Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादीचा एक पाय युपीएच्या तर एक डाव्या आघाडीच्या दगडावर !
संतोष प्रधान
मुंबई, ३० मार्च

 

राजकारणाच्या कुरुक्षेत्रात शत्रुला नमवण्यासाठी विविध युक्त्याप्रयुक्त्या आणि व्यूहरचना कराव्या लागतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण मात्र भल्याभल्यांना चकित करणारे आहे. त्याचे उदाहरण म्हणजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर हातात हात घालून शिवसेना भाजप युतीविरोधात लढणार आहे. मात्र महाराष्ट्र वगळता देशभरात राष्ट्रवादीने घरोबा केलेले मित्रपक्ष पूर्णत: वेगळे असून त्यांची युती काँग्रेसविरोधात उभी ठाकणार आहे.
महाराष्ट्रात एक तर देशात एक अशा दोन दगडांवर पाय ठेवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ओरिसामध्ये डाव्या पक्षांबरोबर असलेल्या बिजू जनता दलाशी हातमिळवणी केली असून ही आघाडी काँग्रेसविरोधात लढणार आहे. तर अन्य काही राज्यांतही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या विरोधात उभी ठाकणार आहे. देशभरात काँग्रेसप्रणित यूपीए, भाजपप्रणित एनडीए व डावी आघाडी अशा तीन प्रमुख आघाडय़ांमध्ये लढत होणार असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस हा असा एकमेव पक्ष असा आहे की तो एका राज्यात यूपीएचा घटक पक्ष तर दुसऱ्या राज्यात तिसऱ्या आघाडीचा घटक पक्ष आहे.
खरे तर लोकसभा निवडणूक यूपीएच्या घटक पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर आघाडी करून लढावी, असा प्रस्ताव गेल्याच वर्षी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच दिला होता. मात्र काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवर आघाडय़ा करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावताना राज्यांमध्ये स्थानिक पातळ्यांवर आघाडय़ा होतील, अशी भूमिका घेतली. यातूनच यूपीएचे राष्ट्रवादी काँग्रेससारखे घटक पक्ष विभागले गेले.
दोनच दिवसांपूर्वी ओरिसात राष्ट्रवादीने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाशी आघाडी केली. बिजू जनता दल हा ओरिसात काँग्रेसचा नंबर एकचा प्रतिस्पर्धी पक्ष आहे. या नव्या आघाडीत राष्ट्रवादीला लोकसभेची एक तर विधानसभेच्या आठ जागा वाटय़ाला आल्या आहेत. ओरिसाप्रमाणेच आंध्र प्रदेशसह काही राज्यांमध्ये राष्ट्रवादीची काँग्रेस विरोधी पक्षांबरोबर आघाडी होऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादीचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी दिले आहेत. बिजू जनता दल हा डाव्या आघाडीत सहभागी नसला तरी डाव्या आघाडीची या पक्षाबरोबर आघाडी असून, राष्ट्रवादीबरोबरच डाव्यांनाही काही जागा सोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात प्रचार करताना शरद पवार व पक्षाचे अन्य नेते यूपीएला मतदान करा, असे आवाहन करतात. याउलट अन्य राज्यांमध्ये काँग्रेसच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे. ही वेळ येण्यास राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसला दोष देतात. राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याचे काँग्रेसने मान्य केले असते ही वेळ आली नसती, असेही राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात येते. काँग्रेसचे नेते मात्र याबाबत राष्ट्रवादीची ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप करीत आहेत. मुळात महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीची ताकद आहे कुठे, असा सवाल काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.