ्यांना बघून कामगार भडकले. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला. या अधिकाऱ्यांनी मृत साईनाथच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अंत्यविधीसाठी तीस हजाराची तातडीची मदत दिली. तसेच पंधरा लाखाची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे मान्य केले.