Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

शेकडोंचे बळी घेणाऱ्यांकडून एकोप्याची भाषा - पवार
अंबाजोगाई, ३० मार्च/वार्ताहर

गुजरातमध्ये ज्यांनी शेकडो निरपराध लोकांचे बळी घेतले तेच आज राष्ट्रीय एकोप्याची भाषा करीत आहेत. रक्ताने हात माखलेल्या अशा जातीवाद्यांना महाराष्ट्र कदापीही शक्ती देणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी- काँग्रेस- रिपाइंचे उमेदवार रमेश आडसकर यांच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीने मोठे शक्तिप्रदर्शन केले.

पवारांकडून अल्पसंख्याकांचे मतांसाठी लांगूलचालन - मुंडे
नांदेड, ३० मार्च/वार्ताहर

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करून त्यांची मते मिळविण्यासाठीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केला. नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेसाठी गोपीनाथ मुंडे आज नांदेडात आले होते. सभा संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रिपाइं नेते रामदास आठवले आता शरद पवार यांच्यासमवेत राहिले नाहीत. आगामी निवडणुकीत दलित मते मिळणार नाहीत, मुस्लिम समाजही ‘राष्ट्रवादी’पासून दूर गेला आहे.

युतीतील बंडखोरीच्या चर्चेने खळबळ
स्थायी समिती सभापती निवडणूक
औरंगाबाद, ३० मार्च/प्रतिनिधी
औरंगाबाद पालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात निवडणूक होणार आहे. येथे युतीचे संपूर्ण बहुमत असताना पुन्हा एकदा विद्यमान सभापती अब्दुल साजेद यांनी चमत्कार घडविण्यासाठी मोर्चेबांधणी केली असल्याचे समोर आले आहे. मागील आठवडय़ातच स्थायी समितीचे सदस्य झालेले शिवसेनेचे दामोदर शिंदे हे तीन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत.

जोरदार शक्ती प्रदर्शनाने दुधगावकरांचा अर्ज दाखल
परभणी, ३० मार्च/वार्ताहर

‘जय भवानी - जय शिवाजी’ असा उद्घोष करीत प्रचंड संख्येने शहरात आलेल्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. गणेश दुधगावकर यांनी आपली उमेदवारी आज दाखल केली. एका भव्य रॅलीने दुधगावकरांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून या रॅलीत शिवसैनिक मोठय़ा संख्येने हजर होते. अ‍ॅड. दुधगावकर यांचा उमेदवारी अर्ज मोठय़ा शक्ती प्रदर्शनाने दाखल होईल हे अपेक्षित होते मात्र आजच्या गर्दीने अनपेक्षित आकडा गाठला.

रगैल दोडका
*गावोगावच्या कट्टय़ावर आता ‘विलेक्शन’च्या चर्चेचा जोर वाढू लागला आहे. कोण उमेदवार कसा आहे, याची गुप्त माहिती सांगितल्याच्या अविर्भावात जो तो बोलू लागला आहे. ‘तो ना उगं फुश्शारी दोडका हाय. त्याच्या बोलण्याकडं ध्यान देऊ नगा’, तर दुसऱ्या उमेदवाराबद्दल बोलताना, ‘त्याच्यात ना जराबी विनम्रपणा नाही, निव्वळ रगैल दोडका हाय’ अशा चर्चा झडत आहेत. असं करतानाच ‘आपलं रीडिंग कसं हाय’ याबद्दल एकमेकांवर इम्प्रेशन मारणं सुरू आहे. तसेच उगाच भानगड नको म्हणून एकमेकांचा ‘इनसलट’भी करायचा नाही, असा करार झालेला असतो व गप्पांना रंग चढतो.

दागिने चोरणारी टोळी गजाआड
लातूर, ३० मार्च/वार्ताहर

सराफा दुकानातून सोने-चांदीचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील चोरटय़ांना शहरातील गांधी चौक पोलिसांनी गजाआड केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, येथील सराफलाईनमधील कोतमे ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर सोपान कोतमे हे ११ डिसेंबरला आपल्या दुकानात सोने, चांदीचे दागिने विक्री करत होते. त्या वेळी दोन बुरखाधारी स्त्रिया दुकानात येऊन त्यांनी कानातील झुमके व इतर दागिने पाहण्यास मागितले.

तिआनमेन चौक
लोकशाही स्वातंत्र्याचा उच्च आविष्कार म्हणून आपण भारतीय लोकशाहीकडे पाहतो. आपणच काय, जगभरातले लोक भारतीय लोकशाहीकडे त्याच दृष्टीने पाहतात. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीने लोकशाहीचा पाया मजबूत बनतो. स्वातंत्र्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य या गोष्टींना फार महत्त्व आहे. सहज मिळाल्या म्हणून या गोष्टींना आपल्याकडे फारसं गांभीर्यानं बघितलं जात नाही. भारतीय स्त्रियांना मतस्वातंत्र्य न झगडता मिळालं. कुणीही आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढावा, घेराओ करावा हे इथं सहज आहे.

विकासाच्या आधारावरच लोकसभेची निवडणूक - मुंडे
परळी वैजनाथ, ३० मार्च/वार्ताहर
कुणाचीही निंदानालस्ती किंवा उणेदुणे न काढता विकासाच्या आधारावर आपण लोकसभेची निवडणूक लढवीत आहोत. जिल्ह्य़ाचा आवाज संसदेत बुलंद करण्यासाठी आणि मतदारसंघाची तकदीर, तसबीर बदलून टाकण्यासाठी निवडणुकीत आपल्याला मतदान करावे, असे आवाहन बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-सेनेचे उमेदवार तथा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार गोपीनाथ मुंडे यांनी केले आहे.

‘नाही रे’ समाजासाठी माझी उमेदवारी - बाबुराव पोटभरे
लातूर, ३० मार्च/वार्ताहर

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे केवळ सोशल इंजिनीयरिंगचे राजकारण करीत असल्याने ‘नाही रे’ समाजासाठी आपली उमेदवारी भारिप बहुजन महासंघाने घोषित केली आहे, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे प्रवक्ते व लातूर लोकसभेचे उमेदवार बाबुराव पोटभरे यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज धसवाडीकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पैठण, फुलंब्री मतदारसंघांतील शिवसेनेचा प्रभाव महत्त्वाचा
जालना लोकसभा मतदारसंघ
जालना, ३० मार्च/वार्ताहर
मागील पाच लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव असलेले औरंगाबाद पूर्व (सध्याचा फुलंब्री) आणि पैठण हे दोन विधानसभा मतदारसंघ आता जालना लोकसभा मतदारसंघात आलेले आहेत. जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा कल महत्त्वाचा राहील, असे मानले जात आहे. १९९१ मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे मोरेश्वर सावे ८२ हजार ४१९ मताधिक्क्य़ाने विजयी झाले होते.

आडनाव गांधी असल्यामुळे वरुण ‘महात्मा’ कसा होईल - सूर्यकांता पाटील
हिंगोली, ३० मार्च/वार्ताहर

वरुण गांधीच्या आडनावात गांधी असल्यामुळे तो काही महात्मा गांधी होईल काय, याचे उत्तर सुज्ञांकडून नाही असेच येईल. त्यामुळे जातीयवादाचे विष पेरून कुणाच्या हाताचे तुकडे पाडा म्हणणाऱ्याला पिलिभीतमध्ये गजाआड जावे लागले. त्यामुळे येत्या निवडणुकीत जात्यंध पक्षीय राजकारण करून देशाचे, समाजाचे तुकडे करणाऱ्या निष्क्रियांना पराभूत करून काम केलेल्या, करणाऱ्या आणि मानव समाज हा एकमेव समाज आहे, असे समजणाऱ्याला मतदान करा.

उस्मानाबादमधून बसवराज पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात?
उस्मानाबाद, ३० मार्च/वार्ताहर

राष्ट्रवादीवर नाराज असणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गोंधळातली बैठक आटोपून रविवारी रात्री काँग्रेसजनांत खलबते झाली. अपक्ष म्हणून बसवराज पाटील यांनी निवडणुकीत उभे राहावे, असा कार्यकर्त्यांचा सल्ला नेत्यांनी गांभीर्याने घेतला. बसवराज पाटील आता बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. रविवारी रात्री उशिरा कार्यकर्त्यांच्या मागणीचा हवाला देत मैत्रीपूर्ण लढत होईल, असे सांगण्यात येत होते. सकाळी काँग्रेस नेत्यांची भाषा सौम्य होती. याचा निर्णय २ एप्रिलला घेण्यात येणार आहे.

राहुल गांधी यांची आज नांदेडमध्ये सभा
नांदेड, ३० मार्च/वार्ताहर

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व युवा नेते खासदार राहुल गांधी यांची उद्या (मंगळवारी) नांदेड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी कालपासून प्रयत्नरत आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार भास्करराव पाटील-खतगावकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. देगलूर नाका परिसरातल्या मोकळ्या जागेवर सकाळी १० वा. होणाऱ्या या सभेला मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार कमलकिशोर कदम, आमदार बापूसाहेब गोरठेकर, माजी खासदार गंगाधराव कुंटूरकर, अमिता चव्हाण, आमदार किरण रेड्डी आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.राहुल गांधींची सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी सायंकाळी सभास्थळी भेट देऊन पूर्ण पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमिता चव्हाण सभेचे पूर्ण नियोजन करीत आहेत. या सभेला जनसागर लोटेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटत असून त्यादृष्टीने तयारी करण्यात आल्याचे प्रदेश सरचिटणीस अमर राजूरकर यांनी सांगितले. या सभेला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अमिता चव्हाण यांचा नांदेडमधून अर्ज दाखल
नांदेड, ३० मार्च/प्रतिनिधी

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्यासह आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २१ जणांनी अर्ज दाखल केले. नांदेड लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार असल्याने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. सकाळी काँग्रेसतर्फे सौ. अमिता चव्हाण, जनता पार्टीतर्फे अ‍ॅड. बाहेती, भाजपातर्फे संभाजी पवार, भारिप-बहुजन महासंघातर्फे अल्ताफ अहेमद यांच्यासह २१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी वेगवेगळ्या पक्षाच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी २० अर्ज दाखल केले होते. अखेरच्या दिवशी २१ जणांनी अर्ज दाखल केल्याने आतापर्यंत ४१ उमेदवारांनी ७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या उसोमवारी अर्जाची छानणी होणार आहे. आज अमिता अशोक चव्हाण यांनी अर्ज दाखल केल्याने एकच खळबळ उडाली. काँग्रेस पक्षातर्फे ऐनवेळी उमेदवारीत बदल होतो की काय, अशी चर्चा होती.

परभणीत ‘बसप’च्या वतीने राजश्री जामगे यांचा अर्ज दाखल
परभणी, ३० मार्च/प्रतिनिधी

बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार श्रीमती राजश्री बाबासाहेब जामगे यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील अपना कॉर्नरपासून बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी रॅली स्टेशन रोडने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आली. उमेदवार श्रीमती राजश्री जामगे यांच्यासह बसपचे नेते श्री. भीमराव हत्तिअंबिरे, प्रदेश सदस्य गोपीनाथ कांबळे, जिल्हाध्यक्ष देवराव खंदारे, डॉ. प्रभाकर चव्हाण, अ‍ॅड. एम. ए. बेग, कृष्णा मोहरीर, चंद्रगुरु ब्रम्हपुरीकर, दिगंबर दुधारे आदींसह बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते या रॅलीत मोठय़ा संख्येने हजर होते.अपना कॉर्नर येथून निघालेल्या या रॅलीत बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांंनी मायावती यांचे छायाचित्र असलेले झेंडे उंचावत आपला जल्लोष व्यक्त केला. श्रीमती जामगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर ही रॅली शनिवार बाजार येथे आली. शनिवार बाजारातील मैदानावर ‘बसप’च्या वतीने एक जाहीर सभाही घेण्यात आली. या सभेत विविध वक्तयांचे व उमेदवार श्रीमती जामगे यांचे भाषण झाले. श्री. हत्तिअंबिरे यांनी या वेळी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे उमेदवार श्री. सुरेश वरपूडकर, शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. गणेश दुधगावकर यांच्यावर कठोर टीका करून परभणीत बहुजन समाज पक्ष हा ‘सोशल इंजिनिअरिंग’च्या फॉम्र्युलावर विजयी होईल, अशी आशा व्यक्त केली.

रमेश पोकळेंचा भाजप प्रवेशाचा निर्णय
बीड, ३० मार्च/वार्ताहर

राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व तालुका बाजार समितीचे उपसभापती रमेश पोकळे यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून उद्या (मंगळवारी) आमदार मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेत त्यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे. बीड जिल्ह्य़ात लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय पक्षांच्या पक्षांतराची प्रक्रिया सुरू झाली असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे हे भाजपात प्रवेश करीत आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक आणि त्यांच्या ताब्यातील तालुका बाजार समितीचे उपसभापती असलेले पोकळे यांचे मराठवाडा विभागात पदवीधरांचे मोठे संघटन आहे. पदवीधर मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घरपोच पदवी हा उपक्रम राबविला होता. मात्र त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. तेव्हापासूनच ते पक्षांतर करतील, अशी चर्चा होती. अखेरीस लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ते आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करीत आहेत. बीड तालुक्यात युवक कार्यकर्ता पक्षाला मिळाला आहे.

जालना मतदारसंघात एक अर्ज दाखल
जालना, ३० मार्च/वार्ताहर

जालना लोकसभा मतदारसंघातून सोमवारी बाबासाहेब भोजने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे असून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. आतापर्यंत जालना जिल्हाधिकारी कार्यालयातून ३३ अर्जाचे वितरण झाले असून त्यापैकी एक अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान आज बाबासाहेब भोजने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
----------------------------------------------------------------------------

आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद, ३० मार्च/प्रतिनिधी

बलात्काराच्या गुन्ह्य़ात अटक असलेल्या एका आरोपीने आज दुपारी क्रांतिचौक पोलीस ठाण्याच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला रोखले. रमेश साक्रुबा साळवे (वय ३२, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) असे या आरोपीचे नाव आहे.अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक महिने बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर गुरुवारी त्याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याला क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याला अंथरण्यासाठी देण्यात आलेलेल्या चादरीचे दोरे त्याने काढले आणि त्याने गळ्याला फास लावण्याचा प्रयत्न केला. तो गळ्याला जोराने आवळत असल्याचे तेथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्याने लगेच त्याला ताब्यात घेतले. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली होती. रमेश साळवे याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

जळकोट पोलीस ठाण्याच्या स्थलांतराला मुहूर्त सापडेना
जळकोट, ३० मार्च/वार्ताहर

पोलीस ठाण्यासाठी नवीन सुसज्ज इमारत जळकोट येथे बांधून तयार झाली आहे. तथापि, पोलीस ठाणे या नव्या वास्तूत स्थलांतरित करण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याने पोलीस ठाण्याची ही इमारत सध्या निरुपयोगी ठरली आहे. जळकोट तालुका झाल्यानंतर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे २००१ मध्ये कार्यान्वित झाले. तेव्हापासून आजतागायत प्रस्तुत पोलीस ठाणे ग्रामपंचायतीच्या इमारतीत आहे. स्वतंत्र इमारतीची निकड लक्षात घेऊन २५ लाख रुपये निधी खर्च करून सुसज्ज वास्तू उभी करण्यात आली आहे. पोलीस ठाणे स्थलांतरासाठी ही नवीन इमारत चार महिन्यांपूर्वीच सज्ज झाली आहे, पण प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे हे स्थलांतर अद्यापि झाले नाही. स्वतंत्र इमारत होऊनही जळकोट येथील पोलीस ठाणे आजही ग्रामपंचायतीच्या भाडय़ाच्या इमारतीतच चालविण्यात येत आहे. पोलीस ठाण्यासाठी एकीकडे भाडय़ाचा भुर्दंड बसत असताना नवी इमारत निरुपयोगी झाली आहे. पोलीस ठाण्याची नवीन प्रशासकीय इमारत उदगीर रस्त्यावर गावाबाहेर असून नजीक असलेल्या वस्तीतील लोकांकडून तेथील जागेचा कपडे धुण्यासाठी वापर होताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी इमारतीचा गैरवापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

घनसावंगीत न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन
अंबड, ३० मार्च/वार्ताहर

घनसावंगी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश रवींद्र मनोहर बोर्डे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वि. ग. खरे, अंबडचे न्यायाधीश स. व. चिंधडे, जालना वकील संघाचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, अंबड तालुका वकील संघाचे अध्यक्ष जे. आर. वाघ, सचिव प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते.आपसातील भांडणे न्यायालयापर्यंत येऊ न देता ती आपसात मिटवून न्यायालयाचा वेळ वाचवावा. त्यामुळे प्रलंबित कामांचा बोजा वाढणार नाही. जनतेचा न्याय प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होण्यासाठी न्याय विनाविलंब मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे यांनी उद्घाटनप्रसंगी केले. सूत्रसंचालन न्यायाधीश एन. जी. गोमेकर तर आभार श्री. चिंधडे यांनी मानले. यावेळी जालना व अंबड बार संघटनेचे सदस्य, घनसावंगी तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. आचारसंहितेमुळे राज्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कार्यक्रमास हजेरी लावली.

दहा वर्षांपासून फरारी असलेल्या चोराला भोकर पोलिसांनी पकडले
भोकर, ३० मार्च/वार्ताहर

तब्बल १० वर्षांपासून म्हैस चोरी प्रकरणात खोटे नाव सांगून फरार असलेल्या आरोपीस मोठय़ा शिताफीने पोलिसांनी जेरबंद केले.याबाबत अधिक माहिती अशी की, भोकर तालुक्यातील हस्सापूर येथील अशोक विश्वनाथ किनेवाड यांची म्हैस चोरी प्रकरणात २० जुलै १९९९ ला भोकर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या चोरी प्रकरणात अडकलेल्या लक्ष्मण काशीनाथ गरड (वय ५९, रा. नरापूर, ता. पूर्णा, जि. परभणी) या आरोपीने अर्धापूर पोलिसांना व न्यायालयात वामन कोंडिबा भोसले (रा. नांदगाव, ता. औंढा) असे खोटे नाव सांगून तब्बल १० वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी दिली. पत्नीचे नावही लक्ष्मीबाई असे खोटे सांगण्यात आले. म्हैस चोरी प्रकरणात पती, पत्नी असे दोन आरोपी असून, आरोपीची पत्नी शेवंताबाई लक्ष्मण गरड ही मरण पावली. २९ मार्चला पोलीस निरीक्षक शिवशंकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नेमणूक करून परभणी जिल्ह्य़ातील नरापूर येथून आरोपी लक्ष्मण गरड यास जेरबंद करण्यात भोकर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी हेड पोलीस कॉन्स्टेबल गोपीनाथ गिते, विवेक हराळे, दत्ता जाधव यांनी परिश्रम घेतले. आरोपीस भोकर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

तोष्णीवाल यांचा रॉकेल परवाना निलंबित
जिंतूर, ३० मार्च/वार्ताहर

सरकारने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा २०० रुपये जास्त एका बॅरलसाठी मागणाऱ्या ठोक विक्रेता जी. आर. तोष्णीवाल यांचा रॉकेलचा परवाना परभणी जिल्हा पुरवठा अधिकारी देवेंद्र अंधारे यांनी आज निलंबित केला आहे. येथील रॉकेलचे ठोक विक्रेते तोष्णीवाल हे किरकोळ विक्रेत्यांकडून प्रत्येक बॅरेलमागे २०० रु. जास्तीचे मागत होते. याप्रकरणी किरकोळ परवानाधारकांनी तहसीलदारांकडे ९ मार्चला तक्रार केली होती. त्यांनी तोष्णीवाल यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु ‘तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे सांगितले. ‘लोकसत्ता- मराठवाडा वृत्तान्त’मध्ये याचा वारंवार पाठपुरावा घेण्यात आला होता. याबाबतचे वृत्त झळकताच जिंतूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अंभुरे यांनी प्रकरणाचा सविस्तर अहवाल परभणी जिल्हापुरवठा अधिकारी देवेंद्र अंधारे यांच्यासमोर ठेवला. श्री. अंधारे यांनी तोष्णीवाल यांचा परवाना निलंबित केल्याचा आदेश आज दुपारनंतर दिला.