Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९

चुका सुधारून कामाला लागा - पवार
परभणी, २८ मार्च/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे राजकारण विद्वेषावर आधारित आहे. समाजात वैरभाव निर्माण करणारे आहे. अशा राजकारणाला थारा न देता मराठवाडय़ातला सर्वसामान्य माणूस हा विकासाला पाठिंबा देतो हे या निवडणुकीत सिद्ध करा, असे सांगून झालेल्या चुका दुरुस्त करण्याची काळजी घ्या. मराठवाडय़ातल्या आठही मतदारसंघात एकजीवाने झोकून देऊन कामाला लागा, असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले.

असे का?
संमेलन आणि वाद. संबंध अगदी निकटचा. आणि बिकटचा! वर्तमान पाहा, इतिहास चाळा. पटकन जाणवेल ही बाब. भविष्यात डोकावता येत नाही.! नाही तर तिथेही दिसेल तो. बीड येथे गेल्या महिन्यात नाटय़ संमेलन पार पडले. त्याच काळात अमेरिकेत पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन झाले. महाबळेश्वरला परवा परवाच अखिल भारतीय साहित्य संमेलन होऊन गेले. आपली सांस्कृतिक परंपरा किती समृद्ध आहे, हे दाखविणारी ही तीन संमेलने. त्याच बरोबर लक्षात येतात त्या निमित्ताने झालेले वाद.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात बेसुमार वृक्षतोड
नांदेड, २८ मार्च/वार्ताहर

वृक्ष संवर्धन व नवीन वृक्ष लावण्यासाठी राज्य शासन लाखो रुपये खर्च करीत असताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. अविनाश सरनाईक यांच्या इच्छेखातर अनेक वृक्षांची बेसुमार कत्तल सुरु आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेनंतर डॉ. जनार्दन वाघमारे व डॉ. सूर्यवंशी या कुलगुरुंनी विद्यापीठ परिसरात हजारो झाडे लावली.

डॉ. कोत्तापल्ले : सत्शिष्य नि कृतज्ञ सहकारी
लेखक होणं हे जसं माझ्या आयुष्याचं एक ध्येय होतं त्याचप्रमाणं प्राध्यापक होणं, हेही माझ्या आयुष्याचं एक उद्दिष्ट होतं. सर्वाना आपल्या मनातली सारी उद्दिष्टं साध्य करता येतातच, असं नाही.मलाही माझी सर्व उद्दिष्टं साध्य करता आलीत, असं नाही. जी साध्य करता आली त्यांचं समाधान मला आता या आयुष्याच्या सायंकाळी निश्चित आहे. जवळपास तीन तपांपेक्षा अधिक काळ मी प्राध्यापक होतो व अध्यापनाचा मनमुराद आनंद मी या काळातल्या प्रत्येक सेकंदात लुटला आहे. मी निवृत्त होऊन कितीतरी वर्षं झाली- जवळपास दोन दशकं झाली- तरी पण माझे विद्यार्थी मला रोज भेटत असतात.

‘लातूरमध्ये शहर बसवाहतूक लवकरच सुरू होणार’
लातूर, २८ मार्च/वार्ताहर

लातूर नगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत पुष्कराज ट्रॅव्हल्सच्या वतीने शहर बसवाहतूक सुविधा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणार असून अद्ययावत सुविधा उपलब्ध असलेली ही राज्यातील आदर्श सेवा ठरेल, असा विश्वास पुष्कराज ट्रॅव्हल्सचे व्यंकट पनाळे, युवराज पनाळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. १५ वर्षांनंतर लातूर शहर बस वाहतुकीची सुविधा नगरपालिकेच्या पुढाकाराने सुरू होत आहे.

केरसुणी उद्योग संकटात
सोयगाव, २८ मार्च/वार्ताहर

जंगलात शिंदीचा झाडे कमी झाल्यामुळे घरातील स्वच्छता राखणाऱ्या केरसुणी उद्योगावर संकट आल्याने केवळ या व्यवसायावर पोट भरणाऱ्या कुटुंबासमोर उपासमारीची पाळी आली आहे. झोपडीपासून सिमेंटच्या चकाकणाऱ्या घरात स्वच्छता राखण्यासाठी सकाळ-संध्याकाळ केरसुणीचा वापर होतो. काळाच्या प्रवाहाबरोबर शहरात केरसुणीऐवजी झाडूचा वापर होत असला तरी ग्रामीण भागात आजही घर झाडण्यासाठी केरसुणीचा वापर केला जातो.गेल्या तीन पिढय़ांपासून केरसुणीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाच्या प्रमुखाने सांगितले की, जंगलात मिळणाऱ्या शिंदीच्या झाडापासून पानाच्या केरसुणी तयार करण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे.

गंगाखेड तालुक्यात दोन गावांत डेंग्यूची लागण; एकाचा मृत्यू
गंगाखेड, २८ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील महातपुरी व कोद्री या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या दत्तवाडी व पोखर्णी (वाळके) या गावांतील ग्रामस्थांना डेंग्यूच्या तापीने ग्रासले असून दोनच दिवसाूंर्वी महेश जयराम यादव (वय ४, रा. पोखणी वा.) या मुलाचा डेंग्यूच्या तापाने मृत्यू झाला आहे. तर दोन्ही गावांत सुमारे ५० जणांना तापाची लागण झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, तालुका आरोग्य प्रशासन तातडीने उपाययोजनांच्या कामाला लागल्याचेही वृत्त आहे. तालुक्यातील अनेक भागांत पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची वानवा जाणवत असतानाच विहिरीवरील व हातपंपांचे पाणी प्यायल्याने तसेच गावातील अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढल्याने अनेकांना डोकेदुखी, चक्कर येणे व तापाची लागण झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, कोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पोखर्णी (वाळके) गावातील महेश यादव याचा डेंग्यूची लागण झाल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तर गावातीलच दत्तराव देवकते (वय ११) या मुलासही डेंग्यूची लागण झाल्यााने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय प्रशासनाने ही बाब गंभीर घेत गावात उपाययोजना सुरू केल्या आहेत.

कल्याण काळे यांच्या उमेदवारीवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब
जालना, २८ मार्च/वार्ताहर

जालना लोकसभा मतदारसंघातून आमदार डॉ. कल्याण काळे यांची उमेदवारी आता निश्चित झाली आहे. शनिवारी परभणी येथे झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार काळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबच झाले. परभणी येथील मेळाव्याहून परतलेल्या जालना जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच आमदार डॉ. काळे यांचा उल्लेख जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असा केला. त्यानंतर काही वेळातच परभणीतून जालना शहरातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना दूरध्वनी आले. आमदार काळे यांची उमेदवारी जालना जिल्ह्य़ात गृहीत धरलेलीच होती. जालना लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी सलग चार वेळेस भाजपाचा उमेदवार विजयी झालेला असला तरी ज्ञानदेव बांगर काँग्रेसचे उमेदवार असताना काठावरच त्यांचा पराभव झाला होता. त्याचप्रमाणे आणखी एका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार स्वतंत्ररीत्या उभे असल्याने भाजप उमेदवाराचा विजय सोपा झाला होता. या वेळेस आमदार काळे यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये रंगतदार लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेना-भाजप युतीचा आज औरंगाबादमध्ये मेळावा
औरंगाबाद, २८ मार्च/खास प्रतिनिधी

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता जालना रस्त्यावरील ईडन गार्डन येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, भाजपाचे माजी आमदार श्रीकांत जोशी, आमदार किशनचंद तनवाणी, महापौर विजया रहाटकर, उपमहापौर भाऊसाहेब वाघ आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, भाजपा शहराध्यक्ष अतुल सावे यांनी केले आहे.

पैठणमध्ये २१ मतदान केंद्रे संवेदनशील
औरंगाबाद, २८ मार्च/खास प्रतिनिधी

जालना लोकसभा मतदारसंघात पैठण तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यात २८५ पैकी २१ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याची माहिती तहसीलदार केशव नेटके यांनी दिली आहे. या निवडणुकीच्या मतदान केंद्रांच्या कामासाठी पैठण तालुक्यातील १२५० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्यात ७५० शिक्षकांचा समावेश आहे. २१ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मतदान केंद्रावरील मतदान अधिकारी व कर्मचारी यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधेसाठी प्रथमच कल्याण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण २ व ३ एप्रिल आणि १५ व १६ एप्रिल या दोन टप्प्यांत उत्तर जायकवाडीच्या कम्युनिटी सभागृहात ठेवण्यात आले आहेत. पैठण तालुक्यात २ लाख २४ हजार ७६७ मतदार आहेत. त्यात १ लाख १९ हजार २०५ पुरुष व १ लाख ५ हजार ५६२ महिला मतदारांचा समावेश आहे.

उस्मानाबाद मतदारसंघात उमेदवारी अर्जासाठी गर्दी
उस्मानाबाद, २८ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघासाठी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १६ उमेदवारी अर्ज इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतले. पहिला अर्ज घेतला तो अखिल भारतीय सुशिक्षित बेरोजगार संघटना पक्षाचे हरिदास माणिकराव पवार यांनी. बऱ्याच हौशी व्यक्तीनींही आज विनामूल्य मिळणारा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतला.
उमरगा तालुक्यातून तीन इच्छुक उमेदवार आहेत. लातूर, औसा आणि बार्शीमधीलही इच्छुकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजेरी लावली. १६ जणांपैकी अनेक नवीन चेहरे होते. लातूर जिल्ह्य़ातील वासनगाव येथील एकाने सर्वोच्च न्यायालयात वकिली करीत असल्याचा दावा केला. यापूर्वी त्यांनी रायबरेलीतून निवडणूक लढविल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. दरवेळी जवळपास सर्वच निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे नवनाथ उपळेकर यांनीही अर्ज घेतला. येणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी अर्ज दिला जात होता. १२ पानांचा उमेदवारी अर्ज आणि १७ पानांचे शपथपत्र असे अर्जाचे स्वरूप आहे.

डॉक्टर व उद्योजकांनी सांगितले यशाचे गणित
औरंगाबाद, २८ मार्च/खास प्रतिनिधी

यशाचे शिखर गाठायचे असेल तर केवळ खडतर मेहनत करून भागणार नाहीत तर आजुबाजुची बदलत असलेली परिस्थिती ध्यानात घेऊन पावले टाकली पाहिजेत. यासाठी आपल्या क्षेत्रातील आवश्यक असलेले कौशल्य कसे मिळवता येईल याचा सातत्याने विचार करायला हवा, असा सूर ‘आम्ही असे घडलो’ या कार्यक्रमात उमटला. व्हिजन एज्युकेशनल ग्रुपच्या वतीने शुक्रवारी हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘असे घडलो आम्ही’ या व्याख्यानाचे आयोजन वाळूजच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. त्यामध्ये सुहास तेंडुलकर, हनुमंत भोंडवे, राहुल नरवडे, डॉ. राहुल बडे, डॉ. अनुराधा निकम आदी वक्ते सहभागी झाले होते. सुहास तेंडुलकर यांनी उद्योजकांनी जबाबदारीचे काम करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. डॉ. राहुल बडे यांनी अभ्यासातील सातत्याला महत्त्व दिले. गरिबीतून प्रेरणा मिळाल्याचे हनुमंत भोंडवेंनी सांगितले. डॉ. अनुराधा निकम यांनी वर्गासोबतच स्वअध्ययनावरील लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.

बांधकाम परवाना विचारायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण
औरंगाबाद, २८ मार्च/प्रतिनिधी

घराचे बांधकाम सुरू असताना त्याचा परवाना विचारण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला जोरदार मारहाण करण्यात आली. ही घटना पुष्पनगरी भागातील शक्तीनगरमध्ये घडली. शहरात अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकाम जागोजागी पाहायला मिळतात. अधूनमधून महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी अवैध बांधकामांना रोखण्यासाठी पावले उचलतात. मनपाचे वॉर्ड अधिकारी रवींद्र निकम यांना या भागात विनापरवाना बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाली. रमेश घोडके याच्याकडे बांधकामाचा परवाना नसल्याची शंका आल्याने स्वत: श्री. निकम आणि मनपाचे कर्मचारी सुरेश संगेवार, अब्बास, श्री. टाक हे घटनास्थळी गेले.
घोडकेकडे बांधकामाचा परवाना विचारला असता त्याने परवाना दाखविण्यास विरोध दर्शवीत संगेवार यांना बेदम मारहाण केली. संगेवार यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे.

चार जुगाऱ्यांना अटक
औरंगाबाद, २८ मार्च/प्रतिनिधी

शहर पोलिसांनी दोन ठिकाणी छापे घालून चार जुगाऱ्यांना मुद्देमालासह अटक केली. कांचनवाडी येथील तुकाराम शेटे याच्या शेतात काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी एकनाथ कांबळे आणि बाबुराव शेटे हे दोघे जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून सात हजार ४०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. दुसरा छापा छावणी भागात घालण्यात आला. भास्कर गॅस एजन्सीसमोर रिक्षा स्थानकावर दोनजण जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आलेल्या या छाप्यात शेख बाबा शेख सुलेमान आणि अब्दुल हकीम अब्दुल रहीम हे दोघे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख साडेआठ हजार रुपये आणि रिक्षा जप्त केली.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
औरंगाबाद, २८ मार्च/प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सतत सात महिने बलात्कार करून नंतर तिला पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीमपुरा येथे ही घटना घडली. रमेश साक्रुबा साळवे (२२, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) आणि बंडू उर्फ अहेलाडी टोम्पे (धनगर पिंप्री, अंबड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रमेश याने एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सात महिने तिच्यावर बलात्कार केला. यात बंडू त्याला मदत करत होता. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रमेश आणि बंडूने तिला पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

राष्ट्रवादीने सन्मान दिल्यास मदत करू - मधुकर चव्हाण
उस्मानाबाद, २८ मार्च/वार्ताहर

मनात किल्मिष आहे त्यामुळे राष्ट्रवादीला मदत करायची की नाही याचा निर्णय उद्या तुळजापुरात होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी दिली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी त्यांच्याच मताची ‘री’ ओढली. सन्मानाने वागणूक दिली तरच सहकार्य करू, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मुख्य संघटकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जिल्ह्य़ात नसल्याचे एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. ठेकेदारी व उमेदवारीचे आमिष दाखवून कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचे काम चालू आहे. ते थांबवून कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत असेल तरच काँग्रेसचे पदाधिकारी काम करतील, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता उद्या या संदर्भातला निर्णय होणार असल्याचे सांगितले.परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संयुक्त मेळाव्यातही आपण हीच भूमिका मांडल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. यासंदर्भात महसूल राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्याशीही चर्चा झाली आहे. त्यामुळे मार्ग निघेल, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

भटक्यांनी केला रस्त्यावर गुढीपाडवा साजरा!
मानवत, २८ मार्च/वार्ताहर

गेल्या सत्तर वर्षांपासून गावोगावी फिरून लोहाराचा धंदा करणाऱ्या छगन अंबादास सोळंके यांनी रस्त्याच्या कडेला उघडय़ावर आपला संसार थाटला असून रस्त्यावर टाकलेल्या पालावर गुढी उभारून नवीन वर्षांचे स्वागत केले आहे. छगन सोळंकेशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता मूळ राहणार पाथरीचा असून शेतीतील अवजारे जसे कुऱ्हाड, कुदळ, टिकास तयार करणे तसेच संसारोपयोगी विळी, डबे तयार करणे यासाठी मराठवाडय़ातील परभणीसह जालना, हिंगोली जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात प्रवास करत असल्याचे सांगितले. आज गुढीपाडव्यासारखा सण आम्ही रस्त्यावर संसार थाटून आनंदाने साजरा करत असल्याचे सांगितले. तर माझी तिसरी पिढी या रस्त्यावरच आहे. आज माझा मुलगा राजू सोळंके त्याच्या मुलाबाळासोबत राहत आहे. आमचा संसार एका बैलगाडीत असतो तर आमचे कुत्रे आमचे संरक्षण करतात, असेही त्यांनी सांगितले.

गेवराईच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना जामीन मंजूर
गेवराई, २८ मार्च/वार्ताहर

गेवराई पोलीस ठाण्यावर १९ मार्चला झालेल्या दगडफेक व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी नगराध्यक्ष प्रशांत भागवत व उपनगराध्यक्ष अ‍ॅड्. लक्ष्मण पवार यांना येथील न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. शहरातील भगवती हॉटेलवर पोलिसांनी १९ मार्चला धाड टाकली होती. त्यानंतर यावरून अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि गेवराई पोलिसांत वाद झाला. काही संतप्त युवकांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.याप्रकरणात नगराध्यक्ष प्रशांत भागवत, उपाध्यक्ष पवार यांच्यासह ३० जणांवर गुन्हे दाखल झाले होते. या दोघांनी बीड न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला; परंतु न्यायालयाने २८ मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले. याप्रकरणी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून गेवराई न्यायालयात हे प्रकरण वर्ग केले. शनिवारी दुपारी गेवराई न्यायालयाने वरील दोघांना जामीन मंजूर केला. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पोलिसांनी बीडच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविले आहे.

महाराष्ट्र शेतकरी शुगर्सच्या कार्यालयाचे उद्घाटन
सोनपेठ, २८ मार्च/वार्ताहर

सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथे प्रस्तावित महाराष्ट्र शेतकरी शुगर लि. या सुमारे २२५ कोटी रुपये भागभांडवलाच्या खासगी तत्त्वावरील साखर कारखान्याच्या संपर्क कार्यालयाचे पाडव्याच्या मुहुर्तावर उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक अभिजीत देशमुख यांनी कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उपस्थित पत्रकार व शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना कारखाना उभारण्यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, कारखान्यातर्फे सायखेडा शिवारामध्ये १४८ एकर जमीन संपादित करण्यात आली असून यापैकी सुमारे १२२ एकर क्षेत्रावर कारखान्याची उभारणी करण्यात येणार आहे. प्रतिदिन ३५०० मेट्रिक टन उसाची गाळप क्षमता असलेल्या या कारखान्यामध्ये साखरेसह २० मेगाव्ॉट वीज व तीस हजार किलो लिटर अल्कोहोलचे सह उत्पादन घेण्यात येणार आहे.

बालाजी मंदिरात आज माहेश्वरी स्नेहमिलन
लातूर, २८ मार्च/वार्ताहर

लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने शहरात बालाजी मंदिर गार्डन येथे रविवार, २९ मार्चला सायंकाळी ५ वाजता स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष रामपाल सोनी , अखिल भारतीय माहेश्वरी सेवा सदनाचे अध्यक्ष पुष्कर, रामकुमार भुतडा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, माजी अध्यक्ष नारायणलाल कलंत्री, महाराष्ट्र युवा संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री हे उपस्थित राहणार आहेत. वक्ते म्हणून राधेश्याम चांडक हे मार्गदर्शन करणार आहेत.