Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

लाहोरच्या पोलीस अ‍ॅकॅडमीवर दहशतवादी हल्ला, १३ ठार
पाकिस्तानी कमांडोजच्या कारवाईत आठ अतिरेकी ठार, तर सहा जणांना जिवंत पकडले
लाहोर, ३० मार्च/पी.टी.आय.

 

गेल्या २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा जणू पुढील भाग वाटावा, असा हल्ला आज सकाळी लाहोरजवळच्या मनावन येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर केला. सुमारे १० अतिरेक्यांनी ग्रेनेड्स फेकत या केंद्रात प्रवेश केला आणि अल्पावधीतच आतील शेकडो प्रशिक्षणार्थ्यांना ओलीस धरले. आठ तासांच्या चकमकीनंतर पाकिस्तानी कमांडोंनी चार अतिरेक्यांना ठार केले तर सहाजणांना जिवंत पकडण्यात यश मिळविले. हल्ल्यात १३ पोलीस ठार तर किमान ९० जण जखमी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही अतिरेकी संघटनेने स्वीकारली नसली तरी ‘लष्कर ए तैय्यबा’ अथवा ‘जैश ए मोहम्मद’ यांनी हा हल्ला केला असावा, असा पाकिस्तानी सरकारचा संशय आहे.
मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानातील अतिरेक्यांचा हात असल्याचे नि:संदिग्ध पुरावे भारताने देऊनही ते मानण्यास पाकिस्तानने खळखळ केली होती. परंतु अतिरेक्यांनी एका महिन्यात लाहोरमध्येच दोनवेळा हल्ले चढवून पाकिस्तानी सरकारला ‘भस्मासूरा’ची आठवण करून दिली. याच महिन्यात, ३ मार्च रोजी अतिरेक्यांनी श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर दिवसाढवळ्या हल्ला चढवून सहा खेळाडूंना जखमी केले होते.
भारत - पाकिस्तान सीमेपासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर असलेल्या मनावन येथे पाकिस्तानी पोलिसांचे प्रशिक्षण केंद्र आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास अतिरेक्यांनी हँडग्रेनेड्स फोडत केंद्रात प्रवेश केला. या वेळी त्यांनी केंद्राच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या शिपायांना ठार केले आणि अंदाधुंद गोळीबार करीत प्रशिक्षण केंद्राच्या तीनमजली इमारतीचा ताबा घेतला.
अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईसाठी पाकिस्तानी लष्कराचे उच्च प्रशिक्षित कमांडो तातडीने तैनात करण्यात आले. त्यांनी अश्रुधूर फोडत आतमध्ये प्रवेश केला. या कारवाईत चार अतिरेकी ठार झाले तर सहाजणांना जिवंत पकडण्यात यश आले आहे. यातील एक अतिरेकी अवघा १९-२० वर्षांचा असून तो पश्तू भाषा बोलतो, अशी माहिती पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी दिली. या हल्ल्याच्या मागे ‘लष्कर ए तैय्यबा’ आणि ‘जैश ए मोहम्मद’ या संघटनांचा हात असावा, असा संशयही त्यांनी बोलून दाखविला.
अतिरेक्यांविरुद्धची कारवाई यशस्वी झाल्यानंतर लष्कराच्या सैनिकांनी हवेत गोळीबार करून तसेच ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला.

पकडलेला दहशतवादी अफगाण नागरिक
लाहोर येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैकी एक दहशतवादी हा अफगाण नागरिक असल्याचे अंतर्गत मंत्रालयाचे प्रमुख रेहमान मलिक यांनी सांगितले. दहशतवाद्यांविरुद्ध कमांडो कारवाई सुरू असताना हा अफगाण दहशतवादी हेलिकॉप्टरवर फेकण्यासाठी हातबॉम्ब घेऊन जात असतानाच त्याला पकडण्यात आले. हा दहशतवादी अफगाणिस्तानच्या पूर्व पाकतिका प्रांतातील असल्याची माहितीही मलिक यांनी पत्रकारांना दिली.