Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९

आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
अनिरुद्ध भातखंडे

मोरूचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. पावसाळी मोटोक्रॉस स्पर्धेत तो चक्क अजिंक्य ठरला होता. स्पर्धाही साधीसुधी नाही, एका नामांकित उद्योजकाने आयोजित केलेली राज्यस्तरीय स्पर्धा. पाच लाख रुपये रोख आणि महागडी, अद्ययावत मोटरसायकल बक्षिसापोटी त्याला मिळणार होती. मध्यमवर्गीय मोरूला हे बक्षीस साहजिकच पृथ्वीमोलाचे वाटले. आयोजक आणि सहस्पर्धकांनी केलेले अभिनंदन स्वीकारीत तो मंचावर गेला. बक्षीस देण्यासाठी कॅटरिना कैफ आली आहे, हे पाहून तर त्याच्या काळजाचे पाणीच झाले. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा त्याच्याभोवती गराडा पडला. आप कैसा महसूस कर रहे हो? या प्रश्नानंतर अनेकांनी त्याला स्पर्धेच्या पूर्वतयारीबद्दल विचारले. ‘खरे तर मी विशेष पूर्वतयारी केली नाही. मी पनवेलसारख्या लहान शहरात राहतो. तिथे नगरपालिकेने काळजीपूर्वक मेन्टेंड केलेल्या खड्डय़ांमधून मार्ग काढत रस्त्यांलगतच्या खोदकामांना चुकवत, अरुंद गल्लीबोळांमधून वाट काढत वाहतूक कोंडीतून स्वत:चे घोडे दामटवत पनवेल रेल्वेस्थानक गाठण्याचे दिव्य मला रोज करावे लागते. त्यामानाने ही स्पर्धा खूपच सोपी होती. माझ्या यशाचे सारे श्रेय मी पनवेलमधील रस्त्यांना देतो.’ अशी लांबलचक प्रतिक्रिया दिल्यानंतर सर्व प्रतिनिधी चांगलेच खूश झाले. सर्व लगबग संपली. परतीच्या प्रवासात मोरूने आनंदाने मी जिंकलो.. असे म्हणत हवेत दोन्ही हात फिरविले आणि.. आणि घोळ झाला. त्याच्या डाव्या हाताच्या फटक्याने मेजावरचे तांब्याभांडे खाली पडले आणि उजव्या हाताच्या प्रसादामुळे गजराचे घडय़ाळ पलंगावरून भिरकावले गेले. दोन प्रकारच्या या आवाजांमुळे मोरू खाडकन् जागा झाला. त्याचे आणखी एक स्वप्न स्वप्नच राहिले. ऑफिसला जाण्यासाठी भयंकर रस्त्यांवरून मार्गक्रमण करीत रेल्वेस्थानक गाठावे लागण्याचे चिरंतन सत्य त्याच्या लक्षात आले आणि रोजच्या प्रमाणे दिवसाच्या सुरुवातीलाच त्याचा मूड गेला. कोकण आणि मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेलमधील रस्त्यांची अवस्था गेली अनेक वर्षे याप्रकारे आहे. अश्वत्थाम्याची कपाळावरील जखम एकवेळ पूर्णपणे भरून निघेल, परंतु पनवेलचे शरपंजरी रस्ते कधीही कायमस्वरूपी गुळगुळीत होऊ शकणार नाहीत, हे कटू सत्य आहे. मुळात पनवेलची रचना औरस-चौरस नाही. पनवेलचा इतिहास आणि परंपरा खूप जुनी. नगरपालिका स्थापन होऊनही १५७ वर्षे लोटलेली. सिडको वसाहतींप्रमाणे येथे शहराचे नियोजन करणे शक्य नाही. तरीही अस्तित्वात असलेले रस्ते चांगले राखण्यात नगरपालिकेला आणि आजवरच्या सर्व सत्ताधाऱ्यांना साफ अपयश आले आहे. यश वा अपयश येण्यासाठी खरे तर हात-पाय हलवावे लागतात. प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते आणि या साऱ्याची येथे पहिल्यापासून वानवा आहे. रस्ते कसे असावेत हे नागरिकांनी प्रशासनाला शिकवावे काय? अहो, अगदी साधी पद्धत आहे. खराब रस्ते खणून त्यावर खडी, बारीक वाळू टाकून त्याचे डांबरीकरण करायला हवे. आजतर अनेक प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान उपयोगात आणण्याची क्षमता नगरपालिकेकडे नक्कीच आहे. प्रत्यक्षात मात्र येथील रस्ते वर्षांनुवर्षे चुकीच्या पद्धतीने बांधले जात आहेत. रस्ते करणे म्हणजे थरांवर थर देणे, अशी अनिष्ट प्रथा येथे सुरू आहे. या थरांनी आता एवढी उंची गाठली आहे की, भविष्यात अनेक अपघातांना ते कारणीभूत ठरले तर आश्चर्य वाटायला नको. गेल्या काही वर्षांंत तर रस्ते बांधणीचा दर्जा अतिशय खालावल्याचे स्पष्टपणे दिसते. गेल्यावर्षी गणेश उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यातील सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. पनवेल नगरपालिकेने या आदेशाची अंमलबजावणी गणेश उत्सवानंतर केली. गणेश उत्सव म्हणजे गौरी-गणपती अशी समजूत त्यांनी करून घेतली असावी, त्यामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. अर्थातच थरांवर थर देऊन आणि खडी, वाळू टाकल्यानंतर अनेक दिवसांनी डांबरीकरण करून! हे काम एवढे निकृष्ट आणि दर्जाहीन होते की, त्याच रस्त्यांचे आता सहा महिन्यांच्या कालावधीत डांबरीकरण करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली. एवढय़ा कमी कालावधीत झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? याचा विचार करण्याचे भान प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना नाही. उलटपक्षी नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांबाबत स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेण्यासाठी मोठे फ्लेक्स उभारले गेले आणि स्थानिक केबल वाहिनीवर त्या संबंधित जाहिरातही करण्यात आली! रस्तेबांधणीवर वारंवार अनावश्यक खर्च होत असेल, तर नागरिकांच्या करांतून गोळा झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या महसुलाचा तो गैरवापरच ठरतो. याप्रकरणी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी खरे तर आक्रमक भूमिका घ्यायला हवी. परंतु, सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाला मम म्हणण्यातच त्यांना धन्यता वाटत असावी. विरोधी पक्षाचे हे सोयीस्कर मौन त्यांना निवडून दिलेल्या मतदारांचा विश्वासघात करणारे आहे. गेल्या गणेश उत्सवानंतर केवळ सहा महिन्यांत नव्याने होत असलेल्या डांबरीकरणाचे काम अतिशय कूर्मगतीने होत आहे. केवळ खडी आणि बारीक वाळू टाकून त्याच अवस्थेत सोडलेल्या या कामाचा नागरिकांना भयंकर मनस्ताप झाला. वाहनचालक आणि पादचारी नगरपालिकेचा पावलोपावली उद्धार करीत होते. या अर्धवट, खडबडीत रस्त्यांवर पालिका डांबर कधी ओतणार, असा प्रश्न ते एकमेकांना विचारीत होते. ‘रस्त्यांचे डांबरीकरण रखडले’ या मथळ्याखाली १९ मार्चच्या वृत्तान्तमध्ये समाचार घेतल्यानंतर एका रात्रीत एका रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. अन्य रस्त्यांचे भाग्य मात्र अद्याप उजळलेले नाही. डांबरीकरण झालेल्या या रस्त्यांवर मोटरसायकल अथवा स्कूटर स्टँडवर उभी केल्यानंतर त्यांचे स्टँड रस्त्यात रुतत आहेत, यावरून या कामाचा दर्जा लक्षात यावा. चांगला रस्ता कसा असतो, हे पाहण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्व नगरसेवकांनी पनवेल स्थानकापासून जुन्या सिडको स्थानकापर्यंतचा रस्ता पाहावा. सिडकोने बांधलेला हा रस्ता आणि पालिका बांधत असलेले रस्ते एकमेकांच्या जवळ असले तरी दर्जाच्या बाबतीत त्यांच्यात जमीनअस्मानाएवढे अंतर आहे. निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे वर्षांनुवर्षे रस्त्यावरील खड्डय़ांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्यात पालिका प्रशासनाला आणि राजकारण्यांना धन्यता वाटत असेल तर आनंदच आहे. आलिशान, वातानुकूलित गाडीतून फिरणारे नेते आणि खाचखळग्यांतून पायी जाणारे सर्वसामान्य यांच्यातील विषमतेविषयी कविवर्य सुरेश भट यांनी उष:काल या कवितेत एक त्रिकालाबाधित सत्य लिहून ठेवले आहे. तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती, आम्हावरी संसाराची उडे धूळ माती..