Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९

पतंगरावांचा राज्याच्या राजकारणातून पत्ता कापण्याचा डाव
सांगलीचे तिकिट देऊन दिल्लीला पाठविणार
महसूल खाते राणेंना देण्यासाठी आखला ‘प्लॅन’
नवी दिल्ली, २८ मार्च/खास प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार निवडण्यावरून काँग्रेसश्रेष्ठींचा संभ्रम दूर होत नसतानाच आता या मतदारसंघासाठी राज्याचे महसूल मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नाव चर्चेत आणण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. काँग्रेसश्रेष्ठींकडून पतंगरावांना लोकसभेची उमेदवारी देवविण्याचा घाट घालण्यामागे त्यांच्याकडे असलेले महसूल खाते कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले जात आहे.

वरुण ‘ड्रामा’!
पिलभीत न्यायालयासमोर शरणागती
सोमवापर्यंत न्यायालयीन कोठडी
जेलच्या आवारात समर्थकांचा राडा
पोलिसांच्या लाठीहल्ल्यात २० जखमी
पिलिभीत, २८ मार्च/पी.टी.आय.

भाजपचे या मतदारसंघातील उमेदवार वरुण गांधी यांनी वादग्रस्त भाषणानंतर त्यांच्यावर नोंदण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात येथील स्थानिक न्यायालयासमोर शरणागती पत्करली असून सोमवापर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. २९ वर्षांंच्या वरुण गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त भाषणाबद्दल एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या वकीलांनी मुख्य न्यायदंडाधिकारी विपीनकुमार यांच्यासमोर शरणागतीचा कबुलीजबाब सादर केल्यानंतर वरुण यांच्यावर कारवाई सुरू झाली. आज पहाटेच कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह वरुण यांनी दिल्ली सोडले व ११ वाजेपर्यंत ते न्यायालयासमोर हजर झाले. भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचंड घोषणाबाजीची त्यांना साथ होती व त्यांचा बंदोबस्तावरील पोलिसांशीही संघर्ष झाला.

कोदनानी, पटेल यांना पोलीस कोठडी
अहमदाबाद, २८ मार्च/पी.टी.आय.

नरोडा पाटिया दंगलप्रकरणी अटक झालेल्या गुजरातच्या माजी मंत्री माया कोदनानी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांना एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश स्थानिक न्यायालयाने आज दिला. गोध्रा जळीतकांडानंतर २००२ मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत नरोडा पटिया व नरोडा गावातील हिंसाचारात हे दोघे सक्रीय असल्याचा आरोप आहे. विशेष पथकाने १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र शहर न्यायदंडाधिकारी इंजिनीअर यांनी चार दिवसांचीच पोलीस कोठडी मंजूर केली.

शरद पवार अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत!
पुणे, २८ मार्च/प्रतिनिधी

निवडणुकांनंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडी देशाला स्थिर सरकार देईल, असे स्पष्टपणे न म्हणता, ‘आघाडीतील घटक पक्ष निवडणुकांनंतर एकमताने नेता निवडतील आणि आघाडी स्थिर सरकार देईल,’ असे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचेच आज स्पष्ट केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पक्ष आघाडीतर्फे आज पुणे जिल्ह्य़ातील प्रचाराचा शुभांरभ करण्यात आला. या वेळी काँग्रेस भवनात आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते.

घराची भिंत कोसळून २ बालकांचा मृत्यू
मालेगाव, २८ मार्च / वार्ताहर

शहरातील नवापूर भागात घराची भिंत अंगावर कोसळून दोन बालकांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दूर्घटना घडली असून यातील मृत व जखमी एकाच कुटुंबांतील आहेत. या दुर्घटनेत मृत झालेली तससिया रफिक अहमद (४) आणि जिमाऊर रफिक अहमद (२) ही भांवडे आहेत. यंत्रमाग कामगार रफिक अहमद अब्दुल माजिद यांच्या कुटुंबियावर हा आघात झाला. त्यांच्या घराच्या मागील बाजुची भिंत अचानक कोसळू लागल्याचे लक्षात येताच स्वत: रफिक, पत्नी जमीले, मुली मुशीरा व नबीला यांनी जीवाच्या आकांताने बाहेर पळण्याचा प्रयत्न केला असता भिंत व छताचा काही भाग अंगावर कोसळ्याने ते सर्व जखमी झाले. मात्र घरातच झोपलेली त्यांची आणखी एक मुलगी तसासिया व मुलगा जिमाऊर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले व मरण पावले. जखमींवर येथील महापालिकेच्या वाडीया रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

काश्मीरप्रश्नात हस्तक्षेपास अमेरिकेचा नकार
वॉशिंग्टन, २८ मार्च/पी.टी.आय.

काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करण्यास अमेरिकेने स्पष्ट नकार दिला असून भारत आणि पाकिस्तानात परस्परविश्वास वाढविण्यासाठी मात्र सहकार्याची तयारी दर्शविली आहे. परदेशी पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जन. जेम्स जोन्स यांनी ही माहिती दिली. भारत आणि पाकिस्तानात संबंध सुधारावेत यासाठी सकारात्मक धोरणात्मक सहकार्याची ग्वाही अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे. ‘याचा अर्थ अमेरिका काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करणार काय’, असा प्रश्न पाकिस्तानी पत्रकाराने विचारला होता. त्यावर जोन्स यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. काश्मीरप्रश्नात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा आमचा विचार नाही मात्र भारतीय उपखंडात शांतता प्रस्थापित व्हायला हवीच, अशी आमची ठाम भूमिका आहे, असे ते म्हणाले.

राणे, राऊत, पावसकर यांना नोटीस
सावंतवाडी, २८ मार्च/वार्ताहर

उद्योगमंत्री नारायण राणे, खासदार संजय राऊत आणि आमदार किरण पावसकर यांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारीबाबत म्हणणे मांडण्यासाठी लेखी स्वरुपात कळविण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग निवडणूक विभागाचे यमगर यांनी दिली. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कळणे येथे सुरू असलेल्या खाण प्रकल्पाच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस मेळाव्यात लोकांना नको असेल तर खाण प्रकल्प बंद करण्याबाबत विचार करू, असे वक्तव्य केले होते. त्या व्यक्तव्याबाबत शिवसेना आमदार परशुराम उपरकर यांनी आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार किरण पावसकर यांनी सुरेश प्रभू यांच्या प्रचारसभेत प्रक्षोभक वक्तव्य केले असल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष हेमंत कुडाळकर यांनी दाखल केली. या द्वयींनी प्रक्षोभक वक्तव्य करून आचारसंहिता भंग केला असल्याकडे या तक्रारीत वेधण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात या तक्रारी आल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे, असे यमगर यांनी सांगितले. या लेखी तक्रारींबाबत चित्रीकरण पाहून पडताळणी केली जाईल. त्यानंतर निर्णय घेण्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केले आहे.

उपनगरीय रेल्वे न थांबल्याने मालाडमध्ये प्रचंड गोंधळ
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी

चर्चगेटहून बोरिवलीसाठी निघालेली जलद उपनगरीय गाडी अंधेरीनंतर धिम्या मार्गावरून धावत असतानाही मोटरमनच्या दुर्लक्षामुळे ती मालाड स्थानकात थांबविण्यात आली नाही. गाडी मालाडच्या पुढे गेल्यानंतर ही चुक मोटरमनच्या लक्षात आली. परंतु, तोपर्यंत चांगलाच गोंधळ उडाला होता. मालाडच्या पुढे ही गाडी अर्धा तास एकाच जागेवर उभी होती. त्यामुळे मागून येणाऱ्या गाडय़ांची वाहतूकही ठप्प झाली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी