Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९

वैद्यराज शंकर दाजीशास्त्री पदे
आज जगभरातून ‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राकडे सन्मानाने बघितले जाते. सुमारे ७० देशांत भारतातून आयुर्वेद ज्ञान व औषधे निर्यात होत आहेत. भारतातील १० कोटी जनता आयुर्वेद वैद्यकाचा लाभ घेत आहे! आयुर्वेद चिकित्सा तसेच मूल सिद्धान्तांबद्दल वैद्यकीय संशोधन क्षितिजावर उत्सुकता निर्माण होण्याच्या या सुवर्णक्षणी आठवण होते, ती आयुर्वेद चिकित्सकांसाठी जणू परम पितामह असणाऱ्या वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे यांची! महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे ‘महामहोपाध्याय’ ही पदवी धारण करणारे वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे यांचे हे पुण्यतिथी शताब्दी वर्ष! भविष्याचा वेध घेणे, उत्तुंग स्वप्न पाहून त्यांच्या पूर्तीसाठी अथक प्रयत्न करणे.. ही जणू या ‘खडकाळ देशा- महाराष्ट्र देशाची’ परंपराच! येथील वैद्यराजांनी १९०९ साली मृत्यूपूर्व २ दिवस कोणता संदेश दिला होता हे माहीत आहे? ‘‘भारतीय भाषांच्या सामंजस्यासाठी हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी म्हणून मी आजवर प्रयत्न केले. आता आपण हे काम पुढे चालवा!!!’’

सततच्या खोटय़ा प्रचाराने सगळ्यांचा इतका बुद्धिभेद केला की आरक्षणपीडित समाजालाही आरक्षण योग्य आहे, असे वाटू लागले व ते स्वत:वरील अन्याय आजपर्यंत सहन करीत राहिले. हे सर्व घडत असताना सर्व राजकीय पुढारी व पक्ष नुसते गप्पच बसलेले नाहीत तर स्वार्थासाठी, मतपेटीवर लक्ष ठेवून आरक्षणपीडित समाजावर अधिक अन्याय होईल, असे आरक्षणविषयक व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसारखे पक्षपाती कायदे करीत राहिले आहेत.

वादंग-हमरीतुमरी.. संमेलनाच्या नावात साहित्य, पण संमेलनात मात्र साहित्यिकांची वानवा.., अनेक वर्षे संमेलनांना आवर्जून उपस्थित राहणाऱ्या रसिकांचा मात्र नेहमीचाच उत्साह असतानाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाच्या दबदब्याला आणि परंपरेला साजेसे नसलेले सुमार कार्यक्रम.., नवख्या संयोजकांना योग्य मार्गदर्शक नसल्याने झालेला विरस..!
महाबळेश्वर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हे आहे फलित! एका बाजूला संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर वादंग, हमरीतुमरी होत असतानाच दुसरीकडे आलेल्या प्रतिनिधींनी मात्र नेहमीच्याच रसिकतेने संमेलनाला हजेरी लावली. एकीकडे साहित्य महामंडळाच्या गुप्त बैठका गाजत होत्या, त्यावर वादंग होत होते, पत्रकार परिषदांमध्येही दावे-प्रतिदावे हिरीरीने केले जात होते, धावपळ सुरू होती आणि दुसरीकडे संमेलनातील कार्यक्रम त्यांच्या ठरल्या वेळेनुसार सुरूही होत होते आणि संपतही होते. संमेलनाच्या मुख्य मांडवाबाहेर चाललेल्या या वादंगाचे थोडे पडसाद संमेलनात उमटत जरूर होते; मात्र त्यामुळे संमेलनाचे कार्यक्रम कधी खोळंबले नाहीत. असे असले तरी महाबळेश्वरच्या संमेलनातून परत जाताना अनेक खटकलेल्या गोष्टींचाच आठव येत होता.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या मनमानी आणि ठोकशाही कारभारामुळे महामंडळाच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सॅनहोजे येथे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यासाठी ठाले-पाटील यांनी जो आटापिटा केला आणि त्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रात किंवा भारतात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न भरविण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती. महामंडळाच्या घटनेनुसार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रात किंवा भारतातच झाले पाहिजे. भारताबाहेर साहित्य संमेलन भरवायचे असेल तर त्यासाठी महामंडळाच्या घटनेत बदल करणे गरजेचे होते. मात्र ठाले-पाटील यांनी सॅनहोजे येथे ८२ वे संमेलन भरविण्याचा निर्णय घेतला. विदर्भ साहित्य संघ आणि महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता याला कोणी विरोधही केला नाही. अखेर वृत्तपत्रे व साहित्य वर्तुळातून प्रखर टीका झाल्यानंतर ठाले यांनी नमते घेतले आणि सॅनहोजे येथे पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन होईल, अशी पळवाट काढली आणि ८२ वे साहित्य संमेलन महाराष्ट्रातच घेण्यास ते राजी झाले.

सेन्सॉरशिप, दहशतवाद, झुंडशाही.. असे काही शब्द, साहित्याच्या संदर्भात यावर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळचा जो नवा धुरळा उडाला आहे, त्या निमित्ताने पुन्हा पटावर आलेत. वारकऱ्यांनी असे वागावे का? लोकशाहीचे काय? लेखक-कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय? अध्यक्षाविना संमेलन कसे? साहित्यिक मूग गिळून गप्प का बसले? ज्याने माफी मागितली व अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तो यादवांसारखा साहित्यिक एकाकी का पडला? महामंडळानेही त्यांची बाजू का उचलून धरली नाही? समाजात साहित्यिकांची बूज का राखली जात नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उफाळून आले. आठवडाभर वृत्तपत्रांमधून आणि टीव्हीवर याची चर्चा चालेल. मग आपण ते विसरून जाऊ. पुढच्या वर्षीच्या संमेलनाच्या वेळी गेल्या अनेक वर्षांच्या कुजलेल्या कचऱ्यासह काही कचरा आठवेल. पुन्हा नव्या घाणीने डोकी बरबटून घेण्याची मानसिक तयारी करावी लागेल.

मराठी साहित्यिक आनंद यादव यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे, त्याहूनही ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी मागे घेणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा घात तर आहेच, पण त्याच वेळी साहित्याची आत्महत्याही आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया उमटणे हे आजच्या ‘ पोस्ट मॉडर्न’ आधुनिकतेनंतरच्या आघाताच्या क्रमांत त्याविरोधी असलेल्या प्राचीन सांस्कृतिक अस्मितेच्या द्वंद्वात्मक अवस्थेचे विकृत फलित आहे. तुकारामांबद्दल जर गलिच्छ लिखाण झाले असेल तर ती तुकारामाची दुसरी हत्या होय. आनंद यादवांनी संत तुकारामांविषयी जर अर्वाच्य काही लिहिले असेल तर त्यांचा निषेध लोकशाही मार्गाने करण्याचा वारकऱ्यांचाच नव्हे, तर सामान्यजनांचाही हक्क आहे पण तो राजकीय झुंडशाहीच्या मार्गाने बजावणे हे निषेधार्ह आहे. अखेरीस संत तुकाराम हा मराठी सामान्य जनतेचा कष्टकरी जनतेचा नितांत श्रद्धेचा विषय आहे, म्हणूनच नव्हे तर चातुर्वण्र्य जातिबद्ध समाजाच्या चौकटीत राहूनही मध्ययुगाच्या श्रद्धायुगात तुकारामाच्या भागवतधर्मीय वारकरी पंथाने ब्राह्मणी उच्चवर्णाधिष्ठित समाज व्यवस्थेवर प्रखर प्रहार करून, सर्वसामान्यांना आध्यात्मिक लोकशाहीच्या मानवी मूलभूत मानसिक प्रक्रियेला चैतन्य देऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला केला. या घटनेचा आशय वैश्विक होता म्हणजेच माणसाच्या समानतेचा होता.

वैचारिक दहशतवाद थांबवा!
वा रकरी संप्रदायाने ‘नाठाळाचे काठी देऊ माथां’ हा तुकारामांचा उपदेश मागे ‘शालान्त परीक्षा मंडळा’च्या बाबतीत अक्षरश: आणि आता या प्रकरणी शब्दश: अंमलात आणला, पण ‘क्षमा दया शांति/ तेथे देवाची वसती’ या तुकाराम-वचनाचा मात्र त्यांना सोयीस्कर विसर पडला.
(देवा, या विसरभोळ्या ‘वार’कऱ्यांना क्षमा कर!)