Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

बसपचे डॉ. पोद्दार यांची उमेदवारी संकटात; नव्याचा शोध सुरू
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, २७ मार्च
बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल पोद्दार तांत्रिक दृष्टय़ा अजूनही शासकीय सेवेत असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द होऊ शकतो, हे लक्षात आल्याने पक्षवर्तुळात खळबळ उडाली आहे. वेळेवर धोका होऊ नये म्हणून दुसऱ्या उमेदवाराचा शोध पक्षाने सुरू केला आहे.

सिंधू अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षांसह संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
बोगस कर्ज प्रकरण

बुलढाणा, २७ मार्च / प्रतिनिधी
बोगस कर्जप्रकरणी ४ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून नांदुराच्या सिंधू अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह १८ ही संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधू अर्बन सहकारी पतसंस्थेचे खातेदार शंकर सीताराम मोटवानी व कांचन शंकर मोटवानी यांनी या पतसंस्थेकडून गृहतारण कर्ज प्रकरण तयार करून उचित कागदपत्रे तयार केली होती.

जिगाव धरणाचे काम बंद पाडले
मलकापूर, २७ मार्च / वार्ताहर
जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरही पुनर्वसनाच्या कामात कोणतीच प्रगती झाली नाही, तसेच पूर्णाकठी असलेल्या आडोळ भागातील बंद काम प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता अचानक सुरू करण्यात आल्याने आज शिवसैनिकांसह प्रकल्पग्रस्तांनी जिगाव धरणाचे काम पुन्हा बंद पाडले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. हरीश रावळ, दत्ता पाटील, तालुकाप्रमुख वसंतराव भोजने, संतोष दांडगे, विजय काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

राज्यभरातील गावकारभारणींचे रविवारपासून अमरावतीत अधिवेशन
‘महिला राजसत्ता आंदोलन’ या स्वयंसेवी संघटनेच्यावतीने राज्यभरातील नेतृत्वक्षम महिलांचे राज्य अधिवेशन २९ व ३० मार्चला अमरावतीत होत आहे. त्यानिमित्त-
भीम रास्कर
‘चलो अमरावती सीखें नयी राजनीती’ या घोषणेसह महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर १० हजारांहून अधिक नेतृत्वक्षम महिला अमरावती अधिवेशनामध्ये २९ व ३० मार्चला एकत्र येत आहेत. महिलांचा स्थानिक राजसत्तेतला प्रवास सुरू होऊन आज जवळजवळ १५ वर्षे होत आली. या काळात अनेक आक्षेप, आरोप, टीका, आव्हानांना सामोरं जात त्यांनी यशाच्या दिशेनं त्यांची आगेकूच कायम ठेवली आहे.

भटक्या विमुक्तांचे भंडारा जिल्ह्य़ात सर्वेक्षण
भंडारा, २७ मार्च / वार्ताहर
राज्य मागासवर्ग आयोगाकडून जिल्ह्य़ातील राजपूत भामटा, परदेशी भामटा, छत्री, पांचाळ, गोपाळ, लिंगायत, गायकी, गढेवाल, गडवाल या जाती समूहाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जाती समूहाचे पत्ते विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी भंडारा यांच्याकडे उपलब्ध नसल्याने माहिती गोळा करून आयोगाकडे अहवाल सादर करण्यास अडचण निर्माण झाली आहे.
भंडारा जिल्ह्य़ातील या जाती समूहाच्या संघटनांचा पदाधिकाऱ्यांनी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, राजगोपालाचारी वॉर्ड यांच्याशी संपर्क साधून जाती समूहाबाबत माहिती द्यावी, असे आवाहन विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

सक्तीच्या बिल वसुलीने वीज ग्राहक त्रस्त
दर्यापूर, २७ मार्च / वार्ताहर
महाराष्ट्र राज्य वीज वितरक कंपनीने मागील तीन महिन्यांपासून विद्युत ग्राहकांना मिटरचे रिडींग न घेता अवाजवी बिले देऊन सक्तीने वसुली सुरू केल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.
याची तक्रार ग्राहक वीज वितरण कार्यालयात घेऊन गेल्यास प्रथम बिल भरा नंतर दुरुस्ती करू, असे सांगितले जाते. बिल भरणार नसाल तर वीज खंडित करण्याची धमकी देऊन परत पाठविल्या जाते. त्यामुळे नाईलाजाने अवाजवी बिल भरावे लागते.

पुलगाव ग्रामीण रुग्णालयास डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार
पुलगाव, २७ मार्च / वार्ताहर
येथील ग्रामीण रुग्णालयाने २००७-२००८ या वर्षांत आरोग्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी डॉ. आनंदीबाई जोशी गौरव हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वर्धा जिल्ह्य़ात सलग दुसऱ्यांदा प्राप्त केला.
या पुरस्काराचे वितरण वर्धा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गुंजन किन्नू यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी.डी नारळवार यांनी तो स्वीकारला. लोक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पा तायडे, अधिकारी डॉ. अरुण आमले, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक गंभीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.

अवघड शस्त्रक्रियेमुळे वयोवृद्ध महिलेस जीवदान
बुलढाणा, २७ मार्च / प्रतिनिधी
येथील शल्यचिकित्सक डॉ. गणेश गायकवाड यांनी ७० वर्ष वयाच्या रुग्ण महिलेवर शस्त्रक्रिया करून ५५० ग्रॅमचा ‘मूतखडा’ काढून महिलेला जीवदान दिले आहे. बुलढाणा येथील उर्दू शायर व शल्य चिकित्सक डॉ. गणेश गायकवाड यांच्याकडे रुग्ण महिला उपचारासाठी आली होती. रुग्णांची ‘सोनोग्राफी’ व ‘एक्सरे’ केल्यानंतर रुग्णाला मोठा ‘ब्लॅडर स्टोन’ असल्याचे निदान झाले. रुग्णाचे वय पाहता डॉ. सवडतकर यांच्या सल्ल्यानुसार ‘हायरिस्क’ पेशंट म्हणून शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. रुग्णावर शस्त्रक्रिया करून ५५० ग्रॅम वजनाचा ‘ब्लॅडर स्टोन’ बाहेर काढण्यात आला. या अवघड शस्त्रक्रियेसाठी बधिरीकरण तज्ञ डॉ. सागर ठाकूर यांनी मदत केली.

आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप
बुलढाणा, २७ मार्च / प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागाने नियमबाह्य़ शिक्षकांचे समायोजन करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात २५ मार्चला कास्ट्राईब शिक्षक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी बोलताना जाधव यांनी हा आरोप केला. जिल्ह्य़ातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये मागासवर्गीय शिक्षकाला कार्यवाहीचे बडगे दाखवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विष प्राशनाने मुलगी अत्यवस्थ
खामगाव, २७ मार्च / वार्ताहर

लाखनवाडा येथील दुर्गा रामदास शिंदे (१५) हिने विषारी औषध प्राशन केल्याने अत्यवस्थ स्थितीत तिला उपचारासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समीर देशमुख उभारणार बंडखोरीची गुढी!
प्रशांत देशमुख , वर्धा, २७ मार्च

वडिलांच्या चपला मुलाच्या पायात बसायला लागल्या की मुलगा कर्ता झाल्याचे बापाने समजावे, अशी समाजधारणा आहे. पण मुलगा थेट त्याच चपला घालून घराबाहेर पडायला लागला की बापाने घरीच बसावे काय? याबाबत मतांतरे आहेत. आज जिल्ह्य़ातील बलाढय़ समजल्या जाणाऱ्या सहकार गटाच्या नेतृत्वाची अशीच काहीशी अवस्था लोकसभा निवडणुकीमुळे झालेली आहे. सहकारगटात निवडणूक लढण्याबाबत कमालीची संभ्रमावस्था दिसून येत आहे.

राष्ट्रसंतांच्या विचारांचा सर्वानाच विसर
यवतमाळ, २७ मार्च / वार्ताहर

लोकशाही आणि निवडणूक यासंबंधाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या ‘ग्रामगीता’ मध्ये जे ‘निवडणुकीचे स्वयंवर’ सांगितले आहे त्याप्रमाणे राजकारण्यांनी व मतदारांनी वागावे, या अपेक्षेने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हा मजकूर ‘लोकसभा निवडणूक २००९- पूर्वपीठिका’ या पुस्तिकेत (ओवी ९१ ते ९९- अध्याय १० वा- संघटन शक्ती) ठळकपणे सुरुवातीलाच छापला आहे.

बाबासाहेब धाबेकर, संजय धोत्रे, प्रकाश आंबेडकरांमध्ये काटय़ाची लढत
अकोला लोकसभा मतदारसंघ
अकोला, २७ मार्च/प्रतिनिधी

अकोला लोकसभा मतदारसंघावर असलेली भाजपची मजबूत पकड, काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला बाबासाहेब धाबेकरांसारखा मुरब्बी नेता आणि भारिपबमसंचे नेते प्रकाश आंबेडकरांकडे असलेली दलितांची वोट बॅंक या पाश्र्वभूमीवर अकोल्यात काटय़ाची लढत होणार असल्याचे चित्र आहे.

काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची उपेक्षा?
यवतमाळ, २७ मार्च / वार्ताहर
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची युती असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे काँग्रेसचे नेते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. तर ‘वेळ मिळताच ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेऊ नंतरच प्रचाराला लागू’ असे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून समजावणीच्या सुरात सांगण्यात येत आहे.

एका आवाजात सारे माघारी फिरले! आठवणी निवडणुकीच्या
भंडारा, २७ मार्च / वार्ताहर

९ फेब्रुवारी १९७१ ला गोंदिया येथे इंदिरा गांधी यांची प्रचार सभा होती. या सार्वत्रिक निवडणुकीत संगठन काँग्रेसमध्ये गेलेले खासदार अशोक मेहता यांना हरवा, असा संदेश त्यांना द्यायचा होता. काँग्रेसचे उमेदवार ज्वालाप्रसाद दुबे होते. १६ मिनिटांच्या भाषणात इंदिराजींनी, अशोक मेहता म्हणजे राजेरजवाडे यांचे प्रतिनिधी अशी तोफ डागली. ‘जनता मालीक है’ असेही त्या म्हणाल्या.

अ‍ॅड. वामनराव चटप यांचा ३० मार्चला उमेदवारी अर्ज
चंद्रपूर, २७ मार्च/प्रतिनिधी

स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप ३० मार्चला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेऊन ते कार्यकर्त्यांसोबत पदयात्रेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी लोकसभा मतदारसंघातील वणी, आर्णी, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने अंचलेश्वर गेट, पटेल हायस्कूल मैदान येथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडून स्वागत स्वीकारत आमदार अ‍ॅड. वामनराव चटप जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नामांकन पत्र दाखल करतील, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य तथा माजी जिल्हा प्रमुख अशोक मुसळे यांनी दिली आहे.

भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
अकोला, २७ मार्च/प्रतिनिधी

अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी भाजप पश्चिम मंडळ आणि उत्तर मंडळाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, प्रतुल हातवळणे, अतुल पवनीकर, मोहन भीरड, सुनीता मेटांगे, रणजितसिंह एललकार, रमण पाटील, विजय जुनगडे, मुकुंद बिलबिले, पप्पू वानखडे, राजू गाढे, विनोद बोर्डे, दर्शना लाजूरकर, संतोष अनासने, युवराज देशमुख, चंद्रकांत पनपालिया, अजय शर्मा आदी उपस्थित होते.

बाबासाहेब धाबेकर यांचा आज उमेदवारी अर्ज
अकोला, २७ मार्च/प्रतिनिधी
अकोला लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर शनिवार, २८ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. स्वराज्य भवन येथून बाबासाहेब धाबेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघणार आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळी १०.३० वाजता स्वराज्य भवन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबाराव विखे पाटील, दिलीप सरनाईक, महापौर मदन भरगड यांनी केले आहे.