Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
ग्रंथविश्व

सीमावादावरचा सर्वमान्य तोडगा

दोन राष्ट्रांमध्ये किंवा दोन वंशांच्या लोकांमध्ये पसरत जाणाऱ्या संघर्षांचे एक महत्त्वपूर्ण कारण एखाद्या विशिष्ट भूभागाच्या ताब्यासाठीची स्पर्धा असते. तीव्र वंशीय मतभेद, अर्थकारण किंवा संरक्षणार्थ लष्करी पवित्रा हे त्याचे दृश्य स्वरूप. जागतिकीकरणामुळे जग जवळ येत असताना असे शत्रुत्व कालबाह्य व्हावे, पण असे वाद सुरू ठेवण्यात दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. आजचे खरे आव्हान आहे ते अशा विवादांवर सर्वमान्य तोडगा काढण्याचे. सशस्त्र संघर्षांमुळे पोळलेल्यांपैकी ज्या पाच प्रदेशांबद्दल सुमंत्र बोस यांनी ‘कॉण्टेस्टेड लॅण्डस्’ हे पुस्तक लिहिले आहे; ते म्हणजे इस्राएल-पॅलेस्टाइन, काश्मीर, बोस्निया, सायप्रस आणि श्रीलंका.

 


श्रीलंका आणि काश्मीरचा प्रश्न आपल्या दृष्टीने जिव्हाळ्याचा आहे. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही महिन्यांतच १९४८-४९ मध्ये सिंहली (मूळ रहिवासी) वर्चस्व असलेल्या श्रीलंकेच्या संसदेने तेथे स्थायिक झालेल्या तामिळ लोकांचे नागरिक म्हणून असलेले सर्व अधिकार-मताधिकारासहित- रद्द करून टाकले. बहुतांश तामिळ लोक चहाच्या मळ्यांमध्ये पिढय़ान्पिढय़ा काम करणारे होते व त्यांची वस्ती श्रीलंकेच्या उत्तर व पूर्व भागात होती. या भागांत देशाच्या इतर भागातील सिंहली लोकांना स्थलांतर करण्यास सरकारने प्रोत्साहन दिले. स्थलांतराच्या प्रक्रियेमुळे दोन्ही वंशांच्या लोकांत प्रचंड कटुता निर्माण झाली. सरकारतर्फे प्रायोजित वसाहतवादाला तामिळ वंशीयांनी प्रखर विरोध केला. दोन्ही वंशांच्या लोकांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू झाला. सैन्याचा पाठिंबा सिंहलींना होता.
तामिळ लोकांमध्ये बरेच गट होते आणि त्यांचे आपसात हेवेदावेही होते. हळूहळू सर्व गट निष्प्रभ झाले आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या एका गटाचे वर्चस्व स्थापित झाले. युद्धबंदीसाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या, अधूनमधून युद्धबंदी, भारतातर्फे प्रायोजित वाटाघाटी होऊनही काही उपयोग झाला नाही. शेवटी अमेरिकेने टायगर्सला ‘फॉरिन टेररिस्ट ऑर्गनायझेशन’ ठरवून त्यांच्या नाडय़ा आवळल्या.
आज दोन्ही बाजू कंगाल झाल्या आहेत. (टायगर्स जास्तच) दोन्ही पक्षांच्या विश्वसनीयतेबद्दलही इतर देशांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे (टायगर्सबद्दल जास्तच). याबाबत सुमंत्र बोस यांचा निष्कर्ष असा आहे की, या भांडणाला संपविण्यासाठी मध्यस्थाची म्हणजे तिसऱ्या पक्षाची, गरज अटळ असते पण मध्यस्थ देश सशक्त नसला तर दोन्ही पक्ष मनमानी करतात व सोयीचे नसल्यास मध्यस्थाला उडवून लावतात.
बोस यांच्या निरीक्षणानुसार सहा दशकांपेक्षाही अधिक काळ काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सातत्याने भांडण चालले असून यात काश्मिरी जनता भरडून निघत आहे. या दोन देशांनी पुन:पुन्हा लष्करी मार्गाने भांडणाचा निकाल लावण्याचे प्रयत्न करूनही काश्मीरमध्ये दहशतवादाने थैमान घातले आहे. बोस यांनी लिहिले आहे की, अधिकृत आकडेवारीनुसार यात ५० हजार लोक मारले गेले आहेत.
या संघर्षांचा अत्यंत नाटय़मय आविष्कार आहे ७४२ किलोमीटर लांबीची ‘लाइन ऑफ कंट्रोल’. आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरच्या बाबतीत फारशी ढवळाढवळ झालेली नाही, असे बोस यांचे मत आहे. ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ किंवा ‘आग्रहाची विनंती की भांडण चिघळू देऊ नका’, इथपर्यंतच हे सीमित राहिले आहे. समरप्रसंग उभा राहिला असता अमेरिकेच्या मुत्सद्देगिरीचा सकारात्मक उपयोग झाला आहे. काश्मीरसारखा गुंतागुंतीचा प्रश्न हाताळण्याअगोदर हे ठरविले पाहिजे की, परस्परविरोधी भूमिका तात्पुरत्या का होईना बाजूला सारून अंतिम समेटाचे स्वरूप काय असावे.
यावर लोकमताने निर्णय घेणे म्हणजे बोथट हत्याराने नाजूक कोरीव काम करण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. काश्मीरसंबंधी बोस यांचे लिखाण वस्तुनिष्ठ असून त्यांची मते त्यांनी स्पष्टपणे व प्रामाणिकपणे मांडली आहेत.
पाचही विवादास्पद भूभागांच्या प्रश्नांच्या या अभ्यासातून बोस यांनी दोन महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. पहिला असा की, अशी भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थाची गरज नक्कीच असते. दुसरा असा की, शत्रुत्व संपविण्यासाठी आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी फक्त टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचे तंत्र उपयोगी पडत नाही. मध्यस्थ असला म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळेलच, अशी खात्री देता येत नाही. पण नसल्यास दोन राष्ट्रांमधली दरी सांधणे अशक्य असते. टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याला बोस ‘इन्क्रिमेन्टालिझम’ म्हणतात. म्हणजे अगोदर दोन्ही पक्षांचा विश्वास संपादन करून मतभेदांचा/ शत्रुत्वाचा एक एक मुद्दा घेऊन चर्चेला घेत समेटाचा प्रयत्न करायचा. संपूर्ण समेट झाल्यावर समेटाचे चित्र काय असणार, कसे असणार हे कुणाच्याही आकलनात येत नाही. त्या ऐवजी सुरुवातीलाच समेटाचे स्वरूप व अंतिम चित्र ठरवून टाकल्यास, टप्प्याटप्प्याने त्या उद्दिष्टाकडे जाण्यासाठी वाटाघाटी करण्यास दिशा मिळते. याने उद्दिष्ट लवकर साध्य करता येते. नाही तर लहानसहान बाबतीतच चर्चा होत राहते.
बोस यांनी ‘कॉण्टेस्टेड लॅण्डस्’मध्ये असे मत नोंदविले आहे की, आज फक्त अमेरिकाच एक आर्थिकदृष्टय़ा संपन्न आणि लष्करीदृष्टय़ा बलाढय़ असे राष्ट्र आहे की, जे भूभागासाठीच्या संघर्षांत मध्यस्थाची भूमिका यशस्वीपणे पार पाडू शकते (मग इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधला संघर्ष संपत का नाही?) बोस यांना अशी खात्री वाटते की, अमेरिकेची मध्यस्थी स्वीकार केल्यास भारत आणि पाकिस्तान यांची काश्मीर समस्या सुटू शकेल.
जयंत खेर
jayantkher@yahoo.com.in
कॉण्टेस्टेड लॅण्डस्
लेखक : सुमंत्र बोस;
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स;
पृष्ठे ३२९; किंमत रु. ३९५.