Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

झोडियाक २००९
राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचा वार्षिक महोत्सव ‘झोडियाक २००९’ हा २३ ते २६ मार्च या कालावधीत पार पडला. यंदाचे त्यांचे पाचवे वर्षच आहे, पण तरीही इंजिनीअरिंग कॉलेजेसमधील हे सर्वात मोठे फेस्टिवल आहे. यावर्षी त्यांची थीम होती ‘गो ग्रीन’! या थीमला अनुसरून त्यांनी ‘स्वच्छता अभियान मोहीमदेखील राबवली होती. या फेस्टिवलमागे १५ ते २० जणांची कमिटी व १०० व्हॉलिंटियर्सची मेहनत होती. ते डिसेंबरपासूनच या तयारीला लागले होते.

दिल से..
प्रिय सावनी,

That's great. चला आता तू officially भटकायला मोकळी झालीस. best of luck for result, खरंतर आपल्याकडे पुस्तकी ज्ञानाला अवास्तव महत्त्व देऊन ठेवलंय. म्हणजे तुम्हाला जितके जास्त मार्क मिळतील, तेवढा तुमचा बुद्धय़ांक सॉलिड. याला काय अर्थ आहे का?
मुन्नाभाई M.B.B.S. बघून गांधीजी, लिजेंड ऑफ भगतसिंग पाहून भगतसिंग कळतात, पण दहा वर्षे त्यांच्यावरचे पुस्तकातील धडे वाचून कधीच लक्षात येत नाहीत ही शरमेची बाब आहे. याचा अभ्यासक्रम आखणाऱ्यांनी व पालकांनीही गांभीर्याने विचार करायला हवा.

‘यंग इंडियन्स’ची नवी वाट..
के. जे. सोमय्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च, जुहू सीनियर सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशन आणि सी. आय. आय.ची शाखा असलेले ‘यंग इंडियन्स’ यांनी नुकतीच १८ मार्च रोजी जुहू बीज येथे संयुक्तपणे एक स्वच्छता मोहीम राबवली. जवळ जवळ शंभर तरुण यासाठी एकत्र आले होते.‘जुहू सिटीझन्स वेल्फेअर ग्रुप’च्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी पथनाटय़े सादर केली, बॅनर्स-पोस्टर्सच्या माध्यमातून पर्यावरण जागृती करणारे संदेश लोकांपर्यंत पोहोचवले, तसेच जुहू बीचवर ‘कचरा हटाव’ मोहीमही राबवली.

जागो रे! वन बिलियन व्होटस्
बंगलोर येथील जनाग्रह या एनजीओने टाटा-टीच्या मदतीने नव्या तरुण मतदाराचं नाव मतदारयादीत नोंदविण्यासाठी ‘जागो रे! वन बिलियन व्होटस्’ या कॅम्पेनअंतर्गत www.jaagore.com या वेबसाइटची निर्मिती केली आहे. भारतातील प्रमुख ३५ शहरांतील तरुणांना आपलं नाव मतदारयादीत नोंदविता यावं यासाठी तयार केलेल्या या वेबसाइटच्या मदतीने गेल्या सहा महिन्यांत साडेपाच लाखांहून अधिक तरुणांनी आपलं नाव नोंदवलं आहे. शहरातील तरुणांना मतदारयादीत नाव नोंदविण्यापासून रोखणारी गोष्ट म्हणजे सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचा उदासीनपणा.

‘मेट’ मेला
मुंबई एज्युकेशन ट्रस्टचा मेट मेळा नुकताच एमइटी कॉलेजमध्ये पार पडला. यासाठी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. आजच्या तरुणांना संस्कृतीचं दर्शन व्हावं आणि खेडय़ापाडय़ातील गरीब जनतेच्या मदतीसाठी या मेळ्याचं आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे संचालक सुनील कर्वे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या मेळ्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स लावले होते. यात खाद्यपदार्थाचे स्टॉल्स होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकौशल्यातून बनवलेल्या हँडीक्राफ्ट वस्तू, नेल आर्ट, वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू याचे प्रदर्शन व विक्री ते स्वत:च करत होते. विविध नृत्यविष्काराचाही या मेळ्यात सामावेश होता. यातून मिळालेला पैसा वार्ली गावाच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. तरुणांच्या मदतीने गावाचे पुर्नवसन करण्यात येणार आहे.
गायत्री पगारे

अमेरिकेत ‘रॉक द वोट कॅम्पेन’द्वारे ४५ लाख तरुणांना मतदार म्हणून नोंदविण्याच्या विक्रमानंतर अनेक देशांतील सामाजिक संस्थांनी त्यामध्ये पुढाकार घ्यायला सुरुवात केली. टेक्सास, कॅलिफोर्निया, व्हर्जिनिया, फ्लोरेडा, मिशिगन, ओहिओ या शहरांतही असाच उपक्रम ‘अर्थ डे नेटवर्क’ यांनी २००७-०८ साली मोठय़ा प्रमाणात राबविला होता. लोकशाहीला सुधारण्याचं सर्वात महत्त्वाचं तंत्र म्हणजे जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणं आणि याची सुरुवात ही मतदानानंच होऊ शकते. यामुळेच निवडणुकीच्या आधी प्रत्येक राजकीय पक्ष व प्रसारमाध्यमांनी मतदान करा हे सांगणं आता नेहमीचंच झालं आहे. पण आपल्याकडे शंभरातल्या ७० टक्के लोकांना मतदार म्हणून नोंदणी करताना खूप वाईट अनुभव आलेला असतो. हे काम एकाच फेरीत पूर्ण झालं आहे, अशी माणसं शोधूनही सापडण्याची शक्यता कमीच. निवडणूक आयोग यासाठी वेळोवेळी कॅम्पेन राबवतातच, पण तो एकमेव उपक्रम पुरेसा नसल्याचं गेल्या काही वर्षांत लक्षात आलं आहे. यासाठीच अनेक सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन युद्धपातळीवर काम केल्याचं दिसत आहे. संगीत, संस्कृती आणि टेक्नॉलॉजीचा एकत्रित वापर करून अधिकाधिक तरुणांना एकत्रित करून मोठी चळवळ उभी करण्याचा विडाच त्यांनी कॅम्पेनद्वारे उचलल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर बऱ्याच राजकीय पक्षांनीही यावर्षी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला आहे. हा त्यांचा पब्लिसिटी स्टंट असला तरी याचा फायदा अनेक नागरिकांना झाला आहे. अशाच काही कॅम्पेनचा आढावा कॅम्पसमूडच्या टीमने वोट फॉर चेंज, यूथ फॉर चेंज या सदरात यावेळी घेतला आहे. खास कॅम्पसमूडच्या वाचकांसाठी.

रोटरॅक्ट आयवोट कॅम्पेन
‘रोटरॅक्ट’ ही मुंबईतील एक युवा संस्था आहे. ही संस्था सध्या निवडणुकांसाठी कॅम्पेनिंग करीत आहे. ‘रोटरॅक्ट’ जगातील सर्वात मोठी युवा संस्था आहे. यांनी ही आयवोट कॅम्पेन डिसेंबरपासून सुरू केली आणि आजवर त्यांनी ६०,००० युवकांना यात सामील करून घेतले आहे. त्यांना माहिती दिली व त्यांचे मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी मदत केली. ‘रोटरॅक्ट’च्या या कामात किमान ९००-१२०० रोटरॅक्टर सामील आहेत. त्यांनी ही मोहीम मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील १५-२० कॉलेजमध्येच जाऊन राबविली. फक्त कॉलेजमध्येच नव्हे तर पार्कस्, कॉर्पोरेट ऑफिसेस इत्यादी ठिकाणी त्यांनी ही मोहीम राबविली. सिनेमॅक्ससारख्या मल्टिप्लेक्सीसमध्ये त्यांनी हे कॅम्पेन चालविले आणि त्यात ते बहुतांशी यशस्वी झाले. मुंबईबाहेरील मुलांनादेखील त्यांनी मतदार ओळखपत्र बनविण्यासाठी मदत केली. अशी त्यांची ही मोहीम युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यास सफल झाली आहे.
वृत्तांकन : प्रशांत ननावरे, पूनम बुर्डे, ओंकार पिंपळे, मनाली धुमाळ

चेंज इंडिया कॅम्पेन
पुण्याच्या नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीज या संस्थेने सीआयआय यंग इंडिया, मार्गदर्शक या ग्रुप्सच्या मदतीने तरुणांना मतदार म्हणून नोंदविण्यासाठी व त्यांच्यामध्ये राजकीय, सामाजिक भान निर्माण करण्यासाठी गेले काही महिने पब्लिक मीटिंग व लेक्चर्सचा सपाटा लावला आहे. गेली अनेक वर्षे एनएससीसी पुण्यात मोहल्ला कमिटीमध्ये खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. पण या वेळी या नेटवर्कचा चांगल्या कामासाठी उपयोग करण्याचं संस्थेने ठरवलं. कार्यकर्त्यांच्या मदतीने कॉलेज व कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये जाऊन मतदान प्रक्रियेची तरुणांना माहिती देण्याचं काम जोरात चालू आहे. मतदार नोंदणीबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्याचप्रमाणे जे अधिकारी नोंदणी अधिकारी म्हणून काम करतात त्यांनाही या प्रक्रियेची, नियमांची पूर्ण माहिती नसते. म्हणूनच थेट निवडणूक आयोगाला याबाबत ठोस पावले उचलण्याबाबत आपण पत्र लिहिणार असल्याचं चेअरमन सतीश खोत म्हणाले. किती हजार किंवा लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो हा आकडा देण्यापेक्षा शक्य तितक्या व जमेल तेथे लोकांना ही प्रक्रिया समजून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ते पुढे म्हणाले.

टार्गेट कॉलेजेस्
गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता एकच आवाज घुमू लागलाय तो म्हणजे निवडणुकीचा. या धामधुमीत तरुण मंडळी काही मागे नाही. अशीच गेले सलग दोन-तीन वर्षांपासून तरुणांमध्ये निवडणुकीबाबत जागरुकता निर्माण करण्याचे कार्य I Vote सारख्या संस्था करीत आहेत. आपल्या एका मताने काय फरक पडणार? असं म्हणून दुर्लक्ष करणाऱ्यांचा दृष्टिकोन २६/११ च्या हल्ल्यानंतर बदलू लागलाय. आता आपलं एक मत मोलाचं ठरू शकतं याची जाणीव करून देणं हा I Vote चा मुख्य हेतू आहे. यासाठी ते मुंबईतील सेंट झेविअर्स, जयहिंद, विल्सन आणि के. सी. आदी महाविद्यालयामध्ये जाऊन निवडणूकविषयक माहिती देण्याचं काम करीत आहेत. यासाठी ते प्रत्येक महाविद्यालयातून ७ किंवा ८ विद्यार्थ्यांची निवड करून वेगवेगळ्या महाविद्यालयात प्रचार करीत आहेत. विद्यार्थ्यांना अर्जपत्राविषयी संपूर्ण माहिती देण्याचे काम ते करीत आहेत. आताच त्यांची अर्जपत्र भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ५०० अर्जपत्र भरून ते निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले आहेत.

‘व्होट कँपेन्स’
प्रामुख्याने तरुण मतदारांना जागृत करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या काही प्रमुख व्होट कँपेन्समुळे निवडणुकांचं वातावरण अधिक भारावून जात आहे. देशात बदल घडवण्यासाठी तरुणांनी कार्यरत होणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे मतदान. कोणत्या आहेत या कँपेन्स? त्या कशा पद्धतीने काम करत आहेत? तरुणांनी कसा प्रतिसाद दिलाय? याबद्दल ‘कॅपस मूड रिपोर्टर्स’नी घेतलेला आढावा. अग्नी- (अ‍ॅक्शन फॉर गुड गव्हर्नन्स अँड नेटवर्किंग इन इंडिया) आजच्या प्रमुख व्होट कँपेनपैकी ‘अग्नी’ ही एक व्होट कँपेन आहे. ‘अग्नी’ ही अराजकीय चळवळ असून प्रशासकीय आणि राजकीय पातळ्यांचा परस्परांमध्ये सुसंवाद साधण्याचा तिचा प्रयत्न आहे. मतदारांना नावनोंदणीसाठी प्रेरित करणं हा या चळवळीचा एक महत्त्वाचा भागआहे. ‘अग्नी व्होट कँपेन’बद्दल अधिक माहिती देताना श्री. शरद कुमार म्हणाले की, ‘अग्नी गेल्या १० वर्षांपासून सक्रिय असून गेल्या वर्षांच्या ऑगस्टपासून मतदार नोंदणीचे काम सुरू केले आहे. यासाठी महाविद्यालये, कॉर्पोरेट हाऊसेसमधील १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्वाना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी उद्युक्त केले. मुंबई शहरातील महाविद्यालयांतून या कँपेनला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि चौदा हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. ‘अग्नी’च्या माध्यमातून आतापर्यंत २४ हजार नवीन मतदारांची नावनोंदणी झाली आहे. मतदारयादीत नावनोंदणीव्यतिरिक्त ‘अग्नी’ने ‘सिटिझन्स चार्टर’ या उपक्रमाअंतर्गत मुंबई शहरातील सहा मतदार संघांतील उमेदवारांची संपूर्ण माहिती जनतेला उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे जनतेला या सहा उमेदारांना भेटण्याची संधीसुद्धा ‘अग्नी’मुळे मिळणार आहे. या भेटीदरम्यान मुंबईचे प्रश्न आणि शहराच्या गरजा लोकसभेत सातत्याने मांडण्यासाठी या खासदारांचा ‘मुंबई क्लब’ तयार होणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रत्येक निवडणूक केंद्राबाहेर ‘अग्नी हेल्पलाईन’ केंद्र असेल. मतदाराला मतदानावेळी कोणतीही अडचण आल्यास ‘अग्नी’तर्फे त्यांना मदत मिळणार आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ‘अग्नी’चे स्वयंसेक विभागांमध्ये फिरून पात्र मतदारांनी मतदान केलंय की नाही तेही तपासणार आहेत. उत्साही, प्रामाणिक आणि कार्यक्षम तरुणांकडून या चळवळीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अधिक माहितीसाठी www.agnimumbai.org या वेबसाइटला भेट द्यावी.