Leading International Marathi News Daily
सोमवार, ३० मार्च २००९

बचेंगे तो और भी लडेंगे!
नेपियर, २९ मार्च / पीटीआय
आणखी एक दिवस झुंजण्याचे
भारतापुढे आव्हान; गंभीरचे शतक
पहिल्या डावातील घसरगुंडीनंतर ३१४ धावांची प्रचंड मोठी पिछाडी पाठीवर घेऊन झुंजायला निघालेला भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कसोटी वाचवू शकेल की यजमानांपुढे शरण जाईल, याचे उत्तर या कसोटीच्या उद्याच्या अखेरच्या दिवशी मिळणार आहे. पहिल्या डावातील खेळाच्या तुलेनत फॉलोऑननंतर केलेल्या ‘गंभीर’ खेळामुळे भारतीय संघाने चौथा दिवस निभावून नेला आता अखेरचा दिवस शिल्लक आहे. २ बाद २५२ अशा स्थितीनंतर भारतीय संघ अजूनही ६२ धावांनी मागे आहे. ही पिछाडी भरून काढण्याबरोबरच न्यूझीलंडला फलंदाजीस उतरण्याची संधी नाकारणे आणि मालिकेत १-१ अशा बरोबरीपासून परावृत्त करणे हे आव्हानही पाहुण्यांना पेलायचे आहे.

द्रविडचा बळी
भारतीय संघाला एकीकडे न्यूझीलंडविरुद्धचा किल्ला लढविताना एकेक फलंदाज मोलाचा असताना पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे राहुल द्रविडच्या रूपात भारतीय संघाला महत्त्वाच्या क्षणी मोठा धक्का बसला. चहापानाला २७ मिनिटे शिल्लक असताना पंच इयन गोल्ड यांनी राहुल द्रविड झेलचित असल्याचा निर्णय दिला. पण द्रविडच्या पॅडला स्पर्श करून चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेगला जॅमी हाऊच्या हातात गेला होता. रिप्लेत द्रविड चुकीच्या निर्णयाचा बळी ठरल्याचे स्पष्ट झाले. द्रविड आणि गंभीर यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली होती. ही भागीदारी वाढवून किवींना धोबीपछाड देण्याचे स्वप्न मात्र द्रविड दुर्दैवीरित्या बाद झाल्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही.

‘भाजपची भूमिका योग्य’
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्यावर केलेली टीका आणि पिलीभीतमध्ये घडत असलेल्या वरुणनाटय़ाविषयी आजच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारू नका, त्यांची उत्तरे आपण पुढच्या वेळी देऊ, अशी अडवाणींनी स्वतहूनच पत्रकारांना विनंती केली. स्वीस बँकेतील काळ्या धनाचे वृत्त राष्ट्रीय महत्त्वाचे आहे. त्याला न्याय मिळायला हवा, असे ते म्हणाले. पण वरुण गांधींच्या मुद्यावर टिप्पणी केल्यावाचून त्यांना राहवले नाही. वरुण गांधी प्रकरणी कायद्यातील तरतुदींनुसार भाजपने घेतलेल्या ‘योग्य’ भूमिकेचे त्यांनी समर्थन केले. मूळात पिलीभीतमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचे वरुण गांधींवरील आरोप खरे आहेत की खोटे हेच सिद्ध झालेले नाहीत. पण सीडीमध्ये त्यांच्या तोंडी ज्या गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत, त्यापासून भाजपने स्वतला दूर केले आहे, असे अडवाणी म्हणाले.

मालेगावचे आरोपी पकडल्यापासून देशात
एकही बॉम्बस्फोट नाही - पवार
मुंबई, २९ मार्च / खास प्रतिनिधी
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा इशारा मुंबईतील उलेमांनी दिल्याच्या पाश्र्वभूमीवर लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी या हिंदुत्ववादी नेत्यांना लक्ष्य करतानाच मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या अटकेनंतर अद्याप देशात एकही बॉम्बस्फोट झाला नसल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुस्लिम मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. आघाडी आणि जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये आलेल्या कटुतेच्या पाश्र्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी बोलताना पवारांनी शिवसेना, भाजप व रा. स्व. संघावर जोरदार टीका केली. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वरुण गांधी यांचे लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग हे समर्थन करतात. अशा लोकांच्या हातात देशाची सत्ता देणार का, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना, भाजप व रा. स्व. संघाच्या मंडळींकडे सत्ता सोपविल्यास देश ५० वर्षे मागे जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या गडातून इच्छुक पळविण्याच्या
भाजपच्या प्रयत्नाने युती पुन्हा संकटात!
संदीप प्रधान, मुंबई, २९ मार्च
भिवंडी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपने हिसकावून घेतला. परंतु भाजपकडे उमेदवार नसल्याने शिवसेनेच्या गडातून कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांना पळविण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याने शिवसेना भाजपवर प्रचंड कोपली आहे. पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी दिली तर युती तुटेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. धुळ्यातही असाच शिवसेनेतील उमेदवार पळविण्याचा प्रयत्न भाजपने करून पाहिला. पण त्यांची डाळ शिजली नाही. आता ‘चलो दिल्ली’चा नारा देत प्रचाराची रणधुमाळी सुरू करायला सज्ज असलेल्या युतीमध्ये नवे भांडण पेटले आहे.

महाराष्ट्रात समाजवादी पक्ष अनेक ठिकाणी उमेदवार उभे करणार
नवी दिल्ली, २९ मार्च/पीटीआय

उत्तर प्रदेशात काँग्रेसबरोबर जागावाटपाचा समझोता होऊ न शकल्याने आता समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात अनेक मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. वायव्य मुंबई मतदारसंघाची जागा समाजवादी पक्षाला देण्यास काँग्रेसने नकार दिल्याने आता तेथे समाजवादी पक्षाचा उमेदवार उभा केला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पक्षाचे सरचिटणीस अमरसिंग यांनी सांगितले की, वायव्य मुंबई मतदारसंघाची जागा समाजवादी पक्षासाठी सोडता येणार नाही, असे आजच काँग्रेसने आम्हाला रीतसर कळवले असून, त्यामुळे आम्हाला वाईट वाटते. आता नाईलाजाने महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आम्हाला उभे करावे लागणार आहेत.

पुणे विद्यापीठातील शिक्षक तपासतो दिवसाला ६२४ उत्तरपत्रिका!
पुणे, २९ मार्च/खास प्रतिनिधी

ऑस्ट्रेलियाच्या एकाच दिवसात ४०० धावा, सर डॉन ब्रॅडमन यांचे पहिल्याच दिवशी त्रिशतक.. पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांनीही असेच विक्रम केले आहेत. क्रिकेटच्या खेळपट्टीवर नव्हे, तर केंद्रीय मूल्यमापन प्रक्रियेमध्ये उत्तरपत्रिका तपासणीच्या कामामध्ये! अनोख्या ‘कार्यक्षमते’चा प्रत्यय देत विद्यापीठातील प्राध्यापकांनी एका दिवसात तब्बल ६२४ उत्तरपत्रिका तपासल्या आहेत.

भारतीय दूतावासाच्या संगणकातील माहितीचे चिनी गटांकडून हॅकिंग
न्यूयॉर्क, २९ मार्च/पीटीआय

चीनच्या नियंत्रणाखालील एका मोठय़ा सायबर हेरगिरी यंत्रणेने भारताच्या वॉशिंग्टनमधील दूतावासासह किमान १०३ देशातील सरकारी व खासगी संगणकातील माहिती चोरली आहे. तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्या संगणकातही घुसखोरी करण्यात आल्याचे वृत्त आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कॅनेडियन संशोधकांनी केलेल्या तपासणीनुसार चीनमधील संगणकांकडून नियंत्रित करण्यात आलेल्या हॅकर्सच्या गटाने ही सर्व माहिती संगणकांमधून चोरली आहे. त्यात चीन सरकारचा हात असल्याचे मात्र स्पष्टपणे म्हटलेले नाही.

वरुणविरुद्ध दंगल, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
पिलिभीत, २९ मार्च/पी.टी.आय.

भाजपचे पिलिभीत येथील उमेदवार वरुण गांधी यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दंगल माजविणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरुण गांधी यांनी निवडणूक प्रचारात मुस्लिम समाजाविरुद्ध केलेल्या आगखाऊ भाषणासाठी काल त्यांना अटक करण्यात आली. त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र या अटकेच्या वेळी पिलिभीतमध्ये त्यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमकी झडल्या. समर्थकांनी तुफान दगडफेक केली तर पोलिसांनीही लाठीमार केला. या साऱ्या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी वरुण गांधी यांच्यावर दंगल माजविणे, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामकाजात अडथळा आणणे, इतरांचे जीवित धोक्यात आणणे आदी गुन्हे दाखल केले. वरुण यांच्यासह भाजपचे उत्तर प्रदेश अध्यक्ष कलराज मिश्र, स्थानिक आमदार सुखलाल आणि माजी आमदार बी. के. गुप्ता तसेच अनेक कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कालच्या अटकनाटय़ाच्या वेळी एका मुस्लिम अधिकाऱ्याने वरुण यांच्या समर्थकांवर बेछुट लाठीहल्ला करून अनेक कार्यकर्त्यांना जखमी केले, असा आरोप वरुण यांची आई मनेका गांधी यांनी केला. मात्र हा आरोप निखालस असत्य आणि निराधार असल्याचा दावा पिलिभीतचे जिल्हा न्यायाधीश अशोक चौहान यांनी केला.

वरुणला ‘रासुका’
नवी दिल्ली, २९ मार्च/पीटीआय

एका समाजाविरुद्ध भडक वक्तव्ये करून जातीय तणाव निर्माण केल्याच्या आरोपाखाली भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने आज ‘रासुका’ लावला.त्यापूर्वी वरुण गांधी यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दंगल माजविणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरुण गांधी यांनी निवडणूक प्रचारात मुस्लिम समाजाविरुद्ध केलेल्या आगखाऊ भाषणासाठी काल त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र या अटकेच्या वेळी पिलिभीतमध्ये त्यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमकी झडल्या. या साऱ्या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी वरुण गांधी यांच्यावर दंगल माजविणे, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामकाजात अडथळा आणणे, इतरांचे जीवित धोक्यात आणणे आदी गुन्हे दाखल केले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी