Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शरद पवार अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत!
पुणे, २८ मार्च/प्रतिनिधी

निवडणुकांनंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडी देशाला स्थिर सरकार देईल, असे स्पष्टपणे न म्हणता, ‘आघाडीतील घटक पक्ष निवडणुकांनंतर एकमताने नेता

 

निवडतील आणि आघाडी स्थिर सरकार देईल,’ असे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचेच आज स्पष्ट केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पक्ष आघाडीतर्फे आज पुणे जिल्ह्य़ातील प्रचाराचा शुभांरभ करण्यात आला. या वेळी काँग्रेस भवनात आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंह हेच पुढील पंतप्रधान असतील, हे जाहीर केल्यानंतरही आज पवार यांनी त्यांच्या भाषणात वेगळा सूर लावला. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी झाली असली, तरी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचार करू किंवा पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास डॉ. सिंग हेच पंतप्रधान होतील, अशी ग्वाही दूरच; पण या गोष्टीचा उल्लेखही त्यांनी भाषणातून टाळला.
अनेक पक्ष ही निवडणूक लढवत असले, तरी खरी लढाई ‘एनडीए’ व ‘यूपीए’ यांच्यातच आहे. त्यामुळे ‘यूपीए’तील सर्व घटक पक्षांनी एक समान धोरण ठरवून मतदारांसमोर जावे असा माझा प्रयत्न होता, पण त्यात यश आले नाही, अशीही कबुली पवार यांनी या वेळी दिली. ‘एनडीए’ने पंतप्रधान म्हणून लालकृष्ण अडवाणी यांचे नाव घोषित केले आहे, तसेच काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंग यांना ‘प्रोजेक्ट’ केले आहे. कोणी कोणाला ‘प्रोजेक्ट’ करायचे हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु अशा वेळी प्रत्येकाची पाश्र्वभूमी, धोरणे व राजकीय गरज बघितली पाहिजे, असे सांगून ‘निवडणूक झाल्यानंतर आघाडीतील प्रत्येक पक्षाचे नेते एकत्रिपणे नेता निवडतील,’ अशा शब्दांत त्यांनी डॉ. सिंग यांचे पंतप्रधानपद हे गृहीत नाही, असेच सूचित केले.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव न घेता त्यांच्यावरही पवार यांनी टीका केली. निवडणुका स्वबळावर लढवायच्या असतील, तर मग सरकारही एकटय़ानेच चालवायची भूमिका घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, देशात बळकट सरकारची आवश्यकता असून तसे सरकार आले तर देशाचा आणि राज्याचाही विकास होणार आहे, असे प्रतिपादन केले.
सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कार्याध्यक्ष जयंतराव आवळे, आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले, राष्ट्रवादीचे महासचिव गोविंदराव आदिक, काँग्रेसचे सचिव मोहन प्रकाश, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री डॉ. पतंगराव कदम, दिलीप वळसे, हर्षवर्धन पाटील, महापौर राजलक्ष्मी भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, आघाडीचे उमेदवार खासदार सुरेश कलमाडी, सुप्रिया सुळे, आमदार विलास लांडे, तसेच आमदार रमेश बागवे, चंद्रकांत छाजेड, विनायक निम्हण, अनंतराव थोपटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जयदेव गायकवाड, अनिल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.