Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
विविध

खाडी परवाने रद्द झाल्याने ५०० मच्छिमार संकटात
मुंबई हल्ल्याचा फटका
बडोदा, २७ मार्च/पी.टी.आय.
मुंबईवर झालेल्या हल्ल्यात गुजरातलगतच्या सागरी क्षेत्राचा झालेला वापर लक्षात घेऊन गुजरातच्या किनारपट्टी विभागाने मच्छिमारांचे खाडी व सागरी परवाने रद्द केल्याने सुमारे पाचशे मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली आहे. या निर्णयाने मच्छिमार समाजात संतापाची लाट पसरली आहे. भारतीय मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष वेलजीभाई मसानी यांनी सांगितले की, २६ नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या हल्ल्यासाठी गुजरातलगतच्या सागरी हद्दीतून अतिरेकी मुंबईकडे रवाना झाले होते.

मुंबई हल्ल्यांचे तंत्र लक्षात घेऊन ‘जी-२०’ सुरक्षा व्यवस्थेची आखणी
लंडन, २७ मार्च/पी.टी.आय.

लंडनमध्ये दोन एप्रिलपासून सुरू होत असलेल्या ‘जी-२०’ गटांतील देशांच्या परिषदेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांनी अवलंबिलेले तंत्र लक्षात घेऊन त्यानुसार सुरक्षा व्यवस्थेची आखणी करण्यात आली आहे. वीस औद्योगिक विकसित देशांच्या ‘जी-२०’ गटाच्या या परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत.

दिल्लीत वनिता समाजाचा वधू-वर मेळावा
नवी दिल्ली, २७ मार्च/खास प्रतिनिधी

दिल्लीतील वनिता समाजाने रविवारी आयोजित केलेल्या वधुवर परिचय मेळ्याला दिल्ली आणि आसपासच्या शहरांतील महाराष्ट्रीयन विवाहेच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळ्यात दिल्ली, अलीगढ, मेरठ, गुरगाव, नोईडा, फरीदाबाद, गाझियाबाद आदी शहरांतून आलेल्या इच्छुकांनी भाग घेतला.वनिता समाजाच्या अध्यक्षा शशी कुलकर्णी आणि वधुवर मेळ्याच्या प्रमुख अनुराधा देव यांनी दीप प्रज्ज्वलन करून मेळ्याची सुरुवात केली. शशी कुलकर्णी, ज्योती कानिटकर आणि डॉ. सुलभा कोरान्ने यांनी अतिशय सहज आणि खेळीमेळीच्या वातावरणात मेळाव्यात सहभागी झालेल्या संभाव्य वर आणि वधूंना परस्परांचा परिचय करून देण्यात तसेच प्रश्न विचारण्यात पुढाकार घेतला. दिल्लीतील मराठी भाषिकांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे असे मेळावे दर सहा महिन्यांनी आयोजित करण्यात यावे, अशी मागणी अनेक पालकांनी व विवाहेच्छुकांनी केली. या मेळ्यासाठी वनिता समाजाच्या वतीने चहा, कॉफी, नाश्ता आणि दुपारच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वनिता समाजाच्या वतीने कौटुंबिक प्रश्नांबाबत समुपदेशन केंद्र सुरु करण्यात येत असून त्यात प्रामुख्याने कौटुंबिक, वैवाहिक, मुले आणि पालकांच्या प्रश्नांवर समुपदेशन करण्यात येईल, असे कुलकर्णी यांनी जाहीर केले.

दहशतवादाचा कर्करोग नष्ट करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी-ओबामा
वॉशिंग्टन, २७ मार्च/पी.टी.आय.

पाकिस्तानच्या भूमीवरून अल-काईदाचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानने दिलेले वचन त्यांनी पाळले पाहिजे. कारण दहशतवादाचा कर्करोग नष्ट करण्यासाठी पाकने अमेरिकेला मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या भूमीवर चाललेले ड्रोन हल्ल्यांना पाकचा विरोध चुकीचाच आहे. पाकिस्तानने दहशतवादविरोधी लढाईत सहाय्यकारी करण्याची दिलेली हमी त्या देशाने पाळली पाहिजे, अशी तंबी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे. पाकिस्तानमधील लोकशाही भक्कम आणि सक्षम करण्यासाठी दरवर्षी त्या देशाला दीड अब्ज अमेरिकी डॉलर मदत देण्याचे आश्वासनही अमेरिकेने दिले. अर्थात ही मदत म्हणजे ‘ब्लॅन्क चेक’ नव्हे, पाकिस्तानने दहशतवादासंदर्भात दिलेले अभिवचन पूर्ण केलेच पाहिजे, असेही ओबामा म्हणाले.

काश्मिरात घुसखोर ठार
श्रीनगर, २७ मार्च/पी.टी.आय.

उत्तर काश्मीरमधील गुरेझ जंगलपरिसरात लष्कराने घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला असून यावेळी उद्भवलेल्या चकमकीत एक घुसखोर ठार झाला. ही चकमक अद्याप सुरू आहे.
बारामुल्ला जिल्ह्य़ातील गुरेझ वनक्षेत्रातील बोगम भागाला लष्कराने वेढा दिला. या भागात लष्कर ए तयबाच्या घुसखोरांचे टोळके दडल्याचा संशय होता. त्यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. एक अतिरेकी ठार झाला असला तरी आणखी काही अतिरेकी जंगलातच दडले आहेत. नागरी वस्तीत त्यांना शिरता येऊ नये यासाठी जंगलाला वेढा घालण्यात आला आहे.एक आठवडय़ापूर्वी कुपवाडा जिल्ह्य़ातील हरफदा जंगलातही अतिरेकी लपले होते. त्यांच्यावरील कारवाईनंतर उसळलेल्या चकमकीत १७ अतिरेकी ठार झाले तर एका मेजरसह आठ जवान शहीद झाले होते.
बारामुल्लात स्फोटक हस्तगत
बारामुल्लातील गजबजलेल्या वस्तीत पोलिसांनी शक्तिशाली स्फोट घडवू शकणारे ‘इंप्रोवाइज्ड एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइस’ हस्तगत केले. सकाळच्या वेळी रस्त्यावर गर्दी असताना वाहनांच्या पार्किंगच्या जागेत एका प्रेशर कुकरमध्ये हे स्फोटक उपकरण ठेवले होते.