Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

लाहोरच्या पोलीस अ‍ॅकॅडमीवर दहशतवादी हल्ला, १३ ठार
पाकिस्तानी कमांडोजच्या कारवाईत आठ अतिरेकी ठार, तर सहा जणांना जिवंत पकडले

लाहोर, ३० मार्च/पी.टी.आय.
गेल्या २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा जणू पुढील भाग वाटावा, असा हल्ला आज सकाळी लाहोरजवळच्या मनावन येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर केला. सुमारे १० अतिरेक्यांनी ग्रेनेड्स फेकत या केंद्रात प्रवेश केला आणि अल्पावधीतच आतील शेकडो प्रशिक्षणार्थ्यांना ओलीस धरले. आठ तासांच्या चकमकीनंतर पाकिस्तानी कमांडोंनी चार अतिरेक्यांना ठार केले तर सहाजणांना जिवंत पकडण्यात यश मिळविले. हल्ल्यात १३ पोलीस ठार तर किमान ९० जण जखमी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

ठाण्यात युतीच्या मेळाव्यात राडा
*राजाराम साळवी यांची भाजपवर आगपाखड * खुच्र्यांची फेकाफेक * उमेदवारही हवालदिल

ठाणे, ३० मार्च/प्रतिनिधी

शिवसेनेला पाठिंबा देणारे आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांनी केलेल्या भाजपउद्धाराने आज युतीच्या मेळाव्यात चांगलाच राडा झाला. युतीच्या चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी झालेल्या या निर्धार मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे एकच गोंधळ उडाला आणि साळवी यांना सभागृहातून काढता पाय घ्यावा लागला. पहिल्याच बैठकीत झालेल्या या राडय़ाने युतीचे उमेदवारही हवालदिल झाले.

राष्ट्रवादीचा एक पाय युपीएच्या तर एक डाव्या आघाडीच्या दगडावर !
संतोष प्रधान
मुंबई, ३० मार्च

राजकारणाच्या कुरुक्षेत्रात शत्रुला नमवण्यासाठी विविध युक्त्याप्रयुक्त्या आणि व्यूहरचना कराव्या लागतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण मात्र भल्याभल्यांना चकित करणारे आहे. त्याचे उदाहरण म्हणजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर हातात हात घालून शिवसेना भाजप युतीविरोधात लढणार आहे. मात्र महाराष्ट्र वगळता देशभरात राष्ट्रवादीने घरोबा केलेले मित्रपक्ष पूर्णत: वेगळे असून त्यांची युती काँग्रेसविरोधात उभी ठाकणार आहे.

सारंगी महाजन यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे पूनम यांना उमेदवारी नाकारली?
मुंबई, ३० मार्च/प्रतिनिधी

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम यांना उमेदवारी दिली असती तर विरोधी पक्षांनी प्रमोद यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेले त्यांचे बंधू प्रविण यांच्या पत्नी सारंगी महाजन यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, असा गौप्यस्फोट भाजपच्या एका नेत्याने ‘लोकसत्ता’कडे केला. पूनम विरुद्ध सारंगी असा सामना आरोप-प्रत्यारोपांनी रंगला असता व त्याचा भाजपला देशभरात फटका बसला असता अशी भीती या नेत्याने व्यक्त केली व पूनम यांना उमेदवारी नाकारण्याची जी अनेक कारण आहेत त्यामधील हेही महत्वाचे कारण असल्याचा दावा केला.

अभियांत्रिकी आणि आयटीची यंदाची ‘प्लेसमेंट’ लांबणीवर!
आशिष पेंडसे
पुणे, ३० मार्च

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंदीसदृश स्थितीमध्ये अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांमधील यंदाची ‘प्लेसमेंट’ पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. ‘शैक्षणिक पाया विकसित करण्याची संधी,’ अशा शब्दांत ‘प्लेसमेंट’ टाळण्याचे समर्थन केले जात असले, तरी ‘आहे त्याच नोकऱ्या टिकविण्याचे आव्हान असताना नवीन भरती करणार तरी कशी,’ असा सवाल उद्योगविश्वातून उपस्थित करण्यात येत आहे. अभियांत्रिकी-आयटी महाविद्यालये, शिक्षणसंस्थांमध्ये अंतिम वर्षांच्या अगोदरच्या वर्षांमधील मुला-मुलींच्या मुलाखती घेऊन ‘प्लेसमेंट’ देण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे.

रामदास आठवले शिर्डीतूनच लढणार
मुंबई, ३० मार्च / खास प्रतिनिधी

शिर्डीपेक्षा दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढायला उत्सुक असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना काँग्रेस पक्षाने शिर्डीतूनच निवडणूक लढविण्यास सांगितले आहे. पंढरपूर (राखीव) मतदारसंघातून निवडणूक लढविताना आठवले यांनी ‘विमान’ हे चिन्ह घेतले होते. या वेळी ‘विमान’ चिन्ह मिळण्याची शक्यता कमी असल्याने ‘कपबशी’ या चिन्हाला ते प्राधान्य देणार आहेत. ‘विमान’ चिन्ह मिळाले असते तर नवी दिल्लीला लवकर पोहचलो असतो, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी व्यक्त केली. आठवले यांचा हा लोकसभेचा तिसरा मतदारसंघ आहे. योगायोग म्हणजे दरवेळी त्यांना देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघ लाभला आहे. उत्तर-मध्य मुंबईत सिद्धिविनायक, पंढरपूरमध्ये विठोबा तर आता शिर्डीत साईबाबांचा आशीर्वाद लाभणार असल्याचे मार्मिक विधान राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आठवले यांच्याबाबत केले होते. या वेळी आठवले यांचा आग्रह दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघासाठी होता. त्यासाठी त्यांनी काँग्रेस नेत्यांकडे फिल्डिंगही लावली होती. मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा मतदारसंघ आठवले यांच्यासाठी सोडण्यास नकार दिला. त्यानुसार शिर्डीतून निवडणूक लढण्याचे आठवले यांनी जाहीर केले आहे.

सोलापुरातून सुशीलकुमार
नवी दिल्ली, ३० मार्च/खास प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढणार आहेत. शिंदे यांच्या उमेदवारीवर आज काँग्रेसश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. पाच वर्षांंनंतर शिंदे पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या िरगणात उतरले असून उद्या ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अनुसूचित जातींसाठी राखीव झालेल्या या मतदारसंघात शिंदे यांची लढत भाजपचे उमेदवार शरद बनसोडे यांच्याशी होणार आहे. २००४ साली सोलापुरात झालेल्या लढतीत शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला यांना भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पाच हजार मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता.

संजय दत्तच्या अर्जावर निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला
नवी दिल्ली, ३० मार्च / पी. टी. आय.

लोकसभेची निवडणूक लढविता यावी म्हणून १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आपली शिक्षा रद्द करावी म्हणून बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याने केलेल्या याचिकेवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. सरन्यायाधीश जी. के. बालकृष्णन यांच्या खंडपीठापुढे आज या अर्जावर सुनावणी झाली. सीबीआयने संजयच्या मागणीला विरोध दर्शविला. संजय दत्तचा बॉम्बस्फोटात संबंध नव्हता हे टाडा कोर्टाने मान्य केलेले आहे, असा युक्तिवाद संजयचे वकील हरिष साळवे यांनी केला.

वरुण गांधी यांना जामीन
पिलभीत, ३० मार्च / पी. टी. आय.

भाजपचे वादग्रस्त युवा नेते वरुण गांधी यांना दोन वेगवेगळ्या प्रकरणात येथील स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र वरुण गांधी यांना रासुका लावण्यात आल्याने ते तुरुंगातच राहतील. मुख्य न्याय दंडाधिकारी विपिनकुमार यांच्या न्यायालयात ४५ मिनिटांच्या वादी व प्रतिवादींचे म्हणणे ऐकल्यानंतर २० हजार रुपयांचे प्रत्येकी दोन वैयक्तिक जातमुचलके भरण्यास सांगण्यात आले. रासुकाविरुद्ध वरुण गांधी हे अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील करणार आहेत.

पोलिसांवर हल्ला; ११ दरोडेखोरांना अटक, ४५ जणांविरुध्द गुन्हा
अकोला, ३० मार्च/प्रतिनिधी

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ४५ दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ११ दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील मालठाणा येथे शनिवारी रात्री ही घटना घडली होती. मूर्तीजापूर तालुक्यातील सोनेरी शिवारातील ६० हजारांच्या दरोडय़ाचे धागेदोरे बुलढाणा जिल्ह्य़ातील मालठाणा येथील पारधी समाजाच्या वस्तीशी जुळत असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा आणि मूर्तीजापूर पोलिसांचे पथक दरोडेखोरांना पकडण्यासाठी शनिवारी रात्री मालठाणा येथे पोहोचले होते. दरोडेखोरांना पकडण्यापूर्वीच त्यांच्यावर चहूबाजूंनी दरोडेखोरांनी हल्ला केला होता. दरोडेखोरांनी केलेल्या दगडफेकीत १२ पोलीस जखमी झाले होते, त्यापैकी दोघांना जास्त मारला होता. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संकेत भोसले, जुगल भोसले, सागर भोसले, जुगनू भोसले, राहूल भोसले, वंदू पवार, सुकन्या पवार, कामिनी भोसले, ज्योती भोसले, राजकन्या पवार, चंदा पवार यांचा समावेश आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार दीपक पवार पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी