Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वरुण ‘ड्रामा’!
पिलभीत न्यायालयासमोर शरणागती
सोमवापर्यंत न्यायालयीन कोठडी
जेलच्या आवारात समर्थकांचा राडा
पोलिसांच्या लाठीहल्ल्यात २० जखमी
पिलिभीत, २८ मार्च/पी.टी.आय.

भाजपचे या मतदारसंघातील उमेदवार वरुण गांधी यांनी वादग्रस्त भाषणानंतर त्यांच्यावर नोंदण्यात

 

आलेल्या गुन्ह्यासंदर्भात येथील स्थानिक न्यायालयासमोर शरणागती पत्करली असून सोमवापर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. २९ वर्षांंच्या वरुण गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त भाषणाबद्दल एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या वकीलांनी मुख्य न्यायदंडाधिकारी विपीनकुमार यांच्यासमोर शरणागतीचा कबुलीजबाब सादर केल्यानंतर वरुण यांच्यावर कारवाई सुरू झाली. आज पहाटेच कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह वरुण यांनी दिल्ली सोडले व ११ वाजेपर्यंत ते न्यायालयासमोर हजर झाले. भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचंड घोषणाबाजीची त्यांना साथ होती व त्यांचा बंदोबस्तावरील पोलिसांशीही संघर्ष झाला.
‘वादग्रस्त भाषणाबद्दल आपल्याविरोधात कट रचण्यात आला असून यात आपल्याला गुंतविण्यात आले आहे. पण कायदा आणि न्यायपालिका या संस्थांवर आपला पूर्ण विश्वास असून आपली प्रसंगी तुरुंगात जाण्याचीही तयारी आहे. आपल्या तत्वांवर आपला पूर्ण विश्वास असून ती जपण्यासाठी अखंड लढा देण्याची मानसिक तयारी आहे, असे वरुण गांधी यांनी शहरात पोचल्यानंतर कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना सांगितले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने वरुण यांची त्यांच्याविरोधातील गुन्हे रद्द करण्याची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी आपल्या धोरणांमध्ये बदल केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वरुण यांनी त्यांना दिलेल्या जामिनाची मुदत वाढविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना न्यायालयासमोर जाऊन अटक करवून घेणे पसंत केले. त्यांच्या वकीलांनी येथील स्थानिक न्यायालयात तात्काळ जामिनासाठी अर्ज दाखल केला, पण सोमवापर्यंत त्यावर सुनावणी तहकूब करण्यात आली. जिल्ह्यातील तुरुंगामध्ये वरुण यांना न नेण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांचा पोलिसांशी संघर्ष झडला. तुरुंगाच्या आवारात या कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली. आपला इथे येण्याचा मुख्य उद्देश माझा देश, माझा समाज आणि माझे चाहते यांना सक्षम करणे हा आहे. आता आपण माघार घेणार नाही. जर आपल्याला तुरुंगात जावेच लागले तर त्यातून आपला लढा पुढे नेण्याचे आपल्या समर्थकांना बळ मिळणार आहे, असेही वरुण यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले. दरम्यान, वरुण प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते व पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी मौन बाळगल्याबद्दल काँग्रेस पक्षाने प्रचंड टीका केली असून त्यांच्या संमतीशिवाय पिलिभीतमध्ये आजची नौटंकी झालीच नसती अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.