Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९
विविध

अहमदाबाद समाजाचा वार्षिकोत्सव
मराठी जगत

(जगदीश बिनीवाले)
महाराष्ट्र समाज, अहमदाबादचा ८५ वा वार्षिकोत्सव भद्र येथील मंगलभुवन सभागृहात साजरा झाला. बडोदे येथील ‘आलापवृंद’ यांनी सादर केलेल्या गाण्यांनी रसिक श्रोते भारावले. अध्यक्ष सुरेंद्र वाडेकर यांनी ‘आलापवृंदा’च्या सर्व कलाकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी महाराष्ट्र समाज आयोजित विविध रमी स्पर्धामधील विजेत्यांना प्रमुख पाहुण्या मंगलाताई जोशी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सहचिटणीस हेमंत आगरकरांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

टायटलर, सज्जन कुमार यांच्या उमेदवारीमुळे संतापाची लाट
अमृतसर, २८ मार्च/पी.टी.आय.
१९८४ च्या शीखविरोधी दंगलीत हात असल्यावरून खटल्याला तोंड देत असलेले जगदिश टायटलर व सज्जन कुमार यांना काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारी दिल्याने शीख समाजात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस पक्षातही त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या दंगलीत हात असल्याचा आरोप कमलनाथ यांच्यावरही आहे. मात्र त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. या तिन्ही नेत्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

जी-२० बैठकीपूर्वी पंतप्रधानांची उद्योजकांसोबत चर्चा
नवी दिल्ली, २८ मार्च/खास प्रतिनिधी

जागतिक मंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर भविष्यात प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून संघटित आणि असंघटित क्षेत्रांतील कमकुवत घटकांना त्याचा फटका बसणार नाही, यासाठी उद्योगक्षेत्राने संयम दाखवावा, असे आवाहन आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले. मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेला समर्थपणे सामना करता यावा म्हणून उत्पादक गरजांसाठी किफायतशीर दराने पतपुरवठय़ाचा ओघ कायम राखला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जागतिक मंदीवर चर्चा करण्यासाठी लंडन येथे होऊ घातलेल्या जी-२० देशांच्या शिखर संमेलनात भारताला घ्यावयाच्या भूमिकेविषयी उद्योजकांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आज पंतप्रधानांनी चर्चा केली.

अफगाणिस्तान-पाकिस्तान धोरण ठरविताना भारताशीही चर्चा
वॉशिंग्टन, २८ मार्च/पी.टी.आय.

अफगाणिस्तान-पाकिस्तान धोरणाची फेरआखणी करताना अमेरिकेने भारताशीही व्यापक चर्चा केली होती, असे परराष्ट्र खात्याचे उपमंत्री रिचर्ड बाऊचर यांनी दक्षिण आशियाई पत्रकारांना सांगितले. तालिबानी राजवटीच्या तावडीतून मुक्त झालेल्या अफगाणिस्तानच्या फेरउभारणीसाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे अमेरिकेला अतिशय कौतुक वाटते.

भारताशी चर्चेसाठी झरदारी उत्सुक
इस्लामाबाद, २८ मार्च/पी.टी.आय.

मुंबईवरील हल्ल्यानंतर खंडित झालेली भारत-पाकिस्तान चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी उत्सुक आहेत. काश्मीरसह अन्य सर्व प्रश्न सामंजस्याने व चर्चेने सोडविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली आणि सिनेटच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करताना ते बोलत होते. उभय देशांत शांतता नांदावी व त्यासाठी कोणत्याही देशाच्या आत्मगौरवाला तसूभरही धक्का लागू नये, असेही ते म्हणाले.

तिबेटी बंड चिरडण्याचा चीनचा इशारा
बीजिंग, २८ मार्च/पी.टी.आय.
तिबेटमधील फसलेल्या बंडाच्या स्मृतीदिनी राष्ट्रीय सुटी जाहीर करतानाच तिबेटमध्ये कोणत्याही प्रकारचे बंड खपवून घेतले जाणार नाही व सर्व शक्तिनिशी ते चिरडले जाईल, असा इशारा चीनने आज दिला. याच दिवशी १९५१ मध्ये चीनने तिबेटवर लष्करी कब्जा मिळविला होता. तिबेटमध्ये पोटाला राजप्रासादासमोर चीनचा पंचतारांकित लाल ध्वज फडकाविण्यात आला. यावेळी पारंपरिक पेहरावात सुमारे दहा हजार तिबेटी उपस्थित होते. यावेळी चीनचे राष्ट्रगीत गायले गेले. या कार्यक्रमाचे देशभर दूरचित्रवाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण झाले. तिबेटवर चीनचा ध्वज सतत फडकतच राहील, असे प्रतिपादन कम्युनिस्ट नेते शांग किंगली यांनी यावेळी केले. आमच्यात आणि दलाई लामांमध्ये सुरू असलेला संघर्ष हा तात्त्विक, धार्मिक किंवा मानवी हक्कांशीदेखील संबंधित नाही. हा चीनच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे, अशी दर्पोक्ती त्यांनी केली.