Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९

शल्य राहील
पंचमात शनी, दशमात गुरू-राहू, लाभात मंगळ यांचे प्रतिसाद प्रयत्नाला वेग देतील आणि कृतीला यशही मिळवून देतील. तरीही व्ययस्थानच्या रवी-बुध-शुक्र यांच्यामुळे कसले तरी शल्य टोचत राहणार आहे. उद्योगाची घडी बसवता येईल. नोकरीतल्या समस्या सुटतील. राजकारणात नवीन उपक्रम सुरू होतील. तरीही अवास्तव खर्च, पाहुण्यांची गर्दी, आरोग्याच्या तक्रारी यावर लक्ष ठेवावेच लागणार आहे.
दिनांक : २९ ते २ शुभकाळ.
महिलांना : सफलतेसाठी प्रयत्न आवश्यक

यश संपादन कराल
भाग्यात गुरू-राहू, दशमात मंगळ, लाभात सूर्य, रविवारच्या बुध-शुक्र युतीपासून वृषभ व्यक्ती अनेक क्षेत्रांत नवे नवे यश संपादन करू लागतील. त्यातून अर्थप्राप्ती आकर्षक होईल. सामाजिक प्रतिमा उजळेल. बाजारपेठेत दबदबा निर्माण करू शकाल. क्रीडा, मैदान गाजवता येईल. शनिवारच्या बुध-गुरू शुभयोगापर्यंत हुशारीने मोठी मजल मारता येईल. चतुर्थात शनी असल्याने मिळकतीच्या प्रकरणांवर लक्ष ठेवा.
दिनांक : ३० ते ३ शुभकाळ.
महिलांना : सामाजिक प्रभाव वाढेल.

समस्यांच्या गर्दीतूनही यश मिळेल
पराक्रमी शनी, भाग्यात मंगळ, दशमात सूर्य, रविवारी बुध-शुक्र युती होत आहे. समस्यांच्या गर्दीतून मार्ग शोधीत मिथुन व्यक्ती सफलता मिळवू लागतील. नवे संपर्क, नवे परिचय यातून अभिनव उपक्रमांचाही आरंभ करता येईल. व्यापार सुधारेल. राजकीय प्रभाव वाढेल. स्थगित योजनांना वेग मिळेल आणि कला-साहित्य- शिक्षणात आघाडीवर येतच राहाल. अष्टमातील गुरू-राहू नियमांच्या बाहेरच्या व्यवहारात सहकार्य करीत नाहीत, देवधर्मात मात्र साथ देतात.
दिनांक : १ ते ४ शुभकाळ.
महिलांना : परिश्रमातून सफलता मिळवता येईल.

मजल मारता येईल
रविवारच्या बुध-शुक्र युतीपासून प्रयत्न आणि प्रगतीच्या समन्वयातून कर्क व्यक्तींच्या व्यवहारातील बरीच प्रकरणे मार्गी लागतील. कदाचित नवीन उपक्रमांची रूपरेखा तयार होऊ शकेल. शनिवारच्या बुध-गुरू शुभयोगापर्यंत मोठी मजल मारता येणार आहे. कर्क कलावंतही चमकतील. शनी-मंगळ समोरासमोर असेपर्यंत शत्रू, आरोग्य, वाहनांचा वेग, प्रापंचिक प्रश्न या संबंधात संयम आवश्यक राहणार आहे.
दिनांक : २९, ३०, ३१, ४ शुभकाळ.
महिलांना : निर्णय घ्या. कृती करा. यश मिळेल.

व्यवहार सरळ ठेवा
षष्ठात गुरू-राहू, अष्टमात सूर्य-बुध-शुक्र आणि साडेसाती. घर फिरले म्हणजे वासे फिरतात या वाक् प्रचाराचा प्रत्यय अशाच ग्रहकाळामध्ये येत असतो. सरळ व्यवहार, स्वच्छ कृती, स्पष्ट निर्णय यातून सिंह व्यक्तींना प्रतिमा सांभाळावी लागणार आहे. अनिष्टता अल्पकाळाची असली तरी सतर्क राहूनच प्रवास सुरू ठेवावा लागणार आहे. श्रीरामनवमी धर्मकार्यातून आनंद देणारी आहे. साहस, स्पर्धा, वाद कटाक्षाने टाळा.
दिनांक : ३० ते ३ प्रतिष्ठेला संरक्षण मिळेल.
महिलांना : दुसऱ्यांवर विश्वासू नका.

यश चकित करील
साडेसाती असूनही पंचमातील गुरू-राहू, सप्तमात सूर्य यांच्या सहकार्याने रविवारच्या बुध-शुक्र युतीपासून कन्या व्यक्तींची आगेकूच होत राहणार आहे. आर्थिक- व्यावसायिक- सामाजिक आणि कला-साहित्य विभागात शनिवारच्या बुध-गुरू शुभयोगापर्यंत चकित करणारं यश मिळवता येईल. श्रीमारुतीची उपासना-आराधना छोटय़ा-मोठय़ा अडचणी दूर करणारी ठरेल. श्रीरामनवमी स्मरणात राहील.
दिनांक : ३० ते ३ शुभकाळ.
महिलांना : समाजात सन्मान मिळतील.

उपक्रम सुरू राहतील
चतुर्थात गुरू-राहू, नाराज बुध-शुक्र यांच्यामधून यश मिळणे अवघड असते. शनी-मंगळाचे सहकार्य निर्दोष नसले, तरी त्यातील काही आधाराने नियमित उपक्रम सुरू ठेवता येतील. व्यवहारात आवास्तव साहस करूच नका. दुसऱ्यावर विश्वासून कार्यक्रम ठरवू नका. आर्थिक देवघेवीत चोख राहणे आवश्यक ठरेल. परिवारातील मंडळी, कृषी प्रयोग, विषारी औषध यापासून सावध राहा.
दिनांक : १ ते ४ शुभकाळ.
महिलांना : नसती शुक्लकाष्ठे मागे लावून घेऊ नका.

नेत्रदीपक यशाचा काळ
पराक्रमी गुरू-राहू, पंचमात सूर्य, दशमात शनी, याच ग्रहांचे प्रतिसाद वृश्चिक व्यक्तींचे कर्तृत्व नेत्रदीपक यशाने उजळून काढू शकतील. त्यात सामाजिक कार्ये, व्यापारी सौदे, कला-साहित्याचे विषय, क्रीडा-मैदानावरील खेळ यांचा समावेश राहील. रविवारच्या बुध-शुक्र युतीपासून याची प्रचीती बहुसंख्य वृश्चिक व्यक्तींना येत राहील. चतुर्थात मंगळ असेपर्यंत प्रपंचात कुरबुरी राहतील; परंतु त्याचे प्रगतीवर परिणाम होणार नाहीत. श्रीरामनवमी उत्साही घटनांची आहे.
दिनांक : ३०, ३१, ४ शुभकाळ.
महिलांना : कराल ती पूर्व असा ग्रहकाळ आहे.

प्रगतीचा काळ
पराक्रमी मंगळ, भाग्यात शनी, अनुकूल गुरू, राहू यांच्या सहकार्याने शनिवारच्या बुध-गुरू शुभयोगापर्यंत कार्यपथावर मजल-दरमजल सुरूच राहणारी आहे. मात्र त्यातूनच अनपेक्षित संधी सापडतील. समस्या दूर होत राहतील आणि व्यवहाराची घडी बसत राहील. ठरणारी मंगलकार्ये घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतील. सामाजिक, राजकीय प्रांतात प्रभाव व दबाव वाढत राहील. बौद्धिक वर्तुळातील व्यक्तींच्या हातून विशेष भरीव कार्य उभे राहण्याची शक्यता आहे. धनू राशीतील व्यक्तींचा हा काळ प्रगतीचा काळ असेल.
दिनांक : २९, १, २, ३ शुभकाळ.
महिलांना : आनंददायी काळ असेल. त्यामुळे चिंतेचे कारण नाही.

प्रतिमा उजळत राहील
राशिस्थानी गुरू-राहू, पराक्रमी सूर्य, रविवारची बुध, शुक्र युती. घेतलेले निर्णय, केलेली कृती, ठरलेल्या बैठकी यामधील यशाने मकर व्यक्तींची प्रतिमा शनिवारच्या बुध-गुरू शुभयोगापर्यंत उजळत राहणार आहे. त्यात विज्ञान-कला-साहित्य- क्रीडा क्षेत्रातील मंडळीभोवती प्रसिद्धीची नवी नवी वलये तयार होत राहतील. व्यापार पैसा देईल. शनी, मंगळ समोरासमोर असेपर्यंत मधूनमधून छोटी-मोठी दडपणे मात्र येतच राहतील. विचलित होऊ नका. पुढे चालत राहा.
दिनांक : ३०, ३१, ४ शुभकाळ.
महिलांना : सफलतेचा आनंद मिळेल. परिणामी आठवडा चांगला जाईल.

सन्मान सांभाळा
मीन सूर्य, राशिस्थानी मंगळ, रविवारची बुध- शुक्र युती या ग्रहांमधून घबाड मिळणार नाही; परंतु सन्मानाने कार्यक्रम सुरू ठेवता येईल एवढा उत्साह मिळेल. विशेष म्हणजे त्यात अर्थप्राप्तीचा समावेश होईल. व्ययस्थानी गुरू, राहू असल्याने आश्वासन, साहस, नियम यासंदर्भात सतर्क राहा. अन्यथा मिळालेला सन्मानच समस्यांच्या गर्दीत सापडेल. बुध-गुरू शुभयोग प्रपंचातील प्रश्न मार्गी लावण्यास उपयुक्त ठरेल. शिक्षणातही हा योग प्रगतीचा आहे. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळावा.
दिनांक : २९, १, २, ३ शुभकाळ.
महिलांना : परिवार प्रसन्न राहील, प्रवास होतील, आकर्षक खरेदी व्हावी.

नवा आकार, आकर्षक यश
राशिस्थानी सूर्य, लाभात गुरू-राहू यांच्या व्यापक परिणामांची प्रचीती रविवारच्या बुध-शुक्र युतीपासून मीन व्यक्तींना येतच राहील. त्यातून कार्यक्रमांना नवा आकार देऊन आकर्षक यश संपादन करता येईल. त्यामध्ये शिक्षण, साहित्य, व्यापार, राजकारण यांचा समावेश होईल. व्ययस्थानी मंगळ असल्याने आर्थिक आढावा मात्र चुकण्याचा संभव आहे. शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवले तर षष्ठातील शनीचा त्रास कमी होईल. याबाबत मात्र थोडे सतर्कच राहा. शनिवारचा बुध-गुरू शुभयोग नवीन क्षेत्रातील प्रवेश अविस्मरणीय करणारा आहे. यामुळे तुमच्या आयुष्याला नवा आकार मिळेल व आकर्षक यशही प्राप्त होईल.
दिनांक : २९, ३०, ३१, ४ शुभकाळ.
महिलांना : मंगलकार्ये ठरतील, समाजात चमकाल, सांस्कृतिक क्षेत्रात सन्मान मिळतील. आनंदाचे वातावरण अनुभवाल.