Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

ठाण्यात युतीच्या मेळाव्यात राडा
*राजाराम साळवी यांची भाजपवर आगपाखड * खुच्र्यांची फेकाफेक * उमेदवारही हवालदिल
ठाणे, ३० मार्च/प्रतिनिधी

 

शिवसेनेला पाठिंबा देणारे आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांनी केलेल्या भाजपउद्धाराने आज युतीच्या मेळाव्यात चांगलाच राडा झाला. युतीच्या चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी झालेल्या या निर्धार मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे एकच गोंधळ उडाला आणि साळवी यांना सभागृहातून काढता पाय घ्यावा लागला. पहिल्याच बैठकीत झालेल्या या राडय़ाने युतीचे उमेदवारही हवालदिल झाले.
लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीतर्फे विजय चौगुले (ठाणे), आनंद परांजपे (कल्याण), अ‍ॅड. चिंतामण वनगा (पालघर) असे तीन उमेदवार जाहीर झाले असून, भिवंडीतील उमेदवाराचा भाजप अजून शोध घेत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी शिवसेना-भाजप युतीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज येथील टिपटॉप प्लाझामध्ये आयोजित करण्यात आला होता. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भाई गिरकर, शिवसेना नेते सुभाष देसाई, आमदार एकनाथ शिंदे,आमदार संजय केळकर युतीचे तीनही उमेदवार तसेच जिल्ह्यातील अन्य आमदार, पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित होते. विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका, निवडणुकीची रणनीती आखण्याबरोबरच युतीच्या चारही उमेदवारांना कसे निवडून आणायचे, याबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन असे या मेळाव्याचे स्वरूप होते. सुमारे ३०० ते ३५० कार्यकर्त्यांंच्या उपस्थितीत चाललेल्या या मेळाव्यात युतीचे विचारमंथन सुरू असतानाच राजाराम साळवी मार्गदर्शन करयला उभे राहिले. साळवी यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत भाजपचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली आणि मेळाव्याचा नूरच पालटला.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे मुरबाडमधून निवडणूक लढविणाऱ्या साळवी यांना भाजपचेच दिगंबर विशे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे पराभव पत्करावा लागला होता. आजच्या मेळाव्यात विशेंना पाहताच साळवी यांचा पारा चढला आणि त्यांनी भाजपवर एकामागोमाग एक वार करायला सुरुवात केली. भाजपचे लोक बंडखोरी करतात. कार्यकर्त्यांना शिस्त नाही, गुपचूप जाऊन फॉर्म भरतात, गाजर दाखवून लोकांचा विश्वासघात करतात. याउलट सेनेत शिस्त आहे. इथे कोणी बेशिस्त वागला तर त्याच्या तंगडय़ा तोडल्या जातील, भाजप कार्यकर्ते मागून उद्योग करतात, अडवाणी सिंधी आहेत, परंतु मराठी माणूसही पंतप्रधान व्हावा, अशा आशयाच्या साळवी यांच्या शाब्दिक माऱ्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. आमदार हरिश्चंद्र पाटील आणि ग्रामीण अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी वारंवार साळवी यांना अडविण्याचा प्रयत्न केला. ही युतीची सभा आहे, त्यांना थांबवा, खाली बसवा अशी मागणी हे नेते करीत होते. मात्र साळवी यांनी भाजपचा उद्धार चालूच ठेवला. त्यामुळे भाजप कार्यकर्ते अधिक अस्वस्थ झाले.
कल्याण जिल्हा अध्यक्ष दिनेश तावडे, युवा मोर्चाचे ठाणे अध्यक्ष सचिन केदारी, संतोष साळुंखे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी थेट आक्रमक भूमिका घेत साळवी यांचे भाषण थांबविले; एवढेच नव्हे, तर काही भाजप कार्यकर्त्यांनी साळवींचाही उद्धार सुरू केला, तर काहींनी थेट व्यासपीठाच्या दिशेने धाव घेऊन साळवींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. खुच्र्यांची फेकाफेकी झाली. संतप्त भाजप कार्यकर्ते साळवींच्या दिशेने धावून येत असल्याचे पाहताच एकनाथ शिंदे , म्हस्के यांनी प्रसंगावधान राखून कार्यकर्त्यांना रोखीत साळवींचा बचाव केला. अचानक झालेल्या या तमाशाने व्यासपीठावरील उमेदवार आणि मान्यवरही अवाक् झाले.
हे युतीचे व्यासपीठ असून, साळवींचे इथे काय काम, त्यांना माफी मागायला लावा आणि त्यांना हाकलून द्या, अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली. प्रारंभी त्यांना समजावण्याचा प्रयत्न सेना नेत्यांनी केला. मात्र सभेवर बहिष्कार टाकीत सर्व कार्यकर्ते बाहेर पडले. भाजपच्या या रुद्रावताराने सेनेतही खळबळ उडाली. शेवटी आपला भाजपवर राग नसून, अनवधानाने आपल्या तोंडातून हे शब्द आले, असे सांगत साळवी यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोवर साळवी बाहेर जात नाहीत, तोवर आम्ही सभेत येणार नाही, अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली. अखेर साळवी यांना मागच्या दरवाजाने बाहेर काढण्यात आल्यानंतर मेळावा सुरू झाला. मात्र निवडणुकीदरम्यान साळवी युतीच्या व्यासपीठावर दिसले तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराच भाजप कार्यकर्त्यांनी दिल्यामुळे युतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
मुळातच रामभाऊ म्हाळगी, प्रकाश परांजपे यांच्यासारख्यांची परंपरा लाभलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून सेनेने गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या विजय चौगुले यांना मैदानात उतरविल्यामुळे भाजप गोटात नाराजी आहे. त्यातच आता सेनेशी सख्य जमविलेल्या राजाराम साळवी यांनीही भाजपला टार्गेट केल्याने पक्षात अस्वस्थता पसरली असून, असेच चालू राहिल्यास प्रचार कसा करायचा, अशी नाराजी एका भाजप पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. अगोदरच गेल्या तीन महिन्यापासून विरोधक युतीत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद पवारांनी हिंदुत्वावर आगपाखड केली आहे, त्यांना उत्तर देण्यासाठी युतीच्या जिल्ह्यातील चारही उमेदवारांना निवडून आणून पवारांना उत्तर द्या, असे आवाहन सुभाष देसाई यांनी यावेळी केले.