Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९
राज्य

आवाडे-माने गटाने उभारली पाडव्याला मनोमिलनाची गुढी
इचलकरंजी, २८ मार्च / वार्ताहर

आवाडे-माने या मातब्बरात दहिहंडीपासून सुरू झालेला राजकीय कलह शुक्रवारी मनोमिलनाची गुढी उभी करून संपवताना आवाडे कुटुंबीयांनी निवेदिता मानेंच्या विजयाचे तोरण बांधण्याचा निर्धार केला. काहीशी हुरहूर, काहीशी कालवाकालव अशा वातावरणात दोन राजकीय घराण्यांनी गळाभेट घेतली. पण आवाडे कुटुंबीयांनी केलेले मनमोकळे व भारदस्त स्वागत आणि आश्वासक शब्द यामुळे निवेदिता माने परतताना बऱ्याचशा निश्चिंत झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून आवाडे गटाने खासदार निवेदिता माने यांच्याविरूध्द रान उठवण्यास सुरूवात केली होती.

कमलताई परांजपे निवर्तल्या
नागपूर, २८ मार्च/ प्रतिनिधी

धरमपेठेतील बालमंदिर संस्थेच्या संस्थापक सदस्य व संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व कमलताई परांजपे यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. नोव्हेंबर १९५१ ते एप्रिल १९९८ या काळात त्या संस्थेच्या संचालक होत्या. ‘परांजपे शाळा’ याच नावाने जास्त ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेत विद्यार्थ्यांना कुठल्याही ताणतणावाशिवाय शिक्षण मिळावे, या कमलताईंनी स्वीकारलेल्या शैक्षणिक धोरणानुसार मोकळ्या वातावरणात शिक्षण दिले जाते. याशिवाय, कमलताईंनी शाळा परिसरातच अनाथ मुलांसाठी सुरू केलेल्या ‘बालसदन’ या संस्थेत सध्या ४१ मुले आहेत.

महादेव कोळी समाजाच्या नेत्यांची पवारांवर टीका
पंढरपूर, २८ मार्च/वार्ताहर

गेल्या अनेक र्वषपासून काँग्रेस व राष्ट्रवादीने महादेव कोळी समाजाचा वापर मतासाठी करून घेतला. महादेव कोळी दाखल्याचा प्रश्न बिकट करून टाकला. त्यामुळे २२ हजार कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे कोळी समाज संतापला असून समाजाचे अन्नात माती कालवणाऱ्या शरद पवार यांना माढा लोकसभा मतदार संघात पराभूत करावे असे आवाहन महादेव कोळी पश्चिम महाराष्ट्र समाजाचे अध्यक्ष अरुण कोळी यांनी केले आहे.

राज्यात दोनशे घराण्यांकडेच सत्ता व राजकारणाची सूत्रे - जानकर
सोलापूर, २८ मार्च/प्रतिनिधी

राज्यात २०० घराण्यांकडेच सत्तेची सूत्रे व राजकारण फिरत असून देशाच्या भवितव्यासाठी सर्वसामान्यांनी राजकारणात लक्ष घालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी केले.

नागरिक हक्क संघटनेचे मतदार जनजागृती अभियान
सांगली, २८ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नागरिक हक्क संघटनेने जनजागरण अभियान सुरू केले असून निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या सर्व उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले जाणार आहे. जनतेचा जाहीरनामा मान्य असणाऱ्या उमेदवाराला मतदान व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी दिली.

नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयांवर नजर ठेवणार?
पुणे, २८ मार्च / खास प्रतिनिधी

निवडणूक काळात आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वत:च्या संपर्क कार्यालयांचा वापर करणाऱ्या नगरसेवकांवर आता निवडणूक आयोगाच्या कॅमेऱ्याची नजर रोखली जाणार आहे. संपर्क कार्यालयांचा प्रचारासाठी वापर केल्यास त्याचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याच्यादृष्टीने प्रशासनाची चाचपणी सुरू आहे.

ताराराणी आघाडीला खिंडार पडता पडता वाचले..
कोल्हापूर, २८ मार्च/विशेष प्रतिनिधी
काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असा बहुआयामी प्रवास करून पुन्हा काँग्रेस आघाडीविरुद्ध बंडाचे निशाण रोवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाला गुरुवारी सायंकाळी लोकसभेच्या िरगणात पहिला झटका बसला. महाडिकांचे काटाजोड वर्चस्व असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेत त्यांच्या ताराराणी आघाडीला खिंडार पाडण्यात जनसुराज्य आघाडी यशस्वी झाली. तथापि सायंकाळी राष्ट्रवादीचे बंडखोर मुन्ना महाडिक यांनी आपली बंडखोरी मागे घेतल्याने महापालिकेत ताराराणी आघाडीची अवस्था पूर्ववत राहिली आहे.

नूतनीकरणानंतर वालावलकर ट्रस्टचे रुग्णालय जनसेवेसाठी खुले
कोल्हापूर, २८ मार्च / विशेष प्रतिनिधी
तळकोकणापासूनच्या सर्व रुग्णांना अल्पदरात वैद्यकीय सुविधा देवून नांवलौकीक मिळविलेल्या वालावलकर हॉस्पिटलमध्ये नव्या चमुने चौफेर विस्तारीकरणासह विधायक भर घालावी अशा शब्दात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

डॉ. ए. डी. शिंदे यांचा सोमवारी अमृतमहोत्सवी सत्कार
कोल्हापूर, २८ मार्च / विशेष प्रतिनिधी

येथील छत्रपती शाहू सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर) चे संस्थापक आणि नामवंत चार्टर्ड अकौंटंट प्रा.डॉ.ए.डी.शिंदे यांचा सोमवारी (दिनांक ३०) रोजी अमृतमहोत्सवी नागरी सत्कार होणार आहे. सायबरच्या प्रांगणात दुपारी चार वाजता अर्थतज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांच्या हस्ते सत्कार होईल. ही माहिती अमृतमहोत्सव समितीचे कार्यवाह डॉ.व्ही.एम.चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

वन विभागाकडून कचऱ्याच्या गाडय़ा जप्त; ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात
ठाणे,२८ मार्च/प्रतिनिधी

उच्च न्यायालयाच्या आदेशांची सातत्याने पायमल्ली करणाऱ्या ठाणे महापालिकेला धडा शिकविण्याचा वन विभागाने चंग बांधून घोडबंदर खाडी किनाऱ्यासह वन जमिनीवर कचरा टाकणारे दोन डंपरच जप्त केले आहे. परिणामी डंपिंग ग्राऊंडच्या अभावी आठवडाभरातील ६००० टन कचऱ्याची विल्हेवाट लावता न आल्याने ठाण्यात कचऱ्याचे साम्राज्य बनले आहे.अशी परिस्थिती आणखी काही दिवस सुरू राहिल्यास शहराचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.