Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पतंगरावांचा राज्याच्या राजकारणातून पत्ता कापण्याचा डाव
सांगलीचे तिकिट देऊन दिल्लीला पाठविणार
महसूल खाते राणेंना देण्यासाठी आखला ‘प्लॅन’
नवी दिल्ली, २८ मार्च/खास प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार निवडण्यावरून काँग्रेसश्रेष्ठींचा संभ्रम दूर होत

 

नसतानाच आता या मतदारसंघासाठी राज्याचे महसूल मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नाव चर्चेत आणण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. काँग्रेसश्रेष्ठींकडून पतंगरावांना लोकसभेची उमेदवारी देवविण्याचा घाट घालण्यामागे त्यांच्याकडे असलेले महसूल खाते कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेसने अद्याप जाहीर न केलेल्या राज्यातील लोकसभेच्या नऊ जागांमध्ये सांगली मतदारसंघाचाही समावेश आहे. सांगलीचे तिकीट मिळविण्यासाठी पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत यांनी मावळते खासदार प्रतीक पाटील यांना आव्हान दिले आहे. प्रतीक की विश्वजीत हा तिढा काँग्रेसश्रेष्ठींना गेल्या महिन्याभरापासून सोडविता आलेला नाही. विश्वजीत यांना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा असला तरीही स्व. वसंतदादा पाटील यांचा राजकीय वारसा चालविणारे प्रतीक पाटील यांचे तिकीट कापण्याच्या निर्णयाप्रत येणे काँग्रेसश्रेष्ठींना जमलेले नाही. त्यामुळे विश्वजीत कदम यांचा विचार होणार नसेल तर अजित घोरपडे यांना तिकीट मिळावे म्हणूनही प्रयत्न सुरु झाले आणि सुरुवातीला तिकीटासाठीची असलेली थेट शर्यत तिहेरी झाली आणि श्रेष्ठींपुढील गुंतागुंत कमी होण्याऐवजी आणखीच वाढली.
याच संभ्रमावस्थेचा फायदा घेऊन गेले काही दिवस उमेदवार निवडीच्या निमित्ताने दिल्लीत तळ ठोकून बसलेले मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगलीचे ‘निर्विवाद’ उमेदवार म्हणून पतंगराव यांचे नाव पुढे केल्याचे समजते. चार दशकांपासून राजकारणात असलेल्या पतंगरावांना दिल्लीत जाण्यास भाग पाडून त्यांचा राज्याच्या राजकारणातून पत्ता कापायचा त्यामागचा दीर्घकालीन उद्देश आहे. पण या चालीमागचा अल्पकालीन उद्देशही तेवढाच ‘आकर्षक’ असल्याचे म्हटले जात आहे. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केल्याच्या निषेधार्थ महसूल मंत्री पदाचा राजीनामा देणारे नारायण राणे यांच्याकडचे खाते गेल्या डिसेंबरमध्ये पतंगरावांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर चव्हाण यांनी पुढाकार घेत राणे यांची नाराजी दूर केली आणि पक्षश्रेष्ठींकडून त्यांचे निलंबनही रद्द करवून घेतले आणि त्यांना पुन्हा राज्य मंत्रिमंडळात आणले. पण पतंगरावांकडे असलेले महसूल खाते राणेंना मिळू शकले नाही. अशोक चव्हाण आणि राणे यांची मैत्री लपून राहिलेली नाही. सांगलीमध्ये उमेदवार ठरविण्याचा वाद चिघळल्यामुळे पतंगरावांच्याच गळ्यात उमेदवारी अडकवून त्यांच्याकडे महसूल खाते सोडवून घेण्यासाठी चव्हाण यांनी ही खेळी केल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे. पतंगरावांना उमेदवारी देण्याचा डाव यशस्वी झाला तर पुढच्या सात महिन्यांसाठी चव्हाण महसूल खाते पुन्हा राणेंना सोपविणे शक्य होणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पतंगरावांना अडकविण्याचे चव्हाण यांचे डावपेच कितपत यशस्वी होतात, याचीच चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरु आहे.