Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९

माही रे!
युवापिढीला मतदानाकडे खेचण्यासाठी निवडणूक आयोगाचा पुकार..

रांची, २८ मार्च / पीटीआय

तरुणांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या हेतूने एखादा चित्रपट अभिनेता किंवा प्रतिथयश क्रीडापटूला ‘पोल अ‍ॅम्बेसेडर’ करण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. ‘पोल अ‍ॅम्बेसेडर’साठी सध्या तरी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव अग्रेसर आहे.

‘जय हो..’ गाणे प्रत्येकाचे..
कोची, २८ मार्च / पीटीआय

आठ ऑस्कर पुरस्कार जिंकण्याची किमया साधणाऱ्या ‘स्लमडॉग मिलिओनर’ चित्रपटाच्या ‘जय हो..’ या गाण्याने आता सर्वानाच ठेका धरायला लावले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘जय हो..’ या गाण्याचे हक्क घेतल्यापासून काँग्रेस पक्ष जणू आपणच निवडणुकीचे ऑस्कर जिंकणार या अविभार्वात वावरत आहे. परंतु ऑस्करविजेते संगीतकार दस्तुरखुद्द ए. आर. रेहमान यांनी मात्र याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळताना म्हटले आहे की, ‘जय हो..’ हे गाणे सर्वाचे आहे.

काँग्रेसच्या ‘जय हो’ला भाजपचे ‘भय हो’ प्रत्युत्तर!
नवी दिल्ली, २८ मार्च/पी.टी.आय.

काँग्रेसने ‘जय हो’ गाण्याचा मुखडा घेत प्रचाराला सुरुवात केली असतानाच भारतीय जनता पक्षाने त्याची रेवडी उडवित ‘भय हो’ हे गाणे तयार केले आहे.

घात झाला घात!
‘साहेब, घात झाला घात!’

‘बोला! आधी जरा बसा; पाणी प्या. आणि ‘एक्साईट’ न होता सांगा. कुणी केला, कसा केला, का केला आणि कुणाचा केला घात.?’ ‘मोठ्ठा लोचा आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवारांची यादी जाहीर झालीय. त्यात आपलंच नाव नाही, साहेब. अडवाणींचं आहे, मनमोहनसिंगांचं आहे, तुम्ही हल्ली प्रचारसभांमध्ये ज्यांच्यावर टीका करता त्या नरेंद्र मोदींचं आहे, त्यांना प्रशस्तीपत्र देणाऱ्या रतन टाटांचं आहे, मायावतींचं आहे. अगदी राहुलबाबाचंही नाव आहे. फक्त तुमचंच नाव नाही साहेब, पंतप्रधानपदासाठी. आता आम्ही लोकांपुढं कसं जावं? शांत राहू नका, साहेब. काही तरी कराच. हीच वेळ आहे!’

शिवसेना : कोल्हापूरमधून विजय देवणे तर हातकणंगलेमधून रघुनाथदादा पाटील यांना उमेदवारी
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी
लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने आज कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यानुसार कोल्हापूरमधून विजय देवणे यांना तर हातकणंगले मतदारसंघातून रघुनाथदादा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून कृपाल तुमाने यांची उमेदवारी कालच जाहीर करण्यात आली आहे.

नेत्यांच्याच नव्हे; मतदारांच्या वाटय़ाला कॅमेरा
दिलीप शिंदे, ठाणे, २८ मार्च

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या ठरलेल्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील १६५ मतदान केंद्रांवर पोलिसांनी संवेदनशील असे शिक्कामोर्तब केले आहे. या मतदान केंद्रांवरील हालचाली टिपण्यासाठी मतदारांचे चित्रीकरण होणार आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रातील छायाचित्रणाला निवडणूक आयोगाने मनाई केल्याने उमेदवार व प्रतिष्ठित व्यक्तींच्या मतदानाच्या छायाचित्रांना मुकावे लागण्याची शक्यता आहे.

पुणे, मालेगाव आणि औरंगाबाद येथे स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय
सुनील माळी, पुणे, २८ मार्च

पुणे, मालेगाव आणि औरंगाबाद येथे मुस्लिम समाजाचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या या समाजाच्या दोन बैठकांमध्ये करण्यात आला. मुस्लिम समाजाला गृहीत धरून आतापर्यंत त्याच्या समस्यांचे निराकरण करण्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने दुर्लक्ष केल्याने आपले प्रश्न संसदेत मांडण्यासाठी हा निर्णय करण्यात आल्याचे या बैठकीत आग्रहपूर्वक सांगण्यात आले. या निर्णयामुळे पुण्यासह अन्य ठिकाणच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपचेही लक्ष रिपब्लिकन नेत्यांवर
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी

रिपब्लिकन पक्षाने कायम भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. मात्र या निवडणुकीत रिपब्लिकन नेत्यांवर भाजपने लक्ष दिले आहे. विदर्भातील खोरिपच्या एका गटाने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. रिपब्लिकन (डे)चे नेते माजी आमदार टी. एम. कांबळे यांच्यावरही भाजपचे लक्ष आहे.

‘आता दक्षिण मध्य मुंबई हवा’
आठवलेंना ‘शिर्डी’ नको!
पुणे, २८ मार्च/खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी भवनातून काँग्रेस भवनामध्ये आलो आहे; कलमाडी, सुप्रिया आणि लांडेंना दिल्लीला संसदेत घेऊन जाण्यासाठी. आता मुंबईला चाललो आहे, बाळासाहेब ठाकरे यांना चोख उत्तर देण्यासाठी.. ..राष्ट्रवादीला रामराम ठोकून काँग्रेसच्या गोटात सहभागी झालेले रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांच्या भाषणाने टाळ्या घेतल्या खऱ्या; पण त्याचबरोबर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या संभाव्य उमेदवारीविषयीचे काही संकेतही दिले!

लालूप्रसाद यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
छाप्रा, २८ मार्च/पीटीआय

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख व रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सरण लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. लालूप्रसाद यांनी पुनर्रचनेपूर्वी छाप्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच मतदारसंघातून १९७७, १९८९ आणि २००४ साली विजय मिळवला होता. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासमवेत जाऊन लालू यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली कागदपत्रे जमा केली. त्यांनी भाजपचे राजीव प्रताप रुडी यांचा मागील निवडणुकीत साठ हजार मतांनी पराभव केला होता. १६ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रुडी व लालूप्रसाद हे पुन्हा समोरासमोर आले आहेत. ते पाटलीपुत्र मतदारसंघातूनही निवडणूक लढवीत असून, या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.

शशी थरूर यांचा तिरुअनंतपुरम येथून अर्ज दाखल
तिरुअनंतपुरम, २८ मार्च/पीटीआय

संयुक्त राष्ट्रसंघातील माजी मुत्सद्दी शशी थरूर यांनी आज तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील जिल्हाधिकारी संजय कौल यांच्याकडे त्यांनी कागदपत्रे जमा केली. या मतदारसंघातील काँग्रेसचे माजी खासदार व्ही. एस. शिवकुमार, आमदार एन. सकथन, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन कुमार हे या वेळी थरूर यांच्याबरोबर उपस्थित होते. तिरुअनंतपुरम मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष पी. के. कृष्णदास, कम्युनिस्ट पक्षाचे पी. रामचंद्रन नायर, तसेच बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नीललोहिथदासन नदार हे प्रमुख उमेदवार थरूर यांच्याविरोधात रिंगणात उतरले आहेत.

अझरुद्दीनला मुरादाबादमधून काँग्रेसची उमेदवारी
नवी दिल्ली, २८ मार्च/पीटीआय

मागील महिन्यातच काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेल्या माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याला उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. उत्तरप्रदेशमधील १४ उमेदवारांची यादी शुक्रवारी काँग्रेस पक्षाने जाहीर केली, त्यामध्ये अझरुद्दीनचे नाव ठळकपणे आहे. ४६ वर्षीय अझरुद्दीनने जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा राजस्थानच्या टोंक मतदारसंघातून त्याला लोकसभेसाठी उमेदवारी दिले जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण अखेर मोरादाबादमधून त्याला उमेदवारी मिळाली आहे.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत देवेगौडा नाहीत
विजापूर, २८ मार्च/पी.टी.आय.

आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे माजी पंतप्रधान व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी आज स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी निर्माण करण्यात देवेगौडा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते म्हणाले की, तिसऱ्या आघाडीचे समर्थक आणि घटक पक्ष वेगवेगळ्या राज्यांमध्ये विखुरलेले आहेत. प्रत्येक राज्यातील नेता आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करील. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या विजयी उमेदवारांची बैठक होईल व त्यात नेतेपदाबाबत निर्णय होईल. देशात राजकीय ध्रुवीकरण झाल्यामुळे तिसरी आघाडी प्रबळ झाल्याचा दावा करून ते म्हणाले की, खरे चित्र मतमोजणीच्या दिवशी म्हणजे १६ मे रोजीच स्पष्ट होईल. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव आणि रामविलास पासवान हे तिघे एकत्र आले आहेत, याकडे लक्ष वेधले असता देवेगौडा म्हणाले, ‘हे तिघे आता तरी यूपीएमधून बाहेर पडले आहेत; परंतु निकालानंतर ते कोणताही निर्णय घेऊ शकतील.’

डॉ. रामदॉस, वेलू यांचे केंद्रीय मंत्रीपदाचे राजीनामे
नवी दिल्ली, २८ मार्च/खास प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुका लढविण्यासाठी तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक आघाडीत सामील झाल्यामुळे आरोग्यमंत्री डॉ. अंबुमणी रामदॉस आणि रेल्वे राज्यमंत्री आर. वेलू या पीएमकेच्या सदस्यांनी आज केंद्रीय मंत्रीपदाचे राजीनामे दिले. चौदाव्या लोकसभेत पीएमकेचे सहा खासदार होते.दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये युपीएविरोधी आघाडीशी हातमिळवणी केल्यानंतर मंत्रिमंडळातून बाहेर पडून पीएमकेच्या मंत्र्यांनी राजकारणातील आदर्शवाद पाळला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे आम्ही आपले राजीनामे सादर केले, असे रामदॉस यांनी सांगितले. अतिशय जड अंतकरणाने आपण हे राजीनामे राष्ट्रपतींकडे मंजुरी पाठविणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले, असेही रामदॉस यांनी सांगितले.