Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

सांगलीचे काँग्रेस भवन सुने-सुने.. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची वेळ आली तरी सांगली मतदार संघातील काँग्रेसची उमेदवारी सोमवारी सायंकाळपर्यंत जाहीर झाली नव्हती. त्यामुळे एकेकाळी वसंतदादांचा दरारा असलेल्या काँग्रेसभवनमध्ये सोमवारी दुपारीही अक्षरश: शुकशुकाट होता.

सांगलीत महाआघाडीत फाटाफूट सुरु; रिपब्लिकन पक्ष काँग्रेसबरोबर
सांगली, ३० मार्च / प्रतिनिधी

सांगली महापालिकेतील सत्ताधारी विकास महाआघाडीत लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर फाटाफूट सुरू झाली असून घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने काँग्रेसबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे, तर भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात पक्षाचा स्वतंत्र उमेदवार असल्यास विकास महाआघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महापालिकेतील काँग्रेसचे रोहयोमंत्री मदन पाटील यांची गेल्या दहा वर्षांतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री जयंत पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षाची विकास महाआघाडीच्या नावाखाली मोट बांधली होती.

डॉ. भा. ल. भोळे यांना महर्षी शिंदे पुरस्कार
सातारा, ३० मार्च / प्रतिनिधी

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे उपाध्यक्ष डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे (नागपूर) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. रवींद्र चव्हाण, शरच्चंद्र चव्हाण, सतीश कुलकर्णी व प्रा. संभाजीराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सामाजिक चळवळीचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत, संशोधक दलित मित्र प. वा. रा.ना. चव्हाण यांच्या स्मरणार्थ समाज प्रबोधनासाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात संशोधनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीस महर्षी शिंदे पुरस्कार दिला जातो.

‘सोनपरी डॉल’ घोटाळ्यातील प्रमुखासह आठ जणांना अटक
इस्लामपूर, ३० मार्च / वार्ताहर

महिलांना ‘सोनपरी डॉल’ नावाच्या बाहुल्या तयार करण्याचा उद्योग घरच्या घरी देऊन रोज ८० रुपये कमाई करण्याचे गाजर दाखवून सांगलीसह सातारा, पुणे व कोल्हापूर जिल्ह्य़ातील अंदाजे १२ हजारांवर महिलांना अनामत व प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली तब्बल पाच कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या सागाव (ता. शिराळा) येथील जीवन आनंद बहुउद्देशीय संस्थेचा सर्वेसर्वा आनंदा तुकाराम मलगुंडे याला अटक केली असून शाखानिहाय घोटाळ्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. मूळगाव वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील आनंदा मलगुंडे हा आपल्या आजोळी म्हणजे सागाव येथे राहत आहे.

उजनी धरणात अतिदूषित पाणी
जागृतीची गरज -अनिल पाटील

सोलापूर, ३० मार्च / प्रतिनिधी

पुण्यातील मुळा-मुठा या अतिप्रदूषित नद्यांतील पाणी उजनी धरणात येत असून तेच पाणी सोलापूर जिल्ह्य़ातील जनतेला प्यावे लागते. त्यामुळे येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नावर जाणीवजागृती होणे आवश्यक आहे, असे मत तरुण जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी व्यक्त केले. तुर्कस्तान येथे नुकत्याच झालेल्या जागतिक पाणी परिषदेत सहभागी होऊन परतल्यानंतर पाटील यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी वार्तालाप केला.

सांगलीत संभ्रमावस्था
सांगली, ३० मार्च / गणेश जोशी

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार अद्यापही अधिकृतरीत्या जाहीर झालेला नाही. महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांची खलबते त्यांच्या ‘अस्मिता’ बंगल्यातून, तर संभाव्य उमेदवार विद्यमान खासदार प्रतीक पाटील हे प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे नेतेच नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हा काँग्रेस भवनात शुकशुकाट जाणवत आहे. जिल्हा काँग्रेस भवन म्हणजे खासदार प्रतीक पाटील यांचेच कार्यालय असे समीकरण बनून गेले आहे.

देशमुख दूध संघाकडून कमी दरात दूध पुरवठा
आटपाडी, ३० मार्च / वार्ताहर

श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संघाने शहरातील ग्राहकांसाठी कमी दरात दूध देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. दुष्काळी आटपाडी तालुक्यात व तालुक्याबाहेरील दूध संघांनी दूध उत्पादकांना वेठीस धरले होते. त्यानंतर अमरसिंह देशमुख यांनी दूध संघ स्थापन केला. या दूध संघाने चोख कारभार, दूध उत्पादकांना बोनस वाटप, जनावरे घेण्यासाठी अल्पदराने कर्जपुरवठा व सौहार्दपूर्ण वागणूक दिल्याने दूध संकलनाने २५ हजार लिटरचा टप्पा गाठला. त्यामुळे आता या दूध संघाने ब्रॅन्डनेमखाली सुरू केलेल्या पॅकिंग दुधाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात सध्या पाच हजार लिटर पॅकिंग दुधाची विक्री होत आहे.

सोलापुरात जूनमध्ये पहिले आंबेडकरी साहित्य संमेलन
सोलापूर, ३० मार्च/ प्रतिनिधी

सोलापुरात येत्या जूनमध्ये पहिले अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन होणार असून त्याची पूर्वतयारी केली जात आहे. आंबेडकरी चळवळीने कृतीतून दलित समाजावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यामुळे आंबेडकरी चळवळ हेच खरे साहित्य संमेलन असल्याचे संबोधले जात आहे. या संदर्भात प्रा. डॉ. अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाच्या संयोजन समितीची बैठक भाई छन्नुसिंग चंदेले समाजसेवा महाविद्यालयात झाली. हे संमेलन दि. १३ व १४ जून रोजी घेण्याचे ठरविण्यात आल्याचे प्रा. डॉ. गायकवाड यांनी सांगितले. या बैठकीस दलितमित्र सि.गु. सोनकांबळे, आर. ई. ताकपेरे, सिद्धार्थ गायकवाड, अशोक वाघमारे, संजय रणदिवे, महेंद्र माने, गौतम क्षीरसागर, नेमचंद घोडके आदी उपस्थित होते.

अतिक्रमण हटविण्यास विरोध करणाऱ्या नगरसेवकास अटक
मिरज, ३० मार्च / वार्ताहर

मिरज शहरातील अतिक्रमण हटविण्यास अडथळा आणल्याच्या कारणावरून आमदार हाफिज धत्तुरे यांचे चिरंजीव नगरसेवक नफिसआलम धत्तुरे यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. तसेच अन्य दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे. गतसप्ताहात महापालिका पथकाला अतिक्रमण काढत असताना श्री. धत्तुरे यांनी शिवीगाळ करून अडथळा आणला होता, अशी फिर्याद अभियंता पोपट आवळे यांनी दिली होती. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून आज अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या तिघांची जामिनावर मुक्तता केली.

थकीत पाणीपट्टीसाठी स्टार्टर काढणाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव
इचलकरंजी, ३० मार्च / वार्ताहर

थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी शेतीपंपाचे स्टार्टर काढून आणल्याच्या कारवाई विरोधात शेतकऱ्यांनी येथील पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना सुमारे दोन तास घेरावो घातला. अभियंता महादेव लांडगे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून स्टार्टर शेतकऱ्यांना परत दिल्यानंतर सोमवारी दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले. पंचगंगा नदीकाठच्या अब्दूललाट (ता.शिरोळ) या बागायत जमीन शेतकऱ्यांची पाणीपट्टीची देयके थकीत आहेत. थकीत बिलापोटी पाटबंधारे खात्याच्या अधिकायांनी शेतीपंपाचे स्टार्टर काढून नेले. या कारवाईला शेतकरी विकास समितीने आक्षेप घेतला. यासंदर्भातल नियमावली दाखवून स्टार्टर काढण्याची प्रक्रिया पाटबंधारे खात्यावरील वरिष्ठांना असल्याचे त्यांनी दाखवून दिले. या स्पष्टीकरणाचा खुलासा मागवल्यानंतर स्टार्टर परत करण्यात आले.