Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९
प्रादेशिक

‘लोकसत्ता’च्या ब्लॉगला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद!
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी

आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांचा आवाज जगभरात पोहोचविण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ब्लॉगला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारतातील राजकीय पक्ष आणि राजकारणी यांच्याविषयी ब्लॉगवर नोंदल्या गेलेल्या प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाच्या आहेत. सर्व वाचकांनी ‘लोकसत्ता’ने अशा प्रकारचा ब्लॉग सुरू करून आपले मत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन केले आहे.

‘माय मुंबई’त नाओमी
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी

लग्नाचा मंडप सजवल्याप्रमाणे मुलांनी सजवलेला स्टेज..ताटकळत उभे असलेले कॅमरेमन्स..वाट बघत असलेले पत्रकार..आणि तुडुंब भरलेला ग्रॅण्ड हयातचा हॉल..अशा वातावरणात स्टेजवर नाओमी कॅम्बेलचे आगमन झाले आणि कॅमेऱ्यांचा एकच लखलखाट झाला. टाळ्यांनी हॉल दणाणून गेला. मुंबईवर २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना अर्पण करण्यात आलेल्या ‘माय मुंबई’ या शोसाठी सुपरमॉडेल नाओमी कॅम्बेल खास मुंबईत लॅक्मे फॅशन विकमध्ये सहभागी झाली होती.

महापौरांच्या ‘दिवे बंद’ आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद
मुंबई, २८ मार्च / प्रतिसाद

‘ग्लोबल वॉर्मिग’ या समस्येविषयी जनजागृती करण्याच्या उद्देषाने महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी ‘पृथ्वीसाठी एक तास’ या अभियानाअंतर्गत घरातील तसेच कार्यालयातील दिवे बंद करण्याचे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला मुंबईकरांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. महापौर बंगला आणि दहिसरमधील (प.) काही सोसायटय़ांमध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद लाभला.

रेड एफएमने जाहीर केले ‘बजाते रहो’ पुरस्कार
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी

श्रोत्यांनी दिलेली पसंती आणि व्यक्त केलेल्या मतांवर आधारीत रेड एफएमचे ‘बजाते रहो’ हे आगळे पुरस्कार शुक्रवारी मुंबईत जाहीर करण्यात आले. बॉलीवूड, संगीत, क्रिकेट, टीव्ही आदी विविध क्षेत्रांसाठी रेड एफएमने हे आगळे पुरस्कार दिले.

नौदलातील रॉकेट्ससह दोघांना अटक
आयुक्तांचा मात्र फटाके असल्याचा दावा

मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी
केवळ संरक्षण दलात, विशेषकरून नौदलात वापरले जाणारे ‘पॅराशूट सिग्नल रॉकेट’आणि ‘स्पीड थ्विंगरॉकेट’च्या साठय़ासह आजमगढ येथे पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना शुक्रवारी वडाळा पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, रेल्वे पोलीस आयुक्त ए. के. शर्मा यांनी रॉकेट्सचा नाहीतर फटाक्यांचा साठा मिळाल्याचा दावा केला आहे.

चेंबूर येथून निवडणुकांसाठी आलेल्या बनावट नोटा जप्त
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी
बनावट नोटांसह मुंबईत दाखल झालेल्या तिघांना आरसीएफ पोलिसांनी आज दुपारी चेंबूर येथून अटक केली. प्रचाराच्या काळात लोकांमध्ये पैसे वाटण्याच्या हेतूने एका राजकीय नेत्याने या बनावट नोटा मागविल्या होत्या, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दोन वेगवेगळ्या अपघातात १० वर्षांच्या मुलासह दोघे ठार
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी

घाटकोपर आणि विक्रोळी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात १० वर्षांच्या मुलासह दोघे ठार झाले तर एकजण जखमी झाला. घाटकोपर येथे बस थांब्यावर उभ्या असलेल्या १० वर्षांच्या मुलाचा बेस्ट बसने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला, तर विक्रोळी येथील कारने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. दोन्ही घटना शुक्रवारी रात्री घडल्या.

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या
दादर शाखेचे उद्या उद्घाटन
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी

डोंबिवली नागरी सहकारी बॅंकेच्या दादर शाखेचा शुभारंभ ३० मार्च रोजी ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बॅंकेच्या मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा आणि औरंगाबाद आदी जिल्ह्यात एकूण तीस शाखा कार्यरत आहेत.
बॅंकेला पाच नवीन शाखा सुरू करण्यासाठी रिझव्र्ह बॅंकेने परवानगी दिली असून त्यापैकी तीन शाखा यापूर्वीच सुरू झाल्या आहेत. दादर शाखेचा उद्घाटन सोहळा शिवाजी मंदिरराच्या राजर्षी शाहू सभागृहात साजरा होणार असून या प्रसंगी इंडियन र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष एम. एन. चैनी, बॅंकेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत. बॅंकेची शाखा कासा मारिया बिल्डिंग, गोखले मार्ग, पोर्तुगीज चर्चजवळ, दादर (पश्चिम) येथे आहे.सध्या बॅंकेच्या १ हजार २०० कोटींहून अधिक ठेवी असून सातशे कोटींहून अधिक कर्जव्यवहार आहेत. बॅंकेचे भागभांडवल ४१ कोटींहून जास्त असून गेल्या आर्थिक वर्षांत बॅंकेने ३२ कोटी रुपये इतका नफा मिळवला आहे. डोंबिवली नागरी सहकारी बॅंक ही देशातील अग्रगण्य शेडय़ुल्ड बॅंक म्हणून ओळखली जाते. बॅंकेच्या एटीएम कार्डद्वारे देशभरातील विविध राष्ट्रीयकृत व खासगी बॅंकांच्या ४ हजार ५०० हून अधिक एटीएममधून पैसे काढण्याची विनामूल्य सुविधा उपलब्ध आहे.

ओव्हल मैदानात जोडप्याला लुटले
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी

सायंकाळच्या वेळेस फेरफटका मारायला गेलेल्या जोडप्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच हजार रुपये आणि मोबाईल लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चर्चगेट येथील ओव्हल मैदानात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका चोराला अटक केली असून त्याचे दोन साथीदार अद्याप फरारी आहेत. तपन (३२) आणि पूजा गिरी (२८) हे चर्चगेट येथील पुष्पकुंजमध्ये राहणारे जोडपे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता ओव्हल मैदानात फेरफटका मारायला गेले होते. अचानक तीन तरूण आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवत गिरी दाम्पत्याकडून पाच हजार आणि मोबाईल चोरून पळ काढला. लोकांनी तीन चोरांपैकी दिनशे वासुदेव भारसाणी (२३) याला पकडले. मात्र त्याचे दोन साथीदार थापा आणि आझाद हे निसटण्यात यशस्वी झाले.