Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सारंगी महाजन यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे पूनम यांना उमेदवारी नाकारली?
मुंबई, ३० मार्च/प्रतिनिधी

 

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम यांना उमेदवारी दिली असती तर विरोधी पक्षांनी प्रमोद यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेले त्यांचे बंधू प्रविण यांच्या पत्नी सारंगी महाजन यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, असा गौप्यस्फोट भाजपच्या एका नेत्याने ‘लोकसत्ता’कडे केला. पूनम विरुद्ध सारंगी असा सामना आरोप-प्रत्यारोपांनी रंगला असता व त्याचा भाजपला देशभरात फटका बसला असता अशी भीती या नेत्याने व्यक्त केली व पूनम यांना उमेदवारी नाकारण्याची जी अनेक कारण आहेत त्यामधील हेही महत्वाचे कारण असल्याचा दावा केला.
प्रमोद महाजन यांची त्यांचे बंधू प्रविण यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यामुळे महाजन यांच्या कुटुंबात फूट पडली. महाजन यांच्या हत्येनंतर दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रविण यांच्या पत्नी सारंगी यांची भेट घेऊन त्यांना या प्रसंगातून सावरण्याकरिता दिलासा दिला होता. प्रविण हे प्रमोद यांनी दिलेल्या आर्थिक सहाय्यावर अवलंबून होते, असे सांगितले जाते. असे असतानाही प्रविण यांच्या बचावाकरिता न्यायालयात उभे राहिलेले नामांकित वकील व त्यांच्याकडून स्वीकारल्या जाणाऱ्या फीचे आकडे याचा विचार करता प्रविण यांना नक्कीच कुणीतरी सहकार्य करीत आहे, असे भाजपमधील काहींचे म्हणणे आहे.
पूनम महाजन यांच्याकरिता सर्वप्रथम दक्षिण मुंबईची मागणी करण्यात आली. हा मतदारसंघ शिवसेनेने सोडला नाही. परंतु त्याच वेळी पूनम यांच्या विरोधात सांरगी यांना उतरवता येईल का, याची चाचपणी सुरू झाली होती. मोहन रावले यांची कोंडी करण्याकरिता तुरुंगात असलेल्या अरुण गवळी यांना रिंगणात उतरवले गेले. त्याच धर्तीवर सारंगी यांनाही रिंगणात उतरवण्याचा विचार सुरू होता, असे भाजपचा नेता म्हणाला. कालांतराने ईशान्य मुंबईवर पूनम यांनी दावा केल्यावर तेथून सारंगी यांना उतरविण्याची खेळी खेळली जाणार होती. याची कुणकुण भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना लागली. या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लढत आहेत. पूनम विरोधात सारंगी यांना उतरवले असते व आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असते तर मुंडे यांनाच मुंबईत तळ ठोकावा लागला असता. महाजन हे पक्षाचे राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या हत्येनंतर लागलीच त्यांचे खासगी सचिव विवेक मोईत्रा यांचाही संशयास्पद मृत्यू झाला, राहुल महाजन यांचे अमली पदार्थाचे सेवन करण्याचे प्रकरण गाजले, राहुलचे वादग्रस्त वैवाहिक जीवन व घटस्फोट या सर्व गोष्टींचा उहापोह झाला असता तर देशभरात भाजपला त्याचा त्रास झाला असता, अशी भीती दिल्लीतील नेत्यांना वाटल्याने पूनम यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे पक्षातील काहींचे म्हणणे आहे.