Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अभियांत्रिकी आणि आयटीची यंदाची ‘प्लेसमेंट’ लांबणीवर!
आशिष पेंडसे
पुणे, ३० मार्च

 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंदीसदृश स्थितीमध्ये अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांमधील यंदाची ‘प्लेसमेंट’ पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. ‘शैक्षणिक पाया विकसित करण्याची संधी,’ अशा शब्दांत ‘प्लेसमेंट’ टाळण्याचे समर्थन केले जात असले, तरी ‘आहे त्याच नोकऱ्या टिकविण्याचे आव्हान असताना नवीन भरती करणार तरी कशी,’ असा सवाल उद्योगविश्वातून उपस्थित करण्यात येत आहे.
अभियांत्रिकी-आयटी महाविद्यालये, शिक्षणसंस्थांमध्ये अंतिम वर्षांच्या अगोदरच्या वर्षांमधील मुला-मुलींच्या मुलाखती घेऊन ‘प्लेसमेंट’ देण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. साधारणत: एप्रिल-मे महिन्यामध्ये त्यासाठीच्या निवडीला प्रारंभ होऊन ‘कॅम्पस’मध्ये ‘प्लेसमेंट’ची लगबग सुरू होते. गलेलठ्ठ ‘पॅकेज’ जाहीर करीत आपल्याच विद्यार्थ्यांना कशी संधी मिळाली, याचे दाखले देण्याची स्पर्धा मग शिक्षणसंस्थांमध्ये अहमहमिका सुरू होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंदीसदृश स्थितीमध्ये मात्र अभियांत्रिकी-आयटीच्या संधीमध्ये आणि पर्यायाने ‘पॅकेज’मध्ये २५ ते ३० टक्क्य़ांची घट होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र आता ‘प्लेसमेंट’ टाळण्याचाच निर्णय घेतला जात आहे. शिक्षणसंस्थांच्या ‘प्लेसमेंट’चे काम पाहणारे शिक्षक, आघाडीच्या उद्योगांमधील मनुष्यबळ अधिकारी आदींची आज पुण्यात बैठक झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संधींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ‘प्लेसमेंट’ लांबणीवर टाकण्यासाठी ‘नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस कंपनीज’ (नॅसकॉम) या आयटी क्षेत्रातील उद्योगांच्या शिखर संस्थेने जारी केलेले निवेदन पुढे करण्यात येत आहे. एप्रिल-मे महिन्यात होणारी ‘प्लेसमेंट’ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घ्यावी, अशी विनंती ‘नॅसकॉम’ने केली होती. ‘नॅसकॉम’चे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना या निवेदनाबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, ‘अंतिम वर्षांपूर्वीच नोकरी निश्चित झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणावरील लक्ष उडते, असा अनुभव आहे. त्यामुळेच यंदाच्या वर्षी आठव्या सत्रामध्येच ‘प्लेसमेंट’ करण्याचे सूचित केले गेले आहे. अर्थात, मंदीसदृश काळामध्ये नोकरी-अर्थार्जनाच्या संधी मर्यादित झाल्याने उमेदवारांनी शैक्षणिक व कौशल्याचा पाया विस्तारावा,’ अशी अपेक्षाही डॉ. नटराजन यांनी व्यक्त केली.
‘प्लेसमेंट लांबणीवर पडणे ही इष्टापत्तीच ठरते आहे. गुणवान मोजके विद्यार्थी सोडले, तर उर्वरित विद्यार्थ्यांचे शिक्षणामधील लक्ष ‘पॅकेज’मुळे उडते. पूर्वीप्रमाणे अंतिम वर्षांमध्येच ‘प्लेसमेंट’ दिल्याने आता अभ्यासक्रम संपेपर्यंत ते शिक्षणाकडे गांभीर्याने पाहतील,’ अशी अपेक्षा पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.