Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
प्रादेशिक

अंजली वाघमारे कसाबच्या वकील
मुंबई, ३० मार्च/प्रतिनिधी

मुंबईवरील २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल अमीर कसाब याच्यासाठी न्यायालयाने आज पुण्याच्या वकील अ‍ॅड. अंजली रमेश वाघमारे यांची वकील म्हणून नेमणूक केली. ४० वर्षांच्या अ‍ॅड. सौ. वाघमारे यांना १५ वर्षांहून अधिक वकिलीचा अनुभव आहे. आपल्याला वकील देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती कसाबने यापूर्वी पाकिस्तानच्या भारतातील उच्चायोगास केली होती. परंतु मुळात कसाब पाकिस्तानी नागरिक आहे हे मान्य करण्यासही तयार नसलेल्या पाकिस्तानने यास कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.

नालेसफाईच्या तपशिलाविनाच १०४ कोटी खर्च करणार!
मुंबई, ३० मार्च / प्रतिनिधी

मुंबईतील नालेसफाईसाठी कोणताही तपशील न देताच १०४ कोटींच्या नालेसफाईच्या कामाला स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत घाईघाईने मंजुरी देण्यात आली. कोणते नाले कधी साफ केले जाणार, कोणत्या पध्दतीने ते साफ केले जाणार, गाळ कुठे टाकणार असा कोणताही तपशील न तपासताच नालेसफाईच्या कामांना मंजुरी देण्यात आली. शहरातील सर्व नाल्यांची सफाई करण्यासाठी दोन वर्षांचा मोठा कालावधी कंत्राटदारांना देण्यात आला आहे .

उद्यमजगताचा वेध घेणारा‘फायनान्शियल एक्स्प्रेस’चा आज ‘एफई ५००’ विशेषांक
मुंबई, ३० मार्च/ व्यापार प्रतिनिधी

भारतीय उद्योगविश्वाचा विहंगम वेध घेणारे वार्षिक संकलन या रूपाने ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या एक्स्प्रेस समूहातील वित्तीय दैनिकाचा ‘एफई ५००’ हा विशेषांक आज प्रकाशित झाला आहे. सध्याच्या खडतर आर्थिक वातावरणातही भारतातील अव्वल उद्योगधंद्यांनी दाखविलेली दूरदृष्टी ही आशावादी असण्याबरोबरच, मंदीचे मळभ दूर झाल्यासरशी भारतीय उद्योगधंद्यांचे तेज पुन्हा तळपू लागेल, असे संकेत या विशेषांकातून स्पष्टपणे मिळतात.

संगणकीय प्रणालीतील त्रुटींमुळे एसटीचे फक्त १५ दिवसांचे आगाऊ आरक्षण
मुंबई, ३० मार्च / प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी महिनाभर आधी एसटीच्या गाडय़ांमध्ये आरक्षण करायला जाणाऱ्यांच्या पदरी सध्या घोर निराशा पडत आहे. एसटीच्या संगणकीय आरक्षण प्रणालीमध्ये महिनाभर आधीचे आरक्षण देण्याची तरतूद होऊ न शकल्याने ही वेळ ओढवली आहे. त्यामुळे हवे त्या दिवसाचे आरक्षण मिळण्याची शाश्वती नसल्याने, प्रवाशांनी आपला मोर्चा खासगी वाहतुकीकडे वळविला आहे. प्रवाशांनी ऐन गर्दीच्या हंगामात यासारख्या कारणांमुळे पाठ फिरवल्यास एसटीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

उन्हाळी सुट्टी घालवा ‘बोक्या’बरोबर
‘बोक्या सातबंडे’ १७ एप्रिलला सर्वत्र झळकणार
मुंबई, ३० मार्च / प्रतिनिधी
अभिनेते दिलीप प्रभावळकरांनी खास बच्चेकंपनीसाठी लिहिलेल्या बोक्या सातबंडे हे पुस्तक लिहिले. त्यानंतर टीव्हीवर दाखविण्यात आलेली याच नावाची मालिका बोक्याच्या धमाल गमतीजमतींमुळे लोकप्रिय झाली होती. आता ‘बोक्या सातबंडे’ हा चित्रपट १७ एप्रिलला बच्चेकंपनीच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे ध्वनिफित प्रकाशन नुकतेच मुंबईत झाले. त्यावेळी चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली.

रविवारचा मेगाब्लॉक अपरिहार्य
मुंबई, ३० मार्च / प्रतिनिधी

मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गावर गेल्या एक तपाहून अधिक काळापासून दर रविवारी मेगाब्लॉक करण्यात येत आहेत. त्या दिवशी रेल्वे प्रवास करताना अतोनात हाल होत असल्याने मुंबईकरांनी त्यांचा धसका घेतला आहे. कधी एकदा हे मेगाब्लॉक संपतात? असे मुंबईकरांना झाले आहे. मात्र सोमवार ते शनिवार या काळात रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुरळीत राखण्यासाठी मेगाब्लॉक अत्यावश्यक असल्याने, नजिकच्या भविष्यकाळात मुंबईकरांची त्यांच्यापासून सुटका होण्याची शक्यता धूसर आहे.

समुद्री मार्गावर रेसिंग करणाऱ्या २१ मोटरसायकलस्वारांना अटक
मुंबई, ३० मार्च / प्रतिनिधी

नव्याने उभ्या राहिलेल्या वांद्रे-वरळी समुद्री मार्गावर रेसिंग खेळणाऱ्या २१ मोटरसायकलस्वारांना वांद्रे पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. त्यांच्या मोटरसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत. दर शनिवार-रविवारी हे मोटरसायकलस्वार जीवघेणी स्पर्धा खेळत असत. बेदरकारपणे मोटरसायकल चालविल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारांची नामांकने जाहीर
मुंबई, ३० मार्च / प्रतिनिधी

शांताराम एंटरटेनमेन्टतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारांमध्ये सवरेत्कृष्ट चित्रपट, सवरेत्कृष्ट दिग्दर्शक इत्यादी १६ विभागांमध्ये ‘जोगवा’ला तर ‘गाभ्रीचा पाऊस’ या चित्रपटाला १२ विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाच्या स्पर्धेत सतीश मनवर (गाभ्रीचा पाऊस), राजीव पाटील (जोगवा) व राजेश देशपांडे (धुडगुस) तर सवरेत्कष्ट चित्रपट विभागात जोगवा, धुडगुस आणि गाभ्रीचा पाऊस या चित्रपटांमध्ये स्पर्धा आहे.

मासळीचा कचरा उचलू न दिल्याप्रकरणी ४५ कोटींचा दावा न्यायालयात दाखल
मुंबई, ३० मार्च / प्रतिनिधी

ऑगस्ट २००१ ते जुलै २००४ या काळात ससून डॉकमधील मासळीचा कचरा उचलू न दिल्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि इतर २३ जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेला ४५ कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा खटला उच्च न्यायालयाने दाखल करून घेतला असून एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात हा खटला उच्च न्यायालयापुढे सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.

लालबागचा उड्डाणपूल परीक्षा संपल्यानंतर पाडणार!
मुंबई, ३० मार्च / प्रतिनिधी

लालबाग येथील संत ज्ञानेश्वर उड्डाणपूल पाडण्याचे काम शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर हाती घेण्यात असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले. लालबाग येथे असलेला हा सध्याचा उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी चार पदरी, अडीच किमी लांबीचा नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ५० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सध्याचा उड्डाणपूल अरूंद असून वाहतुकीसाठी तो अपुरा पडतो. तसेच त्याची उंची कमी असल्याने उंच गणेशमूर्ती पूलाखालून नेता येत नाहीत. एमएमआरडीएने जुना पूल पाडून नवीन चार पदरी उंच उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र वाहतूक कोंडी लक्षात घेऊन परीक्षा संपल्यावर हे काम हाती घेण्यात यावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. एप्रिलच्या पंधरवडय़ापर्यंत शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा संपणार असून त्यानंतरच पूल पाडण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.

दीड लाखांच्या खंडणीसाठी अधिकाऱ्याचे अपहरण
बेलापूर, ३० मार्च/वार्ताहर

दीड लाखाच्या खंडणीसाठी ट्रस्ट अ‍ॅन्ड वेस्ट अ‍ॅन्डी कॉपर इंटरप्रायजेस कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अपहरण केल्याची घटना घडली. पावणे येथील उपरोक्त कंपनीत कामावर असलेले विजयन हे बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे कामावरून घरी जात होते. त्यावेळी अज्ञात गुंडांनी त्यांचे अपहरण केले. नंतर त्यांच्या घरी दुरध्वनी करून दीड लाखांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी विजयनची पत्नी शिला यांनी तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार केली.

रमाबाई आंबेडकर नगर खटल्याचा निकाल पुढे ढकलला
मुंबई, ३० मार्च / प्रतिनिधी

रमाबाई आंबेडकर नगरात पोलिसांनी केलेल्या गोळीबाराविषयी सुरू असलेल्या खटल्याचा निकाल ६ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला. याच घटनेशी संबंधित आणखी एका खटल्यातील आरोपीने त्याचा खटला पुतळा विटंबना खटल्यात वर्ग करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावेळी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस. वाय. कुलकर्णी यांनी या खटल्याचा निकाल ६ एप्रिलपर्यंत पुढे ढकलला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरात आंदोलन छेडण्यात आले. हे आंदोलन रोखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाने केलेल्या गोळीबारात १० ठार व २६ जण जखमी झाले होते. शिवडी कोर्टात या खटल्याची सुनावणी झाली.