Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९
क्रीडा्

भारतावर पराभवाचे संकट
भारतावर फॉलोऑन, दुसऱ्या डावात भारत १ बाद ४७

नॅपियर, २८ मार्च / पीटीआय

तब्बल ४१ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर न्यूझीलंड भूमीत कसोटी मालिकाजिंकण्याचा इतिहास घडवण्याचे मनसुबे रचणाऱ्या भारतीय संघापुढे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी दारुण पराभवाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण हे जगविख्यात फलंदाज भारतीय संघाला या संकटातून सुखरूप बाहेर काढतील काय, ही तमाम भारतीय क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला गेली आहे. भारतीय फलंदाजीची स्टार-स्टडेड क्रमवारी आज पहिल्या डावात अपयशी ठरल्यामुळे ३१४ धावांनी पिछाडीवर पडलेल्या पाहुण्या संघाची वाटचाल मानहानीजनक पराभवाच्या दिशेनेच सुरू झाली आहे. न्यूझीलंडने पहिला डाव ९ बाद ६१९ धावांवर घोषित केल्यानंतर भारताने काल दुसऱ्या दिवसअखेर तीन मोहरे गमावून ७९ धावांची मजल मारली होती. मॅक्लीन पार्कच्या ‘पाटा’ खेळपट्टीवर आज तिसऱ्या दिवशी पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाचा डाव ३०५ धावांवर संपुष्टात आल्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की आली.

भारतभर बॅडमिंटन अकादमी सुरू करण्याचा गोपीचंदचा मनोदय
हैदराबाद, २८ मार्च / वृत्तसंस्था

भारतातील गुणवान बॅडमिंटनपटूंना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी चालू करण्याचे माझे स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आल्याचा आनंद काही वेगळाच आहे, अशा भावना भारताचा ज्येष्ठ बॅडमिंटनपटू पुलेल्ला गोपीचंद याने व्यक्त केल्या आहेत. अशाच प्रकारच्या अकादमी भारतभर चालू करण्याचा मनोदयही त्याने व्यक्त केला. २००१ मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. प्रकाश पदुकोन यांनी १९८० मध्ये ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्याच्यानंतर फक्त गोपीचंद यालाच ही कामगिरी जमली आहे. गोपीचंद म्हणाला की, भारताच्या कानाकोपऱ्यात असंख्य गुणवान बॅडमिंटनपटू आहेत.

चमत्कार करू - लक्ष्मण
नेपियर, २८ मार्च/ वृत्तसंस्था

दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ अद्यापि २६७ धावांनी पिछाडीवर असला तरी उद्या चौथ्या दिवशी आम्ही चमत्कार करून दाखवू आणि सामना वाचवू अशी आशा व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने व्यक्त केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण म्हणाला की, आमची परिस्थिती कठीण असली तरी आम्हाला सामना वाचविण्याची अजून संधी आहे. मात्र त्यासाठी माझ्यासकट सर्वच खेळाडूंना उद्या विशेष कामगिरी करून दाखवावी लागेल. आम्ही तशी कामगिरी नक्कीच करून दाखवू.

दडपण ठेवावे लागेल - मार्टिन
नॅपिअर, २८ मार्च / पीटीआय

दुसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघ पराभव टाळण्यासाठी संघर्ष करत आहे. या कसोटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पाहुण्या संघाच्या फलंदाजांवर दडपण कायम राखणे आवश्यक आहे, असे मत यजमान संघाचा वेगवान गोलंदाज ख्रिस मार्टिन याने व्यक्त केले. मार्टिनने तीन बळी मिळवत भारताच्या फॉलोऑन टाळण्याच्या आशा धुळीस मिळवल्या. आज न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले.डावाने पराभव टाळण्यासाठी भारताला अद्याप २६७ धावांची गरज असून त्यांचे ९ फलंदाज शिल्लक आहे. स्टार फलंदाजांचा समावेश असलेल्या भारतीय संघाविरुद्ध न्यूझीलंडच्या गोलंदाजांना उद्याही अचूक मारा करावा लागेल.

हिदायतची अंतिम फेरीत धडक
इंडियन ओपन बॅडमिंटन
हैदराबाद, २८ मार्च / पीटीआय

इंडोनेशियाचा आघाडीचा खेळाडू तौफिक हिदायत याने इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आपल्याच देशाच्या टॉमी सुगियार्तो याला सरळ गेम्समध्ये पराभूत करीत योनेक्स सनराइज इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. ऑलिम्पिकचा माजी सुवर्णपदक विजेता हिदायत याने ३३ मिनिटांच्या या झटपट खेळात सुगियार्तोला २१-१३, २१-११ असे नमविले. हिदायतने आपल्या विद्युतवेगाने खेळल्या जाणाऱ्या बॅकहॅण्डने उपस्थित चाहत्यांना स्तिमित केले तर भेदक स्मॅशेसने सर्वांची वाहवा मिळविला. त्याने केलेले ड्रिबल्स व ड्रॉप शॉट्स चाहत्यांना विशेष भावले. माजी विश्वविजेत्या हिदायतने आपल्या उत्कृष्ट पदलालित्याच्या जोरावर आपल्या प्रतिस्पध्र्याला खिळवून ठेवले. मोठमोठय़ा रॅलिज खेळून पहिला गेम त्याने २१-१३ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये हिदायतने आपल्या खेळाच्या पद्धतीत थोडा बदल करून जोरदार आक्रमण केले. त्यामुळे सुगियार्तोला प्रतिकार करण्याची अजिबात संधी मिळाली नाही.

वेस्ट इंडिजची इंग्लंडवर मात; गेलचा झंझावात
ब्रिजटाऊन, २८ मार्च / वृत्तसंस्था

कर्णधार ख्रिस गेलच्या ८ षटकार आणि पाच चौकारांसह केलेल्या ४३ चेंडूतील ८० धावांच्या तडफदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर इंग्लंडचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. एडवर्ड्स (३-२८) व ब्राव्हो (४-१९) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडचा डाव ११७ धावात गुंडाळणाऱ्या वेस्ट इंडिजने १४.४ षटकात २ बाद ११७ धावांची मजल मारली होती. डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर त्यावेळी विंडीज संघ आघाडीवर होता.
धावफलक
इंग्लंड :- अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस झे. गेल गो. एडवर्ड्स २, रवी बोपारा झे. सरवान गो. एडवर्ड्स १०, केव्हिन पीटरसन झे. पोलार्ड गो. ब्राव्हो ३, ओवेस शाह झे. सॅमी गो. बाकेर १७, पॉल कॉलिंगवूड पायचित गो. ब्राव्हो ६, अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ झे. एडवर्ड्स गो. ब्राव्हो ०, मॅट प्रायर झे. सॅमी गो. पोलार्ड ७, दिमित्री मस्कारेन्ह्स झे. ब्राव्हो गो. एडवर्ड्स ३६, स्टुअर्ट ब्रॉड झे. रामदिन गो. पोलार्ड ०, बॅटी झे. सॅमी गो. ब्राव्हो १७. जेम्स अ‍ॅन्डरसन नाबाद ०. अवांतर (बाईज ८, लेगबाईज १, वाईड १०) १९. एकूण ४१.३ षटकात सर्वबाद ११७. बाद क्रम : १-१५, २-१७, ३-४१, ४-४२, ५-४३, ६-५४, ७-६८, ८-६८, ९-११६, १०-११७.
गोलंदाजी : एडवर्ड्स ८.३-१-२८-३, बाकेर ९-५-२१-१, ब्राव्हो ७-१-१९-४, सॅमी ९-२-१९-०, पोलार्ड ६-०-१६-२, मिलर २-०-५-०.
वेस्ट इंडिज : ख्रिस गेल त्रि. गो. अ‍ॅन्डरसन ८०, लेन्डल सिमोन्स नाबाद १४, रामनरेश सरवान त्रि. गो. ब्रॉड १०, शिवनारायण चंद्रपॉल नाबाद ३. अवांतर (बाईज ४, नोबॉल ६)१०. एकूण १४.४ षटकात २ बाद ११७. बाद क्रम : १-९८, २-११४.
गोलंदाजी : ब्रॉड ३.४-१-३१-१, अ‍ॅन्डरसन ५-०-३९-१, फ्लिन्टॉफ ५-०-१९-०, मस्कारेन्हास १-०-२४-०.

मानहानीकारक पराभवानंतरही स्ट्रॉसला आशा
ब्रिजटाऊन, २८ मार्च / एएफपी

वेस्ट इंडिजविरुद्ध आठ विकेट्सनी मानहानीकारक पराभवानंतरही आपला संघ आगामी लढतीत नव्या जोमाने मैदानावर उतरेल असा विश्वास इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस याने व्यक्त केला आहे. इंग्लंडला अवघ्या ११७ धावांत गारद करून वेस्ट इंडिजने केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात ही धावसंख्या गाठली. त्यामुळे सर्वच स्तरातून इंग्लंडच्या घसरत्या कामगिरीवर टीका झाली. स्ट्रॉसनेही हा पराभव मानहानीकारक असल्याची कबुली दिली होती. मात्र या धक्क्यातून इंग्लंड संघ सावरेल व मालिकेतील उरलेल्या सामन्यात नवा जोम व नवा जोश घेऊन मैदानात उतरेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे. स्ट्रॉसने सांगितले की, जेव्हा इंग्लंड संघ अशा संकटात सापडतो तेव्हा हा संघ आपली कामगिरी उंचावतो असा माझा अनुभव आहे. त्यासाठी आता इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी १०० टक्के प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक खेळाडूने आपण ‘मॅचविनर’ आहोत, अशा थाटात खेळायला हवे. जर आमच्यापैकी दोन-तीन जणांनी हा विचार केला तरी आम्हाला जिंकण्याची मोठी संधी आहे. स्ट्रॉसने सांगितले की, या पराभवाबद्दल प्रशिक्षकांना दोष देण्यात अर्थ नाही. त्यासाठी केवळ आम्ही आणि आम्हीच जबाबदार आहोत. त्यामुळे यापुढे झालेल्या चुका टाळणे हेच आमच्या हाती आहे. जर खेळाडूंना आपल्या कामगिरीबद्दल विश्वास असेल तर विजय दूर नाही. स्ट्रॉसने आपल्या सहकाऱ्यांना सल्ला दिला की, झालेल्या चुकांमधून शिकायला हवे आहे. झालेल्या चुका पुन्हा पुन्हा होत आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुरुवातीला झटपट फलंदाज गमावणे परवडणारे नसते. जर गोलंदाजी उत्कृष्ट असेल तर प्रश्न नाही, पण जर फलंदाजांनीच नांगी टाकली तर काहीही होऊ शकत नाही.

पेस, सानियाची दुहेरीत आगेकूच
मियामी टेनिस
मियामी, २८ मार्च/पीटीआय

भारताच्या लिएंडर पेस व सानिया मिर्झा यांनी आपापल्या सहकाऱ्यांसमवेत मियामी टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत विजयी वाटचाल कायम राखली. पेसने लुकास ड्लौही (चेक प्रजासत्ताक) याच्या साथीत फर्नान्डो गोन्झालिस व जुआन मोनाको यांच्यावर ६-२, ६-२ असा दणदणीत विजय नोंदवला. ही जोडी आता उप-उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. हा सामना त्यांनी अवघ्या ४६ मिनिटात जिंकला. या जोडीस चार वेळा सव्‍‌र्हिस ब्रेकची संधी मिळाली व त्यांनी या चारही संधीचा उपयोग केला.
एकेरीत पहिल्याच फेरीत पराभूत होणाऱ्या सानियाने चीन तैपेईच्या चियाजुंग चुआंग हिच्या साथीत दुहेरीत विजयी वाटचाल कायम राखली. या जोडीने उप-उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवताना चेक प्रजासत्ताकच्या इव्हेटा बेनेसोव्हा व बार्बरा झ्ॉहलवोव्हा यांच्यावर ६-४, ७-५ असा विजय मिळवला. चुरशीने झालेल्या या सामन्यात सानिया व चुआंग यांनी पहिल्या सेटमध्ये एकदा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळवला. त्यांनी परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्यांनी नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला.

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर विजय; ट्वेन्टी-२० लढत
जोहान्सबर्ग, २८ मार्च / वृत्तसंस्था

कसोटी मालिकेत पराभूत झाल्यानंतर एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी जय्यत तयारी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात चार विकेट्सनी पराभूत केले. दुसरा ट्वेन्टी-२० सामना रविवारी होणार असून त्यानंतर ३ एप्रिलपासून पाच ‘वन-डे’ मालिकेला प्रारंभ होईल. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १६६ धावा केल्या. डेव्हिड हसीची ८८ धावांची नाबाद खेळी व सलामीवीर वॉर्नरच्या ३८ धावा वगळता ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दक्षिण आफ्रिकेने हाशिम अमला (२६), गिब्स (१९), डय़ुमिनी (२१), बाऊचर (नाबाद ३६), मॉर्केल (३७) यांनी केलेल्या उपयुक्त धावांच्या जोरावर १९.२ षटकांत १६८ धावा करून निर्धारित लक्ष्य पार केले.

बोपण्णा-कुरेशी उपान्त्य फेरीत
नवी दिल्ली, २८ मार्च / पीटीआय

रोहन बोपण्णा व त्याचा सहकारी एहसाम कुरेशी यांनी आशुतोष सिंग व पुरव राजा यांचा पराभव करत कोराट (थायलंड) येथे सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. बोपण्णा-कुरेशी जोडीने भारतीय जोडीची झुंज ४-६, ६-३, १३-११ गुणांनी मोडून काढली. बोपण्णा-कुरेशी यांची पुढील फेरीत हॅरेल लेव्ही आणि नोम ओकन यांच्याशी लढत होईल. लेव्ही-ओकन जोडीने कोरेन क्यू टाई आणि डानाई युडोमचोक यांचा ६-२, ६-३ गुणांनी पराभव केला.

मेडिको टेबलटेनिसमध्ये तोष्णीवाल तर बॅडमिंटनमध्ये पाटील विजेते
मुंबई, २८ मार्च / क्री. प्र.

डॉ. प्रकाश वझे स्पोर्ट्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या मेडिको बॅडमिंटन, टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूरचे डॉ. नितीन तोष्णीवाल यांनी टेबल टेनिसमध्ये तिहेरी मुकुट पटकाविला. तर बॅडमिंटनमध्ये इचलकरंजीचे डॉ. रवींद्र पाटील यांनी दुहेरी मुकुट जिंकला. तोष्णीवाल यांनी एकेरी, दुहेरी व सांघिक अशा तिन्ही प्रकारात विजेतेपद मिळविले. तोष्णीवाल यांनी दुहेरीत श्याम पाटील यांच्यासह तर सांघिक प्रकारात नवीन सोनी यांच्यासह सांघिक अजिंक्यपद पटकाविले. पाटील यांनी बॅडमिंटनमध्ये एकेरीत विजेतेपद पटकाविलेच पण मिलिंद घरत यांच्यासह दुहेरीतही विजेतेपदाला गवसणी घातली. शिवछत्रपती पुरस्कार विजेते महेंद्र चिपळूणकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.