Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९

आनंदऋषीजी यांच्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त नगरमधील धार्मिक परीक्षा बोर्डात आयोजित प्रवचनात आदर्शऋषिमहाराज, विनोदमुनीजी, महेंद्रऋषिजी, आशिषमुनीजी यांनी भाविकांना माहिती देऊन उपदेश केला. या वेळी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते.

विविध उपक्रमांनी नगरमध्ये आनंदऋषींची पुण्यतिथी साजरी
नगर, २८ मार्च/प्रतिनिधी

शांतिमार्च, रक्तदान, आरोग्य शिबिरे, अन्नदान, महाप्रसाद वाटप आदी विविध सामाजिक उपक्रमांनी आज शहरात आचार्य आनंदऋषीमहाराज यांचा १७वा पुण्यस्मृतिदिन साजरा करण्यात आला. शहर-जिल्ह्य़ासह राज्यातील हजारो भाविकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. धार्मिक परीक्षा बोर्ड येथील आनंदऋषीजींचे समाधीस्थळ हजारो भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
घासगल्लीतील जैन स्थानकापासून सकाळी ८ वाजता शांतीमार्चला प्रारंभ झाला. \

रंगांचे स्वभावविश्व
‘रंग’ हा शब्द आपण
आपल्या रोजच्याच बोलण्यात
अगदी सहज वापरतो.
कधी म्हणतो
‘काय रंगीला माणूस आहे’
तर कधी मला तिथे बघून
त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले
असं म्हणतो
कधी एखादा कार्यक्रम ‘रंगलाच’ नाही असं सांगतो
तर याच रंग शब्दाचा वापर
अनेक गाजलेल्या गीतांमधून
ऐकू येतो

प्रमुख उमेदवारांसह २५जणांनी ६२ अर्ज नेले
नगर, २८ मार्च/प्रतिनिधी

नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांतील बहुतेक इच्छूक उमेदवारांनी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उमेदवारी अर्ज नेले. दाखल मात्र कोणीच केला नाही. अर्ज नेणाऱ्यांमध्ये दिलीप गांधी, शिवाजी कर्डिले, तुकाराम गडाख, राजीव राजळे, रामदास आठवले, का. वा. शिरसाठ यांचा समावेश आहे. एकूण २५जणांनी ६२ अर्ज नेले. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आज सुरुवात झाली.

जिंकण्यासाठीच बसपतर्फे आखाडय़ात - गडाख
नेवासे, २८ मार्च/वार्ताहर
राष्ट्रवादीने चांगली वागणूक न देता केवळ चर्चेत वेळ घातला. आता चर्चेची वेळ गेली आहे. निवडणूक जिंकण्यासाठीच बसपतर्फे नगरच्या आखाडय़ात उतरणार आहे, असा निर्णय खासदार तुकाराम गडाख यांनी पानसवाडीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला. सकाळी १० वाजता कार्यकर्त्यांची बैठक झाली. तुकाराम काळे, रामकिसन साळुंके आदींसह सुमारे दीड हजार कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.

राजळे गुरुवारी अर्ज भरणार
पाथर्डी, २८ मार्च/वार्ताहर
येत्या दि. २ एप्रिलला जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय आमदार राजीव राजळे यांनी घेतला. नगर येथे आपल्या निवासस्थानी निवडक कार्यकर्त्यांशी या संदर्भात त्यांनी आज चर्चा केली. मनसेतर्फे उमेदवारीची गळ या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घातली होती. मात्र, अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

मुंबईतील हल्ल्यात स्थानिकांचा सहभाग अजून स्पष्ट नाही - विर्क
राहाता, २८ मार्च/वार्ताहर
मुंबईत गेल्या २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याची चौकशी आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या हल्ल्यात स्थानिकांचा सहभाग आढळल्यास व त्यांच्याविरुद्ध पुरावे जमा झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस महासंचालक एस. एस. विर्क यांनी दिली.निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपण नाराज नाही, असेही त्यांनी सांगितले. श्री. विर्क यांनी आज दुपारी शिर्डीत साईदर्शन घेऊन पाद्यपूजा केली. पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे, उपअधीक्षक बी. जी. यशोद, संगमनेरचे उपअधीक्षक बुरसे, निरीक्षक नवलनाथ तांबे, शौकतअली शेख, संस्थानचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे उपस्थित होते. सन १९७०मध्ये नगरला पोलीस अधीक्षक म्हणून काम केले.

----------------------------------------------------------------------------

‘विखे, गडाख व राजळे आघाडीत सक्रिय होतील कर्डिलेंचा विश्वास
श्रीगोंदे, २८ मार्च/वार्ताहर

भाजपअंतर्गत जिल्ह्य़ात सुरू असणाऱ्या वादाचा फायदा होणार असतानाच, जिल्ह्य़ातील काँग्रेस व राष्ट्रवादीतील परिस्थिती दोन दिवसांत बदलून खासदार बाळासाहेब विखे, खासदार तुकाराम गडाख व आमदार राजीव राजळे आघाडीच्या प्रचारात सक्रिय होतील, असा विश्वास व्यक्त करून राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी राजळे नगर मतदारसंघातील प्रचारप्रमुख राहतील, असे आज तालुक्याच्या संपर्क दौऱ्यात बोलताना स्पष्ट केले.तालुक्यातील २८ गावांना कर्डिले भेटी देणार होते. सकाळी सांगवीदुमाला, गार, कौठे, आर्वी, अजनूज गावांना भेटी दिल्या.

कर्डिलेंचे मताधिक्य घटविण्याचे गांधींपुढे आव्हान
नगर तालुक्याच्या अस्तित्वासाठी लोकसभा निवडणुकीचे निमित्त साधून पूर्वीचे गुरू-शिष्य व अलीकडच्या काळातील एकमेकांचे कट्टर विरोधक आमदार शिवाजी कर्डिले व माजी खासदार दादापाटील शेळके यांचे मनोमिलन झाले. ही बाब उमेदवार कर्डिले यांच्या पथ्यावर पडेल. शिवाय केलेल्या विकासकामांची शिदोरी व सर्वसामान्यांशी सततचा संपर्क याचाही त्यांना आघाडी वाढविण्यास फायदा होईल. भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांना मात्र तालुक्यात चांगलेच झगडावे लागेल, असे सध्याचे चित्र आहे. पुनर्रचनेत नगर (उत्तर) मतदारसंघाचे त्रिभाजन होऊन नगर तालुका विधानसभेच्या तीन मतदारसंघांत विभागला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपला नेता कोण, हा प्रश्न भेडसावत आहे. तालुक्याचे राजकीय अस्तित्व टिकवायचे असेल, तर तालुक्याचा प्रतिनिधी लोकसभेत हवा, ही सर्वसामान्यांची भावना.

धुमाळांचा प्रवेश कर्डिलेंच्या पथ्यावर!
पुनर्रचनेत विधानसभेच्या राहुरी मतदारसंघाचे विचित्र विभाजन झाले. आमदार चंद्रशेखर कदम यांचा प्रभाव असलेला देवळाली प्रवरा परिसर श्रीरामपूरमध्ये मतदारसंघात समाविष्ट झाला, तर उर्वरित तालुका नगरला जोडण्यात आला. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष रामदास धुमाळ यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना होईल. भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांची सारी भिस्त कदम व निष्ठावंतांवर अवलंबून आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी मराठी नेतेमंडळी सरसावली आहेत.

मौन अण्णांचे अन् काँग्रेस मंत्र्यांचे!
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रथम मौन आणि नंतर सुरू केलेले उपोषण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुटले. मौन सोडावे म्हणून कृषिमंत्री बाळासाहेब थोरात राळेगणसिध्दीला शिष्टाई करण्याकरिता गेले होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय धुळवड सुरूझाली आहे. मात्र, कृषिमंत्री थोरात व शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे हे राजकीय मौन बाळगून आहेत.

आचारसंहिता भंग तपासणीसाठी नगर व शिर्डीत सहा भरारी पथके
जिल्हा बँकेबाबत स्वतंत्र चौकशी

नगर, २८ मार्च/प्रतिनिधी

निवडणूक प्रचारातील जाहीर सभांमधून नेत्यांच्या भाषणातील आक्षेपार्ह बाबींची तपासणी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती तयार करण्यात आली, तसेच आचारसंहिता भंगाची तपासणी करण्यासाठी दोन्ही मतदारसंघांत ६ भरारी पथके तैनात केली आहेत. दरम्यान, जिल्हा बँकेने आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारीची स्वतंत्र चौकशी करण्यात येत असून, बँकेच्या कार्यकारी संचालकांनाही सोमवापर्यंत (दि. ३०) अहवाल देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

आठवलेंनी मागितले कपबशी चिन्ह
नगर, २८ मार्च/प्रतिनिधी

शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करताना रिपब्लिकन नेते रामदास आठवले कपबशी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. तसा अर्ज त्यांनी राज्य निवडणूक आयोगास मुंबईत व नगरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देऊन कपबशी चिन्ह आरक्षित करण्याची मागणी केली.
रिपाईंचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक गायकवाड यांनी ही माहिती दिली. कपबशी आरक्षित करण्याच्या मागणीच्या अर्जाची प्रत आज गायकवाड यांनी शिर्डी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबूराव केंद्रे यांना दिली. आठवले यांनी यापूर्वी पंढरपूरमधून विमान चिन्हावर निवडणूक लढविली. दरम्यान, आठवले यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा काँग्रेसकडून दिल्लीत एक-दोन दिवसांत होईल. त्यानंतर ते दि. ३ किंवा ४ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करतील. काल मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मंत्री नारायण राणे, रिपाईंचे प्रदेशाध्यक्ष प्रीतमकुमार शेगावकर यांच्या बैठकीत रामदास आठवले यांच्या नावावर शिर्डीच्या जागेसाठी शिक्कामोर्तब केले. आठवले यांना शिर्डीतून विजयी करण्याची जबाबदारी खा. बाळासाहेब विखे व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टाकण्यात आली आहे. आघाडीच्या जागावाटपात शिर्डीची जागा काँग्रेस पक्षाच्या वाटय़ाला आली आहे. शिर्डी मतदारसंघात विरोधी पक्ष विषारी अफवा सोडून गैरसमज निर्माण करीत आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला. त्याला योग्य वेळी उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजास आरक्षण द्यावे ही मागणी संसदेत आठवले यांनी प्रथम केली. देवगडच्या (नेवासे) भाविकांसाठी पंढरपूरला नदीपात्रात घाट बांधण्यासाठी आठवले यांनी निधी दिला. संसदेत सर्वाधिक वेळ उपस्थित राहून सर्वाधिक प्रश्न आठवले यांनी विचारले असल्याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले.

काळे यांना विरोध करणाऱ्या निष्ठावंतांना मुंबईस बोलावले
कोपरगाव, २८ मार्च/वार्ताहर

आमदार अशोक काळे यांनी शिवसेनेतच राहण्यास निष्ठावंत शिवसैनिकांनी विरोध केल्यानंतर जिल्हाप्रमुख (उत्तर) बाबासाहेब डमाळे, जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब जाधव, तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे आदी पदाधिकाऱ्यांना येत्या सोमवारी (दि. ३१) मुंबईत मातोश्रीवर बोलावण्यात आले आहे. या संदर्भात श्री. डमाळे म्हणाले की, आमदार काळेंनी सेनेशी गद्दारी केली. शिवसैनिकांची फसवणूक केल्याने त्यांना आमचा विरोध असून, निष्ठावंतांना त्यांनी कधीच विश्वासात घेतले नाही. त्यांच्या भूमिकेमुळे ग्रामपंचायती व नगरपालिकेत शिवसेनेला सत्ता मिळू शकली नाही. या पाश्र्वभूमीवर तीन चारी येथे निष्ठावंतांची बैठक बोलावली होती. त्याची दखल घेत तूर्त मेळावा घेऊ नका, मातोश्रीवर चर्चा करण्यासाठी यावे, असा भ्रमणध्वनी आल्याने मी, जाधव, चांदगुडे आदी पदाधिकारी सोमवारी मातोश्रीवर चर्चेसाठी जाणार आहोत. नवा-जुना वादाबाबत कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे कसा समेट करतात, याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान, आमदार काळे यांनी मुंबईत शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन सेना हाच माझा पक्ष आहे, असे स्पष्ट केले. त्यावर पक्षाचे काम जोरात करा, सेना तुम्हाला डोक्यावर घेईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. विधानसभेच्या निवडणुकीस अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत काळे जुन्या-नव्यांशी कसे मिळते-जुळते घेतात, यावरही बरेचसे अवलंबून राहणार आहे.

कार्यकर्त्यांची चुळबूळ!
एका राष्ट्रीय पक्षाच्या नगर तालुक्यातील बैठकीत भाषणे रंगात आलेली. मात्र, त्याच वेळी अल्पोपहार तळण्याचा खमंग वासही सभास्थानी दरवळू लागला. त्यामुळे प्रचाराच्या नियोजनापेक्षा पोटपूजा नियोजनाचाच विचार कार्यकर्त्यांच्या डोक्यात घोळू लागला. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून एक एक कार्यकर्ता अध्यक्षीय भाषण चालू होताच उठू लागला. सभेतील चुळबूळ पाहून वडा-जिलेबीच्या वासाचे महत्त्व संयोजकांच्या लक्षात आले. त्याने मुख्य भाषण सुरू असतानाच मध्येच विनंतीवजा सूचना केली. कुणीही उठू नका, सर्वासाठी नाष्टय़ाची सोय केली आहे. परंतु उपाशीपोटी राजकीय तत्त्वज्ञान ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या कार्यकर्त्यांनी स्वयंपाकघर जवळ करणे सुरूच ठेवले. ही चुळबूळ अध्यक्षीय भाषण करणाऱ्याच्याही लक्षात आल्याने त्यांनी सभामंडप पुरता रिकामा होण्यापूर्वीच एकदाचे ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ करीत भाषणाला पूर्णविराम दिला.

----------------------------------------------------------------------------

तनपुरे’ने उर्वरित पेमेंट न केल्यास आंदोलन - पोटे
राहुरी, २८ मार्च/वार्ताहर

डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामातील उसाचे ३०० रुपये प्रतिटनप्रमाणे उर्वरित आगाऊ पेमेंट व्याजासह त्वरित मिळावे; अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करील, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पोटे यांनी दिला. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याच्या संचालक मंडळाने प्रामाणिक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. कामधेनू वाचविण्यासाठी बाहेरच्या कारखान्यांच्या आमिषाला बळी न पडता ऊस दिला. ११०० रुपये पहिले आगाऊ पेमेंट देण्याची ग्वाही अध्यक्ष रामदास धुमाळ यांनी दिली. सभासदांचा विश्वास बसावा, म्हणून हंगाम चालू असताना झालेल्या उसाचे ११०० रुपये याप्रमाणे पेमेंट केले. मात्र, हंगाम बंद होताच ८०० रुपये प्रतिटन पेमेंट बँकेत वर्ग करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. वास्तविक ऊस गळितास गेल्यानंतर १५ दिवसांत पेमेंट करणे बंधनकारक आहे.

श्रीसाई सत्चरित्र पारायण सोहळ्यात ४०० भाविक सहभागी
कोपरगाव, २८ मार्च/वार्ताहर

येथील श्रीसाईबाबा तपोभूमी मंदिरात ४०० भाविक श्रीसाई सत्चरित्र पारायण सोहळ्यास बसले आहेत. गुरुवारी (दि. २ एप्रिल) सकाळी ९ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने पारायणाची सांगता होईल. गुढीपाडव्याला अखंड ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. शुक्रवारी (दि. ३) श्रीराम नवमीनिमित्त सकाळी काकड आरती, श्रींचे अभ्यंगस्नान, सकाळी १० ते १२ श्रीराम जन्मावर उमेशमहाराज दशरथे यांचे कीर्तन, माध्यान्ह आरती, प्रसाद, धूपारती, शेजारती असे कार्यक्रम होतील. त्यानिमित्त येथील श्रीसाईबाबा तपोभूमी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साईबाबा तपोभूमी मंदिरात व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, साई कला, क्रीडा मंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी साईबाबांची पालखी शहरातून काढण्यात आली.

औषध विक्रेत्यास लिंपणगावमध्ये लुटले
श्रीगोंदे, २८ मार्च/वार्ताहर

तालुक्यात औषधविक्री करून जाणाऱ्या बारामती येथील सेल्समनला लिंपणगाव येथे १ लाख २० हजार रुपयांना अज्ञात चोरटय़ांनी लुटले. हा प्रकार काल रात्री पावणेआठ वाजता घडला. या प्रकरणी विजय आनंदराव काकडे (रा. कांचननगर, बारामती) यांनी फिर्याद दिली. बारामती येथील ठोक औषधे पुरविणाऱ्या एका कंपनीत काकडे सेल्समन आहेत. दर आठवडय़ाला ते तालुक्यातील औषधे दुकानात देण्याचे काम करतात. काल नेहमीप्रमाणे त्यांनी तालुक्यात हे काम करून रात्री पावणेआठ वाजता रिक्षाने ते व चालक लिंपणगाव शिवारातील श्रीगोंदे-काष्टी रस्त्याने चालले असता अचानक पाठीमागून दोन क्रमांक नसलेल्या मोटरसायकलवरून चौघे आले. रिक्षापुढे खिळे असणारी लाकडी फळी टाकून गाडी थांबविली. फिर्यादी व चालक यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोकड पळविली.

मुलिकादेवी विद्यालयाच्या प्रगतीत वराळ यांचे योगदान - झावरे
निघोज, २८ मार्च/वार्ताहर

विद्वत्ता आणि गुणवत्ता यांच्या सुरेख संगम म्हणजेच प्राचार्य टी. के. वराळ हे समीकरण झाल्याने त्यांना एकाच गावात सेवा करण्याची संधी संस्थेने दिल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठा प्रसारक संस्थेचे अध्यक्ष विलासराव आठरे यांनी केले. प्राचार्य वराळ सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार नंदकुमार झावरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामनाथ वाघ, सचिव जी. डी. खानदेशे, विश्वस्त सीताराम खिलारी शाळा समितीचे सदस्य मच्छिंद्र वराळ, जि. प. सदस्य राजाराम एरंडे, स्वामी समर्थ सहकारी बँकेचे उपाध्यक्ष शांताराम लंके, महानगर बँकेचे संचालक अप्पासाहेब लामखडे उपस्थित होते. श्री. आठरे म्हणाले की, संस्थेची जडणघडण करताना वराळ यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने विद्यालयाची प्रगती झाली. आजच्या शिक्षकांनी अशा त्यागी वृत्तीच्या सेवानिवृत्तांचे अनुकरण करण्याची गरज आहे.
श्री. झावरे यांनी वराळ यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य वराळ यांनी सर्वानीच आपल्याला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. वराळ यांनी संस्थेला २५ हजार रुपयांची देणगी दिली. मारुती कोकाटे, रमजान हवालदार, खानदेशे, मच्छिंद्र वराळ, वाघ, खिलारी आदींची भाषणे झाली.

पोलीस ठाण्यांमार्फत पुरस्काराचे धनादेश
तंटामुक्त मोहीम, राहुरी, २८ मार्च/वार्ताहर

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गृह खात्याच्या माध्यमातून पोलीस ठाण्यांतून वार्ताहरांना पुरस्काराचे धनादेश देण्यात आले. गाव पातळीवरील तंटे मिटविण्यासंदर्भात माध्यमांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. सरकारने वार्ताहरांसाठी जिल्हा विभाग व राज्य पातळीवर पुरस्कार योजना जाहीर केली होती. १७ जुलै २००७च्या सरकारच्या निर्णयातील परिच्छेद एकनुसार हे धनादेश देण्यात आले. दि. २३ सप्टेंबर २००८ रोजी पुरस्काराची घोषणा केली होती. गाव पातळीवरील पुरस्काराचे वितरण जिल्हा व राजधानी पातळीवर करण्याचे नियोजन होते. मात्र, आचारसंहितेमुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते पोलीस ठाण्यांतून धनादेशाचे वितरण करण्यात आले. पहिल्या वर्षी तंटामुक्त समित्यांनी हिरिरीने भाग घेतला. मात्र, जाहीर कार्यक्रमास उशीर झाला. जिल्ह्य़ात ३१ गावे तंटामुक्त घोषित करण्यात आली. त्यात राहुरी तालुक्यातील दवणगावला विशेष पुरस्कार मिळाला. भाऊसाहेब येवले यांनाही धनादेश प्राप्त झाला. पुरस्काराची रक्कम व्यसनमुक्ती चळवळीला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्डिलेंच्या उपस्थितीत उद्या राहुरी येथे मेळावा
राहुरी, २८ मार्च/वार्ताहर

नगरमधील ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थितीत तालुक्यातील राष्ट्रवादी, इंदिरा काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी (दि. ३०) दुपारी साडेचार वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील केशर डेअरी शेजारील प्रांगणात आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष के. एम. पानसरे यांनी दिली. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कापूरवाडी तलावाजवळील वृक्षराजी पर्यटकांमुळे धोक्यात
नगर,२८ मार्च/प्रतिनिधी

शहराजवळील कापूरवाडी तलावालगत असलेल्या वटवृक्षांना पर्यटकांकडून मोठा धोका निर्माण होत आहे. लष्कराच्या अधिपत्याखाली असलेल्या या तलावाजवळील वटवृक्षांचे संरक्षण आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅण्ड स्कूलने (एससी अ‍ॅण्ड एस) करावे, अशी मागणी हरियाली संस्थेने केली आहे. संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर व शरद पाटील यांनी यासंबंधीचे निवेदन एसीसी अ‍ॅण्ड एसचे कर्नल अमरसिंह सावंत यांना नुकतेच दिले. तलावानजीक ८०-९० वर्षांपूर्वीचे १४ वटवृक्ष एका रांगेत दिमाखात उभे आहेत. हा नजारा नेत्रसुखद आहे. शहर-परिसरातील नागरिक सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी या निसर्गरम्य ठिकाणी येत असतात. मात्र, काही पर्यटक येथे पाटर्य़ा करतात. या वटवृक्षांच्या बुंध्याजवळच चूल करतात. त्यामुळे खोडे जळतात. काहीजण चूल पेटविण्यासाठी वृक्षतोडही करतात.या साऱ्या प्रकारामुळे वटवृक्षांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अस संघटनेने पुराव्यानिशी सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले. वटवृक्षांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊ. दोषी पर्यटकांवर कडक कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन सावंत यांनी या वेळी हरियालीस दिले.

पोखर्डी शिवारातून डांबराची ९ पिंपे चोरली
नगर, २८ मार्च/प्रतिनिधी

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पोखर्डी शिवारातून ५५ हजार रुपये किमतीच्या डांबराचे ९ पिंप चोरून नेण्यात आले. शुक्रवारी रात्री ही चोरी झाली. या प्रकरणी राजेंद्र जाधव (रा. सावेडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जाधव हे ठेकेदार असून, रस्त्याची कामे करतात. त्यांचा पोखर्डी शिवारात खडीक्रशर, डांबराचा प्लँट आहे. तेथे सुरक्षा कर्मचारी आहे. जाधव यांची राहुरी येथे रस्त्याची कामे सुरू असून, यापूर्वी दिवाळीच्या काळात त्यांची ९० हजार रुपये किमतीचे पिंप चोरून नेण्यात आले होते. त्याचा तपास अजून लागला नसतानाच काल पुन्हा चोरी झाली. या चोरीमागे एखादी टोळी असावी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा प्रकार घडत असावा काय, याबाबत पोलीस शोध घेत आहेत.

नगरला २६ एप्रिलला विभागीय वकील परिषद
नगर, २८ मार्च/प्रतिनिधी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा आणि राज्यातील सर्व वकील संघातर्फे २६ एप्रिल रोजी नगर येथे विभागीय वकील परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य व माजी उपाध्यक्ष चांगदेव डुबे यांनी दिली. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन राज्याचे कायदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होईल. परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, तसेच राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल रवी कदम, देशाचे अ‍ॅडिशनल सॉलीसिटर जनरल राजेंद्र रघुवंशी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे डुबे म्हणाले. परिषदेत वकिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, वकिलांचे प्रश्न, ग्रंथालय योजना या विषयांवर चर्चा होईल. वकिलांनी या परिषदेस मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही डुबे यांनी केले. परिषदेच्या नियोजनासाठी शहर वकील संघाची नुकतीच बैठक झाली. बैठकीस वकील सर्वश्री. रमेश कराळे, सुरेश लगड, सुभाष काकडे, भाऊ औसरकर, विश्वास आठरे, के. एम. देशपांडे आदी उपस्थित होते.

किसनगिरीबाबांच्या गोधेगावला जन्मभूमी महोत्सव उत्साहात
नेवासे, २८ मार्च/वार्ताहर

श्रीक्षेत्र देवगड येथील श्रीसमर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा यांची जन्मभूमी असलेल्या प्रवरातिरावरील गोधेगाव येथे जन्मभूमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीसमर्थ सद्गुरू किसनगिरीबाबांची पुण्यतिथी श्रीक्षेत्र देवगड येथे पार पडल्यानंतर जन्मभूमी महोत्सव साजरा करण्याची परंपरा गोधेगावच्या ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केली आहे. या जन्मभूमीमध्ये संत किसनगिरीबाबांच्या पादुका व जन्मभूमीतील जन्माची चित्रे संगमरवरावर कोरलेली आहेत. या जागेवर ग्रामस्थांनी मंदिर उभारलेले आहे. जन्मभूमी महोत्सवानिमित्त श्रीसमर्थ सद्गुरू किसनगिरीबाबांच्या मूर्तीस श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती भास्करगिरीमहाराज यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. या वेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य आचार्य शरदगुरू काटकर प्रवरासंगमकर यांनी केले. जन्मभूमी सोहळ्यात भास्करगिरीमहाराजांचे प्रवचन झाले.
या वेळी गोधेगाव येथील जगन्नाथ घाडगे, हनुमंत गाडेकर, जालिंदर नरोडे, भालगावचे बाबूराव तनपुरे, टोका येथील भाऊसाहेब परभणे, सलाबतपूरचे मच्छिंद्र कदम यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

न्यूनगंड सोडून ब्राह्मणांनी इतिहासाचे स्मरण करावे - उत्पात
नगर, २८ मार्च/प्रतिनिधी

सध्या ब्राह्मण समाजावर टीका केली जात आहे. त्यामुळे ब्राह्मणांचा बुद्धिभेद झाला आहे. टीकाकारांमध्ये अनेकजण ब्राह्मणच आहेत. ब्राह्मणांनी न्यूनगंड सोडून द्यावा आणि आपल्या दिव्य इतिहासाचे नेहमी स्मरण करावे, असे प्रतिपादन भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी केले. ब्राह्मण विचारमंच मध्यवर्ती (सर्व शाखीय) या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. उत्पात बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक अजित घैसास होते. खाकीदासबाबा मठातील मेघनंद कला मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. श्री. घैसास यांनी ब्राह्मणांनी भरपूर शिक्षण घेऊन पैसे कमवावेत. शाळा, बँका उघडाव्यात, असे म्हटले. संस्थेचे अध्यक्ष मधुसूदन मुळे यांनी संस्थेची उद्दिष्टे व कार्यपद्धतीची माहिती दिली. प्रास्ताविकात मानद सचिव वकील सतीश भोपे यांनी ब्राह्मणांनी ब्रह्मतेज जागविण्याची गरज व्यक्त केली. सहसचिव उषा देशमुख यांनी संस्थेसाठी गोळा केलेला निधी उत्पात यांच्या हस्ते अध्यक्षांकडे सुपूर्द केला. प्रा. एम. डी. कुलकर्णी व भारती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

चास शिवारात वीजपंप चोरीबाबत दोघांना अटक
नगर, २८ मार्च/प्रतिनिधी

वीजपंप चोरीप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी चौघांना अटक करून दोन वीजपंप जप्त केले. या आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नगर तालुका पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. राजू लक्ष्मण पवार (२१), संतोष अंबादास कळमकर (२१), विनोद अप्पा बांदल (२०) व बाबा रभाजी गायकवाड (२१, सर्व टाकळी खातगाव, तालुका नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चौघांना पोलिसांनी चास शिवारात पकडून त्यांच्याकडून दोन वीजपंप जप्त केले. आरोपींची न्यायालयात मुक्तता झाली. मात्र, एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल वीजपंप गुन्ह्य़ाच्या तपासासाठी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. नगर तालुका ठाण्यातील हवालदार गायकवाड, खंडागळे, तिपोने, समीर सय्यद या पोलिसांनी ही कारवाई केली.

‘महावितरण’ने शेतक ऱ्यांचे वीजजोड पूर्ववत न केल्यास आंदोलन - शेवाळे
कर्जत, २८ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील ग्रामीण भागामधील शेतीपंपांचे वीजजोड महावितरण कंपनीने थकबाकीमुळे बंद केले आहेत. हे वीजजोड पूर्ववत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे माजी जि. प. सदस्य कैलास शेवाळे यांनी दिला आहे. तालुक्यात यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला. याशिवाय कुकडीच्या पाण्यामुळे मोठे क्षेत्र ओलिताखाली आले. तालुक्यात उन्हाळी पिके मोठय़ा प्रमाणात आहेत. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. याशिवाय शेतीला वीज कधीच पुरेशी मिळाली नाही. पिकांना वीज लागते, तेव्हा कधीच दिली नाही. आता मात्र, महावितरणने थकबाकीसाठी वीजजोड खंडित केले आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. वीजजोड पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेवाळे यांनी दिला आहे.

मराठी पत्रकार संघातर्फे राष्ट्रपतींना निवेदन
नगर, २८ मार्च/प्रतिनिधी

पत्रकार व वर्तमानपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, तसेच नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी राज्य मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आली.
संघातर्फे नुकतेच नवी दिल्ली येथे जाऊन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. शिर्डीत अलीकडेच पार पडलेल्या संघाच्या अधिवेशनातील सात ठरावांचे निवेदनही राष्ट्रपतींना देण्यात आले. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विश्वास आरोटे, माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, मच्छिंद्र आवारी, ताराचंद तलरेजा, एकनाथ वैद्य, डॉ. नामदेव गुंजाळ, डॉ. पाटील उपस्थित होते.

राहात्यात दोन घटनांमध्ये महिलेसह दोघांचा मृत्यू
राहाता, २८ मार्च/वार्ताहर

तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तरुणाचा विहिरीत पडून, तर महिलेचा जळाल्याने मृत्यू झाला. या महिलेचा पती तिला वाचविताना भाजल्याने गंभीर जखमी झाला. पुणतांबे येथे शेतमजुरी करीत असलेला श्रीराम लालाकृष्ण भोईर (वय २५) व त्याची पत्नी सोनाली (वय २०) कामावरुन घरी आल्यानंतर स्वयंपाक करताना स्टोव्हचा भडका उडाल्याने साडी पेटून सोनाली गंभीर जखमी झाली. तिला वाचविताना पती श्रीराम हाही भाजून जखमी झाला. बुधवारी हा प्रकार घडला. दोघांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. सोनालीचा आज सकाळी मृत्यू झाला. तिच्या पतीवर उपचार चालू आहेत. या बाबत नातेवाईकांची तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. हणमंतगाव येथे जयराम घोलप यांच्या विहिरीत पडून आबासाहेब भागवत गावडे (वय २३) याचा मृत्यू झाला. मयत आबासाहेब रात्री विहिरीवर मोटार चालू करण्यास गेला होता. पाय घसरुन तो विहिरीत पडल्याचे पोलिसांनी सांगितले. बाबासाहेब गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

मायंबा यात्रेनिमित्त दर्शनास भाविकांची गर्दी
नगर, २८ मार्च/प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे शुक्रवारी मायंबा यात्रेनिमित्त नवनाथांचे गुरू श्रीमच्छिंद्रनाथांच्या मूळ समाधीस सुगंधीत लेप लावण्यात आला. भाविकांनी मोठय़ा संख्येने समाधीचे दर्शन घेतले.
श्रीनाथांची मूळ समाधी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी वर्षांतून एकदाच भाविकांना दर्शनासाठी खुली केली जाते. रात्री समाधीवर गंगाजल, सुगंधीत उटणे, अष्टगंध, चंदन पावडर, दवणा, अत्तर, बुक्का, गुलाब पाणी यांचे २०० ते ३०० किलो मिश्रण करून लेप दिला जातो. यानंतर सकाळी सहाच्या दरम्यान समाधीवर पुन्हा चादर, गलप चढविला जातो. सोहळ्यास आमदार सुरेश धस व अनिल राठोड, माजी आमदार साहेबराव दरेकर, महंत शंकर भारती देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, बाबासाहेब म्हस्के, रमेश ताठे आदी उपस्थित होते. पनवेल येथील नाथ मंडळातर्फे भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.